सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत तेल-वायू यांच्या आयातीवर आलेले बंधन लक्षात घेता भारताने ऊर्जा स्रोत क्षेत्रात अन्य पर्यायांवर भर देऊन स्वयंपूर्ण होणे, हीच काळाची आवश्यकता आहे. इराण येथील हॉर्मुझची सामुद्रधुनी, तेल-वायू व्यापार आणि सनातन राष्ट्राची (भारताची) महत्त्वाची भूमिका यांविषयी या लेखातून जाणून घेऊया.
१. दुसर्या महायुद्धानंतर जगभरात तेल, घरगुती आणि नैसर्गिक वायू हाच इंधनाचा मुख्य स्रोत
दुसर्या महायुद्धानंतर जलद आणि वैश्विक आधुनिकीकरणामुळे संपूर्ण जगामध्ये तेल, घरगुती (एल्.पी.जी.) आणि नैसर्गिक वायू (एल्.एन्.जी) हाच इंधनाचा मुख्य स्रोत झाला. भारतातही हळूहळू तेल, तसेच घरगुती आणि नैसर्गिक वायू हाच इंधनाचा मुख्य स्रोत बनला.
२. तेल-वायू साठ्यांच्या टंचाईसाठी कारणीभूत असणारे घटक
भारतामध्ये तेल-वायूचे साठे शोधण्याचे प्रयत्न अविरतपणे चालू आहेत. सद्यःस्थितीत तेल आणि वायू यांच्या एकूण दैनंदिन वापरातील केवळ १५ टक्के उत्पादन भारतात होत आहे. अवाढव्य लोकसंख्या, नियोजनाचा अभाव आणि व्यूहरचनात्मक तेल-वायू साठ्यांची व्यवस्था करण्यासाठी स्वातंत्र्योत्तर काळात अल्प प्रमाणात झालेले प्रयत्न हे सध्याच्या टंचाईग्रस्त परिस्थितीसाठी कारणीभूत ठरतात.
श्री. गिरीश पुजारी यांची ओळख

श्री. गिरीश पुजारी हे गेल्या २७ वर्षांपासून तेल वाहतूक, समुद्री व्यापार आणि नौवहन (मर्चंट नेव्ही) या क्षेत्रात कार्यरत आहेत. गेल्या १० वर्षांपासून तेलवाहू नौकांवर ‘मुख्य समुद्री अभियंता’ (चीफ इंजिनीयर ऑफिसर) या पदावर कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भारतातील अंतर्गत तेल-वायू व्यापार यांच्याशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध आला आहे.
३. अमेरिकेप्रमाणे तेल-वायू यांचा समुद्राखाली साठा करण्यात भारताला यश येईल का ?
तेल-वायू यांचा साठा करण्यासाठी सुरक्षित आणि अल्प व्यय असणार्या टाक्या समुद्राखाली बनवून त्यामध्ये अनेक मासांचा साठा ठेवण्याची व्यवस्था अमेरिकेने त्यांच्या आखाती समुद्रात केली आहे. भारताच्या तिन्ही बाजूंनी समुद्र असला, तरीही शत्रूच्या दृष्टीने दूर आणि सुरक्षित जागेअभावी अशा पद्धतीची तेलवायूच्या साठवणीची व्यवस्था निर्माण करण्यासाठी कितपत यश येईल, याविषयी शंकाच आहे. प्रत्यक्ष युद्धकाळात या साठ्यांवरही आक्रमणे होऊ शकतात, हेसुद्धा नाकारता येत नाही.
४. युद्धजन्य परिस्थितीत तेल-वायू आयात, प्रक्रिया आणि वितरण या व्यवस्थांवर येणारा प्रचंड ताण
आज दैनंदिन वापरातील ८५ टक्के तेल आणि वायू भारत अन्य देशांतून आयात करतो. त्यातील ६० टक्के आयात ही हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून (इराणजवळील) अर्थातच आखाती देशांतून होते. सध्याच्या भीषण आखाती युद्धामध्ये ही सामुद्रधुनी बंद करणे, हा युद्धातील महत्त्वाचा पर्याय इराण आणि अन्य देशांसमोर असतो. त्याचसमवेत तेलाच्या विहिरी आणि साठे यांच्यावर आक्रमणे होतातच. शेवटी हे युद्ध आहे आणि युद्धात ऊर्जास्रोत नष्ट करणे, हा युद्ध जिंकण्यासाठी महत्त्वाचा भाग असतो. सद्यःस्थितीतील ही युद्धजन्य परिस्थिती पहाता येणार्या काळात भारतामध्ये तेल-वायू आयात, प्रक्रिया (रिफायनरी प्रोसेस) आणि वितरण या व्यवस्थांवर प्रचंड ताण येणे क्रमप्राप्त आहे. आपल्या देशातील केवळ १० टक्के तेल-वायू उत्पादन प्रत्यक्ष खर्चाच्या तुलनेत अत्यल्प आहे. हे सर्व तेल-वायू उत्पादन संरक्षणदलाला युद्धकाळात उपलब्ध करून दिले जाते.
५. आयात आणि साठवण यांच्या मर्यादेमुळे पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता !
सध्या भारतात सर्वसाधारणपणे केवळ १५ दिवसांच्या तेल-वायू साठ्याची क्षमता उपलब्ध आहे. उर्वरित साठे हे केवळ तेल-वायू वाहक नौकांवरच साठवले जाऊ शकतात. युद्धामुळे आयातीवर मर्यादा आल्यामुळे ५० टक्के आयात ही आखाती देश सोडून अन्य देशांतून, उदा. नायजेरिया, रशिया, दक्षिण अमेरिकेतील देश येथून होत असून संपूर्ण देशाला हे ५० टक्के तेल-वायू वितरण पुरेसे पडणार नाही. त्यामुळे भारताला लवकरच पर्यायी व्यवस्था करावी लागेल.
६. पर्यायी ऊर्जास्रोतांचा वापर करून भारताने दिशाहीन जगाचे नेतृत्व करणे महत्त्वाचे !
युद्धकाळात संपूर्ण जग दिशाहीन होत असल्यामुळे भारताला अर्थात् सनातन राष्ट्राच्या प्रत्येक भूमिकेला यापुढे समयसूचकता, कल्पक नेतृत्व आणि विश्वदायित्वाची झालर असणे अत्यावश्यक ठरणार आहे. अंतर्गत व्यापारासमवेत देशाची अंतर्गत व्यवस्था आणि निर्यात व्यापार वृद्धींगत करण्यासाठी सर्वांना संघटित प्रयत्न करावे लागतील. सूर्य ऊर्जा, हायड्रोजन वायू ऊर्जा, आण्विक ऊर्जा, समुद्रातील भरती-ओहोटीच्या वेळी लाटांची मिळणारी ऊर्जा, बायोगॅस, पवन ऊर्जा यांच्या वापरातून, तसेच पारंपरिक वाहतूक व्यवस्था, म्हणजे हत्ती, घोडे आणि गाढव यांच्या द्वारेही वाहतूक करणे क्रमप्राप्त ठरणार आहे.
७. मागणी-पुरवठा आणि प्रत्यक्ष व्यय यांच्या समतोलासाठी इंधनाच्या नवीन पर्यायांचा वापर करणे क्रमप्राप्त !
प्रचंड मागणी-पुरवठा आणि प्रत्यक्ष खर्च यांची व्यापकता पहाता भारतामध्ये तेल-वायूची साठवण करणे, हे मोठे राष्ट्रीय आव्हान ठरते. केवळ १० टक्के उत्पादन, तसेच ९० टक्के आयात हे युद्धकाळात मागणी-पुरवठा आणि वितरण यांच्या दृष्टीने संपूर्ण देशामध्ये तेल-वायू पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मोठे आव्हान आहे. ई-वाहने अर्थात् विद्युत् (इलेक्ट्रिक) दुचाकी आणि चारचाकी वाहने वाढवून अतिरिक्त मुख्य भार नियंत्रित करणे आवश्यक आहे. कोळसा, लाकडे किंवा बायोगॅस यांचा वापर केला जाऊ शकतो. प्राप्त परिस्थितीत नवनवीन प्रयत्न करून संपूर्ण व्यवस्था कार्यान्वित आणि अद्ययावत् करणे क्रमप्राप्त ठरेल.
भारताची दैनंदिन तेल आणि वायू यांची मागणी प्रतिदिन सध्या अनुमाने ५० लाख पिंप (बॅरल) आहे, ज्यापैकी ८० ते ८५ टक्के आयात केली जाते. देशाची तेल आयात मुख्यतः आखाती देशांमधून होते, ज्यात सौदी अरेबिया, इराक आणि कुवेत यांचा समावेश आहे.
भारत सरकारने तेल आयात स्रोतांचे विविधीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे, यात रशिया, अमेरिका आणि आफ्रिका या देशांचा समावेश आहे. भारतातून भूतान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका या शेजारी देशांनाही तेल उत्पादने अन् वायू यांचा साठा उपलब्ध करून दिला जातो.
– श्री. गिरीश पुजारी, मिरज, जिल्हा सांगली.

लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’ ग्रंथ : अभ्यासपूर्ण मननीय, चिंतनीय आणि संदर्भ ग्रंथ
सिनेमा आणि स्वतःची स्वप्ने : यशाविषयी सिनेमा काय प्रकट करतो ?
श्री शिवराज्याभिषेक आणि खोटे कथानक (नॅरेटिव्ह) !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण