महासत्ता असलेल्या अमेरिकेमुळे जगाची झालेली हानी !

आज जगात अमेरिका ही महासत्ता आहे. एकेकाळी तो मान ब्रिटनला होता. ब्रिटनने व्यापाराच्या नावाखाली जगातील अनेक देशांमध्ये जाऊन तेथील सत्ताच हस्तगत केली आणि त्या देशांना पारतंत्र्यात ढकलले. ब्रिटनचे ‘सोन्याचे दिवस’ संपले किंवा त्यांच्या साम्राज्याचा सूर्य अस्ताला गेल्यावर आणि दुसर्‍या महायुद्धानंतर अनेक बलाढ्य देश जर्जर झाल्यावर अमेरिकेने जागतिक राजकारणात पाय रोवण्यास प्रारंभ केला. तेव्हापासून ते आजपर्यंत अमेरिका जगातील देशांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे त्या देशातील साधनसंपत्तीसह मोठ्या प्रमाणात मनुष्यहानीही झाली आहे.

१. अनेक देश उद्ध्वस्त

अफगाणिस्तान, इराक, लिबिया असो अथवा सीरिया अमेरिकेने ‘मानवतावादी हस्तक्षेपा’च्या नावाखाली जी काही कृत्ये केली, त्यामुळे हे देश उद्ध्वस्त झाले. ‘अमेरिका एका हाताने साहाय्य करते आणि दुसर्‍या हाताने त्याच पैशांतून त्या देशांना उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्नशील रहाते’, असा आरोप त्यांच्यावर केला जातो.

२. इराणमधील तेलाचे राजकारण

श्री. यज्ञेश सावंत

वर्ष १९०८ मध्ये इराणमध्ये पहिल्यांदा तेलाचा शोध लागला. तेव्हा ब्रिटीश आस्थापने इराणला लुटत होत्या आणि ८६ टक्के लाभ स्वतःकडे ठेवत होत्या. वर्ष १९५१ मध्ये महंमद मोसादेघ पंतप्रधान झाले आणि त्यांनी इराणच्या तेल क्षेत्राचे राष्ट्रीयीकरण केले. यामुळे इराण एक महासत्ता बनण्याच्या मार्गावर होता; पण याच संपत्तीने अमेरिकेचे लक्ष इराणकडे वेधले. त्यानंतर चालू झाला सत्तेचा खेळ !

अमेरिकेने अत्यंत चतुराईने तिची गुप्तहेर संघटना ‘सीआयए’ आणि ब्रिटनची गुप्तचर संघटना ‘एम्आय ६’ यांनी मिळून इराणमध्ये मोसादेघविरोधी प्रचार चालवला. ‘मोसादेघ हे इराणचे राजे महंमद रझा पेहलवी यांच्यासाठी एक मोठा धोका आहेत’, असे लोकांसमोर चित्र उभे करण्यात आले. या प्रचारामुळे अवघ्या २ वर्षांत मोसादेघ यांची सत्ता उलथवून इराणमध्ये अमेरिका आणि ब्रिटन यांचे ‘कठपुतली’ महंमद रझा पेहलवी यांना बसवण्यात आले. पेहलवी सत्तेवर येताच अमेरिकी आणि ब्रिटीश तेल आस्थापनांनी इराणमध्ये येऊन तेल उत्खननातून अब्जावधी डॉलर्स कमावले. ही अमेरिकेची मूलभूत रणनीती आहे. प्रथम एका स्थिर देशातील स्वत:ला नको असलेल्या नेत्याला सत्तेवरून काढायचे आणि तिथे स्वतःचा कठपुतली नेता बसवायचा, जो अमेरिकेच्या हिताचे कायदे बनवेल, जेणेकरून अमेरिका तेथील नैसर्गिक साधनसंपत्तीमधून लाभ कमावू शकेल.

३. पेहलवींना घाबरवून शस्त्रे विकत घेण्यास भाग पाडणे

इराणला अधिक लुटण्यासाठी अमेरिकेने अन्य एका रणनीतीचा वापर चालू केला. अमेरिकेने पेहलवींच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण केली, ‘जनता तुमची सत्ताही एका रात्रीत उलथवू शकते. त्यामुळे तुमच्याकडे ‘शक्तीशाली सैन्य’ असणे आवश्यक आहे.’ येथे अमेरिकेने इराणला मोठ्या प्रमाणात शस्त्रे आवश्यक असल्याची भावना निर्माण केली. अमेरिकेने इराणला १३ अब्ज डॉलर्सची शस्त्रे विकली. पुढच्या २५ वर्षांत अमेरिकेने तेल आणि शस्त्रास्त्रे यांच्या िवक्रीतून इराणकडून अब्जावधी डॉलर्स कमावले. त्यानंतर मात्र या कार्यक्रमात व्यत्यय आला. ११ फेब्रुवारी १९७९ या दिवशी पेहलवींविरुद्ध ‘इराणी क्रांती’ झाली आणि अयातुल्ला खामेनी सत्तेवर आले. खामेनी यांनी सत्तेवर येताच इराणचे सर्व तेलसाठे राष्ट्रीयीकृत केले, म्हणूनच अमेरिका अयातुल्ला खामेनींचा तीव्र तिरस्कार करते.

४. सद्दाम हुसेन यांना बळ देणे

अमेरिकेची दुसरी रणनीती, म्हणजे विरोधकांना निधी देणे आणि त्यांचे सशस्त्रीकरण करणे. खामेनी इराणी क्रांतीद्वारे सत्तेत आले होते आणि त्यांच्या लोकप्रियतेमुळे इराणमध्ये अंतर्गत विरोध उभा करणे अशक्य होते. म्हणून अमेरिकेने स्वतःचा मोर्चा शेजारील देशाकडे वळवला आणि त्यांना एक संभाव्य उमेदवार मिळाला तो, म्हणजे इराकचे नेते सद्दाम हुसेन यांच्या रूपात !

अमेरिकेने रोनाल्ड रेगन यांच्या नेतृत्वाखाली इराकचे नाव ‘आतंकवादाला पाठिंबा देणार्‍या देशां’च्या सूचीतून बाहेर काढले आणि त्यांना साहाय्य चालू केले. इतकेच नाही, तर सैन्य साहाय्याच्या नावाखाली इराकला जैविक आणि रासायनिक शस्त्रेसुद्धा पुरवण्यात आली, म्हणजे इराणला शह देण्यासाठी सद्दाम हुसेन यांना शक्तीशाली बनवायचे होते. त्याचप्रमाणे ‘इराक हा एक आर्थिक महासत्ता बनू नये, म्हणून त्यांना इराणसमवेतच्या युद्धात अडकवून ठेवणे’, ही रणनीती यशस्वी ठरली. ९ वर्षे चाललेल्या या युद्धात ५ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि दोन्ही देशांची मिळून अब्जावधी रुपयांची हानी झाली. इराण आणि इराक येथील लोक अधिक गरीब झाले; पण दुसरीकडे अमेरिका मात्र दोन्ही देशांना स्वत:ची शस्त्रे अन् तंत्रज्ञान विकून लाभ कमावत राहिली.

५. सद्दाम हुसेन यांना ठार करणे

३० डिसेंबर २००६ या दिवशी अमेरिकेने त्यांचा एकेकाळचे लाडके असलेल्या सद्दाम हुसेनला फासावर चढवले. याचे कारण, म्हणजे सद्दामने इराक अन् कुवेत यांच्या तेल क्षेत्रावर स्वत:चे नियंत्रण वाढवण्यास प्रारंभ केला होता, ज्यामुळे अमेरिकेच्या हितसंबंधांना धक्का लागत होता, तसेच त्यांनी ‘पेट्रो-डॉलर’ऐवजी ‘युरो’चा (युरोपियन चलनाचा) वापर करण्याचे आवाहन केले होते, ज्यामुळे डॉलरच्या जागतिक वर्चस्वाला आव्हान उभे राहिले. म्हणून अमेरिकेने सद्दाम यांच्याकडे ‘विनाशकारी शस्त्रे’ असल्याचा खोटा आरोप लावला, तीच शस्त्रे जी एकेकाळी अमेरिकेनेच त्यांना दिली होती. सद्दाम यांना संपवून तिथे स्वतःचे कठपुतली सरकार बसवले. नंतर स्वत: ‘सीआयए’नेच स्वीकारले, ‘इराकमध्ये अशी कोणतीही विनाशकारी शस्त्रे कधीच मिळाली नाहीत.’ अमेरिकेच्या या हस्तक्षेपामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी पुढे ‘इसिस’सारखी जगातील सर्वांत धोकादायक आतंकवादी संघटना जन्माला आली.

अस्थिरता निर्माण करून असुरक्षितता पसरवण्याच्या या रणनीतीमुळे केवळ आखाती देशच नव्हे, तर संपूर्ण जग आज आतंकवादाच्या धोक्याला तोंड देत आहे. अमेरिकेने केवळ आखाती देशच नाही, तर लॅटिन अमेरिकेतही १२ देशांमध्ये अनेक वेळा सत्तापालटाचे प्रयत्न केले आहेत. याच वर्षी जानेवारी २०२६ मध्ये अमेरिका खंडातील व्हेनेझुएला येथील सत्ताधिशालाच चक्क अमेरिकेने अटक केली.

६. चीनच्या विस्ताराला राेखण्यासाठी गट

‘इंडो-पॅसिफिक’ (हिंद आणि प्रशांत महासागर) क्षेत्रात ‘क्वाड’ (भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या ४ देशांचा ‘क्वाड’ गट हा संरक्षणात्मकदृष्ट्या धोरणात्मक संबंध सुदृढ करण्यासाठी बनवलेला गट आहे.)सारखे अन्यही गट सिद्ध होत आहेत, जेणेकरून जपान, ऑस्ट्रेलिया, भारत आणि दक्षिण-पूर्व आशियाई देशांना चीनच्या विस्तारवादी धोरणांपासून वाचवता येईल. अनेकदा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष स्वतः ‘मुक्त आणि खुल्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रा’विषयी बोलतात.

ते म्हणतात की, ते शांतता आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहेत; पण हे सर्व केवळ दिखाऊ आहे; कारण अमेरिकेला ठाऊक आहे की, जगातील ८० टक्के व्यापार केवळ एका ‘मलाक्का सामुद्रधुनी’तून जातो. आज जगाच्या सत्तेचे, संसाधनांचे आणि प्रभावाचे केंद्र आखाती देशांसह इंडो-पॅसिफिक आहे. जर तिथे चीनचा प्रभाव वाढला, तर ते अमेरिकेच्या दीर्घकालीन आर्थिक हितासाठी अजिबात चांगले नसेल. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, स्वतःच्या स्वार्थाला ‘दुसर्‍या देशांचे कल्याण’ असे नाव देणे, ही अमेरिकेची जुनी रणनीती राहिली आहे. ते नेहमीच त्यांच्या हालचालींना नैतिकता आणि ‘लोकशाही’ यांचा मुलामा देतात; पण काम मात्र अगदी विरुद्ध करतात.

(क्रमश: पुढच्या रविवारी)

गुरुचरणार्पणमस्तु ।

– श्री. यज्ञेश सावंत, सहसंपादक, दैनिक ‘सनातन प्रभात’, पनवेल. (९.४.२०२६)