Asha Bhosle : सूरसम्राज्ञी आशा भोसले कालवश !

सूरसम्राज्ञी आशा भोसले

मुंबई – आपल्या आवाजाने चित्रपटसृष्टीमध्ये अधिराज्य गाजवणार्‍या आणि मंत्रमुग्ध करणार्‍या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे १२ एप्रिल या दिवशी वयाच्या ९२ वर्षी ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. नाट्य, भक्ती, भाव, गझल, लावण्या, डिस्को, पॉप, उपशास्त्रीय आदी विविध प्रकरांतील २० भाषांमध्ये १२ सहस्रांहून अधिक गाणी त्यांनी गायली. सर्वाधिक गाणी म्हणण्याचा त्यांचा विक्रम आहे.

प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचे निधन झाले. मुलगा आनंद यांनी आशा भोसले यांच्या निधनाचे वृत्त माध्यमांना दिले. १३ एप्रिल या दिवशी दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय सन्मानात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

विविध भाषांमध्ये  गाणी गायली

वर्ष १९३३ मध्ये सांगली येथे त्यांचा जन्म झाला. वर्ष १९४९ पासून त्यांनी गायनाला प्रारंभ केला. आशा भोसले यांनी मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगु आदी २० भाषांमध्ये गाणी गायली. ‘सर्वश्रेष्ठ महिला पार्श्वगायिका’ म्हणून त्यांना वर्ष १९८१ आणि १९८६ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. त्यांना ७ वेळा फिल्मफेअर पुरस्कार, तसेच चित्रपट क्षेत्रातील सर्वांत मानाचा समजला जाणारा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ही त्यांना प्राप्त झाला. महाराष्ट्र सरकारने मार्च २०२३ मध्ये त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित केले.

‘एका तळ्यात होती’, ‘केव्हा तरी पहाटे’, ‘फुलले रे क्षण माझे फुलले रे’, ‘तरुण आहे रात्र अजूनही’, ‘ही वाट दूर जाते’, ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘रेशमाच्या रेघांनी’, ‘सैनिक हो तुमच्यासाठी’, ‘नाच रे मोरा आंबाच्या वनात’, ‘जिवलगा राहिले दूर घर माझे’, ‘मागे उभा मंगेश’ अशी त्यांची असंख्य गाणी हृदयस्पर्शी ठरली. मराठीप्रमाणे हिंदी भाषेतीलही अनेक सदाबहार गाणी त्यांनी गायली. आशा भोसले यांच्या निधनामुळे सर्व क्षेत्रांतील मान्यवरांनी दु:ख व्यक्त केले आहे.

जगभरातील लोकांच्या मनाला स्पर्श केला ! – पंतप्रधान मोदी  

आशा भोसले यांच्या अनेक दशकांच्या अद्वितीय संगीत प्रवासाने आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध केले. संगीताद्वारे जगभरातील असंख्य लोकांच्या मनाला त्यांनी स्पर्श केला. भावपूर्ण गीतांपासून ते जोशपूर्ण संगीत रचनांपर्यंत, त्यांच्या आवाजात कालातीत तेज होते. आशा भोसले यांची गाणी सदैव लोकांच्या मनात गुंजत रहातील.

अशा अष्टपैलू गायिका होणे नाही ! – फडणवीस, मुख्यमंत्री 

आशा भोसले यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील आणखी एक तारा निखळला. सुरांची सुंदर बाग ओसाड झाली. आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गायनातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई होत्या. ईश्वरीय आवाज असलेल्या गायिका निघून गेल्या. अनेक संगीत प्रकारांचे त्यांनी गायन केले. पालटांना सहजरित्या आत्मसात करणार्‍या अशा अष्टपैलू गायिका पुन्हा होणे नाही.