श्रीरामाचा नामजप करण्याविषयी साधिकेला आलेली अनुभूती

१. महाशिवरात्री निमित्तच्या प्रवचनात ‘शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ।’ हे सूत्र सांगत असतांना ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले श्रीरामनामाची महती सांगत आहेत’, असे वाटणे

‘१४.२.२०२६ या दिवशी महाशिवरात्रीच्या निमित्ताने एका ठिकाणी मला प्रवचन करण्याची सेवा मिळाली होती. त्यानिमित्त संहितेतील शिवाच्या आरतीतील ‘शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ।’, म्हणजे ‘१०० कोटी जपसंख्येएवढे फळ देणार्‍या श्रीरामनामरूपी बीजमंत्राचे (रामनामाचे) उच्चारण (जप) शिव अखंड करत असतो’, हे सूत्र वाचतांना माझ्या मनात विचार आला, ‘देवाला मला यातून काय शिकवायचे आहे ?’ तेव्हा मला वाटले, ‘मला महाशिवरात्रीच्या निमित्ताने करायच्या असलेल्या प्रवचनातून परात्पर गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) श्रीरामनामाची महती सांगत आहेत.’ श्री गुरुकृपेनेच मला हे सूत्र प्रवचनाच्या वेळी भावपूर्णरित्या सांगता आले.

२. महाशिवरात्रीच्या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा श्रीरामाचा नामजप करण्याविषयीचा संदेश प्रसिद्ध होणे

१५.२.२०२६ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘साधकांनो, काळानुसार साधना म्हणून रामराज्याच्या स्थापनेसाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करा !’, असा संदेश प्रसिद्ध झाला होता. हा संदेश वाचल्यावर मला प्रवचनात सांगितलेल्या सूत्राची आठवण झाली. त्या वेळी मला वाटले, ‘देवाने प्रवचनाच्या माध्यमातून मला श्रीरामनामाच्या महतीची पूर्वसूचना दिली.’

‘परात्पर गुरुदेवांची ज्ञानशक्ती, त्यांच्या माध्यमातून कार्यरत असणारे गुरुतत्त्व आणि त्यांनी मला प्रवचन करण्याची संधी दिली’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. पूर्वा श्रीराम कुलकर्णी, पनवेल (१६.२.२०२६

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक