सनातनच्या ज्ञान प्राप्त करणार्‍या साधकांप्रमाणे सूक्ष्मातून ज्ञान मिळवणारे साधक पृथ्वीवर अत्यल्प असण्याची कारणे           

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प्रश्न –

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘सनातनच्या ज्ञान प्राप्त करणार्‍या कु. मधुरा भोसले, श्री. निषाद देशमुख आणि श्री. राम होनप या साधकांप्रमाणे सूक्ष्मातून ज्ञान मिळवणारे साधक पृथ्वीवर किती आहेत ? ते संख्येने विशेष नसल्यास त्याचे कारण काय ?’

उत्तर –

श्री. राम होनप :

१. सनातनच्या ज्ञान प्राप्त करणार्‍या साधकांप्रमाणे सूक्ष्मातून ज्ञान मिळवणारे साधक पृथ्वीवर एकूण १०० आहेत. ही संख्या अत्यल्प असण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

श्री. राम होनप

१ अ. कलियुगात सध्याच्या काळात ज्ञानयोगानुसार साधना करणे कठीण असणे : ‘कलियुगात असलेला प्रतिकूल काळ आणि वाईट शक्तींचा त्रास’, यांमुळे ईश्वरप्राप्तीसाठी साधना करणे कठीण आहे. अशा परिस्थितीत ‘कर्मयोग आणि भक्तीयोग’ या योगांनुसार साधना करणे साधकांसाठी सुलभ आहे; परंतु ज्ञानयोगानुसार साधना करणे कठीण अन् दुर्लभ आहे. ‘सूक्ष्मातून ज्ञान मिळवणे’, ही ज्ञानयोगानुसार साधना आहे. त्यासाठी साधकात ‘ईश्वराचे ज्ञान समजून घेणे आणि ते शब्दरूपात मांडणे’, यांसाठी सूक्ष्मातील जाणण्याच्या क्षमतेची आवश्यकता असते. कलियुगामुळे अशी क्षमता असलेले साधक पृथ्वीवर अत्यल्प आहेत. त्यामुळे सूक्ष्मातून ज्ञान मिळवणार्‍या साधकांची संख्या पृथ्वीवर मर्यादित स्वरूपाची आहे.

१ आ. निष्काम साधना करणारे साधक अल्प असणे : सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्यासाठी ‘साधक निष्काम असणे आणि त्याने ‘सूक्ष्मातून ज्ञान मिळवणे, ही गुरुसेवा आहे’ या विचाराने ती सेवा करणे’, हे महत्त्वाचे असते. अशाच साधकावर ईश्वराची कृपा होऊन त्याला सूक्ष्मातून ज्ञान ग्रहण करता येते. असा सेवाभाव ‘साधकात निर्माण होणे आणि तो टिकून रहाणे’, हे कठीण असते; कारण कलियुगात साधकाच्या मनात सूक्ष्म ज्ञानाद्वारे धन आणि प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास सहजतेने निर्माण होऊ शकतो.

१ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अध्यात्मावर सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्याला महत्त्व देणे आणि शिष्यांकडून असे कार्य करून घेणारे गुरु अत्यल्प असणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सनातन धर्मातील ज्ञानाचे महत्त्व जाणले आहे. सध्याच्या काळात जिज्ञासू आणि साधक यांच्या मनात ‘अध्यात्मात असे का सांगितले आहे ? एखाद्या विषयामागील आध्यात्मिक कारणमीमांसा काय ?’, असे प्रश्न येतात. त्यांची उत्तरे विविध ग्रंथांमध्ये नाहीत. या प्रश्नांची समर्पक उत्तरे मिळाल्यास जिज्ञासू, तसेच साधक यांची साधना आणखी चांगली होणार आहे, तसेच त्यांच्यामधील ईश्वराप्रतीचा भाव आणि श्रद्धा वृद्धींगत होणार आहे. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर अध्यात्मातील विविध विषयांवरील प्रश्न सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना विचारतात. गुरुकृपेमुळे त्या साधकांना त्या प्रश्नांची उत्तरे सूक्ष्मातून मिळतात.

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांचे ज्ञानकार्य काळानुरूप आणि दूरदृष्टी ठेवून होत आहे. त्यांच्यातील आध्यात्मिक सामर्थ्यामुळे सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्याविषयी योग्य दिशा मिळत आहेत. असे अद्भुत् कार्य करणारे गुरु पृथ्वीवर अत्यल्प आहेत. परिणामी सूक्ष्मातून ज्ञान मिळवणारे साधक घडण्याची प्रक्रिया दुर्मिळ बनली आहे.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ते साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १०.१.२०२६, वेळ : सकाळी १०.३० आणि २०  सेकंद)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.