भारत योग्य दिशेने वाटचाल करत आहे ! – Ipsos Report

‘इप्सोस इंडिया’ या संशोधन करणार्‍या आस्थापनाच्या सर्वेक्षणातील ६५ टक्के भारतियांचे मत  

नवी देहली – ‘इप्सोस इंडिया’ या संशोधन करणार्‍या आस्थापनाने मार्च २०२६ चा एक अहवाल प्रसारित केला आहे. या अहवालाचे शीर्षक ‘व्हॉट वरीज द वर्ल्ड’; म्हणजेच ‘संपूर्ण जगाला कशाची  सर्वाधिक चिंता आहे?’ असे आहे. या अहवालानुसार सर्वेक्षण केलेल्या २९ पैकी २३ देशांमधील बहुसंख्य लोक त्यांच्या भविष्याबद्दल नकारात्मक विचार करतात; परंतु भारत, सिंगापूर, मलेशिया, दक्षिण कोरिया आणि थायलंड यांसारखे देश या प्रवृत्तीपासून वेगळे आहेत. सर्वेक्षणामध्ये समाविष्ट असलेल्या भारतातील ६५ टक्के लोकांचे मत आहे की, देश योग्य दिशेने वाटचाल करत आहे. जगात हे सरासरी प्रमाण केवळ ३९ टक्के आहे.

सर्वेक्षणामध्ये नागरिकांची प्रमुख राष्ट्रीय सूत्रांवरील मतेही समाविष्ट करण्यात आली आहेत, जी त्यांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करतात. सर्वेक्षणामध्ये अनेक लोकांनी मान्य केले आहे की, तेल आणि वायू पुरवठ्यावरील वाढता दबाव भविष्यात एक आव्हान बनू शकतो.

जागतिक स्तरावर गुन्हेगारी, हिंसा आणि बेरोजगारी या सर्वांत मोठ्या चिंता

जागतिक चिंतांमध्ये गुन्हेगारी, हिंसा, बेरोजगारी, महागाई, गरिबी आणि सामाजिक असमानता, आर्थिक आणि राजकीय भ्रष्टाचार प्रमुख आहेत. भारतातही अशाच प्रकारच्या चिंता दिसून येतात; परंतु प्राधान्यक्रमाचा क्रम वेगळा आहे. महागाई, बेरोजगारी, शिक्षण, गुन्हेगारी आणि हिंसा याव्यतिरिक्त आर्थिक आणि राजकीय भ्रष्टाचार या भारतियांच्या सर्वात मोठ्या चिंता आहेत.

सकारात्मकता वाढवण्यामागे भारताची तटस्थ भूमिका

भारतातील लोकांच्या सकारात्मक विचारांमागे अनेक कारणे आहेत. भारताची तटस्थ भू-राजकीय स्थिती आणि जागतिक इंधन संकटाचा प्रभाव अल्प करण्यासाठी केलेले सक्रीय प्रयत्न यांमुळे अर्थव्यवस्था तुलनेने स्थिर राहिली आहे.

भू-राजकीय तणावांमुळे जगात सर्वाधिक चिंता

या सर्व चिंता एका सामायिक जागतिक चिंतेकडे निर्देश करतात. ही अस्वस्थता बर्‍याच अंशी सतत होत असलेल्या भू-राजकीय तणावांमुळे निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांत या तणावांनी आणि संघर्षांनी जगभरातील अर्थव्यवस्थेवर परिणाम केला आहे, पुरवठा साखळ्यांवर दबाव आणला आहे आणि नागरिकांसाठी कठीण परिस्थिती निर्माण केली आहे, असे या आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश रामलिंगम् यांनी सांगितले.