छत्रपती संभाजीनगर : आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत क्रूरकर्मा औरंगजेबाचे फलक झळकावले !

  • धर्मांध तरुणाचा औरंगजेबाच्या चित्रासह नृत्य करतांनाचा व्हिडिओ प्रसारित !

  • हिंदुद्वेष्ट्यांच्या कृत्यामुळे शहरात संताप !

छत्रपती संभाजीनगर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत एका धर्मांध तरुणाने क्रूरकर्मा औरंगजेबाचे फलक झळकावून नृत्य केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणाने या कृत्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित केल्याने शहरात तीव्र पडसाद उमटत आहेत.

गुन्हा नोंदवण्याची उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांची मागणी !

या गंभीर प्रकरणावर उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ते म्हणाले की,

औरंगजेब हा कोणताही महापुरुष नाही, तर तो एक आक्रमक होता. महामानवाच्या जयंतीसारख्या पवित्र प्रसंगी अशा क्रूरकर्म्याची प्रतिमा झळकावणे आणि त्याचा व्हिडिओ प्रसारित करणे, हे अत्यंत निषेधार्ह आहे. संबंधिताविरुद्ध तात्काळ गुन्हा नोंदवण्यासाठी मी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेणार आहे.

माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून समर्थन !

या प्रकरणावर प्रतिक्रिया देतांना ए.आय.एम्.आय.एम्. (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन – अखिल भारतीय मुस्लिम एकता संघ) या मुसलमान पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या कृत्याचे एकप्रकारे समर्थन करत विचित्र तर्क मांडला. जलील म्हणाले की, राज्यघटनेने प्रत्येकाला अभिव्यक्तीस्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे एखादा तरुण चित्र घेऊन गेला असेल, तर त्यात गुन्हा काय ? जंजाळ यांनी कोणत्या कलमाखाली गुन्हा नोंदवला जाऊ शकतो, हे स्पष्ट करावे. (जलील यांच्यासारखे नेते अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा आधार घेऊन क्रूरकर्मा आक्रमकांचे उदात्तीकरण कसे करू शकतात ? औरंगजेबाचे चित्र झळकावणार्‍यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, जेणेकरून भविष्यात असे धाडस कुणाचेही होणार नाही ! – संपादक) जलील यांच्या या विधानामुळे औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्‍यांना बळ मिळत आहे, असे मत हिंदुत्वनिष्ठांकडून व्यक्त केले जात आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदु मंदिरांचा विध्वंस करणार्‍या हिंदुद्वेष्ट्या औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे, हे अभिव्यक्तीस्वातंत्र्य नसून तो जाणीवपूर्वक सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रकार आहे. अशांना कारागृहात टाकण्याचे धाडस पोलीस दाखवणार का ?
  • छत्रपती शिवाजी महाराज अफझलखानाचा कोथळा बाहेर काढतांनाचे चित्र झळकावलेले जसे मुसलमानांना चालत नाही, तसेच हिंदु मंदिरांचा विध्वंस करणार्‍या हिंदुद्वेष्ट्या औरंगजेबाचे चित्र झळकवलेले हिंदू खपवून घेणार नाहीत, हे ठणकावून सांगितले पाहिजे !
  • छत्रपती शिवाजी महाराज अफझलखानाचा कोथळा बाहेर काढतांनाचे चित्र झळकावण्यासाठी अनुमती घेण्यास सांगणारे पोलीस-प्रशासन क्रूरकर्मा औरंगजेबाचे छायाचित्र झळकवण्यासाठी अनुमती घ्यायला सांगत नाहीत, हे लक्षात घ्या !