गुरुकुल शिक्षणाची निरोगी क्रांतीच्या दिशेने वाटचाल !

१. गुरुकुलांच्या ऊर्जितावस्थेसाठी व्यवस्थेचा पाठिंबा आणि नवीन तंत्रज्ञान यांची आवश्यकता !

‘१० वर्षांपूर्वी गुजरातमधील एका गुरुकुलात माझी काही अत्यंत हुशार आणि उत्साही विद्यार्थ्यांशी भेट झाली. माझ्या मनात ही गुरुकुलपद्धत देशात मान्यताप्राप्त आहे का ?, हे विद्यार्थी शिक्षण पूर्ण झाल्यावर जगाशी जुळवून घेऊन रोजगार मिळवू शकतील का ? आणि येथे शिकवणार्‍या शिक्षकांची उपजीविका किती सुरक्षित आहे ?, असे ३ प्रश्न घोळत होते. जेव्हा मी या विद्यार्थ्यांना धोतर नेसून मल्लखांब सादर करतांना, प्रत्येक प्रश्न अत्यंत लक्षपूर्वक आणि समजून घेऊन उत्तर देतांना अन् जागतिक स्पर्धांमध्ये स्वतःचे गणिती कौशल्य सिद्ध करतांना पाहिले, तेव्हा मला आश्चर्य वाटले की, सरकार त्यांना प्रोत्साहन देण्यास आणि मान्यता देण्यास इतके घाबरत का आहे ?

या प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नात मी तेथे वैदिक गणित शिकवणार्‍या आचार्य जय राठोड यांच्याशी अनेकदा चर्चा केली. त्यांचा उत्साह आणि समर्पण पाहून मला वाटले की, यांसारख्या तरुणांचा गुरुकुलपद्धतीवरील अढळ विश्वास भविष्यातील भारताला आकार देऊ शकतो; पण त्यासाठी त्यांना व्यवस्थेचा पाठिंबा, नवीन तंत्रज्ञानाचे सहकार्य आणि भारतीय ज्ञानाला उपजीविकेशी जोडणार्‍या एका पद्धतशीर स्वरूपाची आवश्यकता आहे. त्या वेळी गुजरातीमध्ये चालवले जाणारे मुलींचे गुरुकुल पाहूनही फारसा दिलासा मिळत नव्हता. ते आधुनिक शिक्षण आणि सांसारिक व्यवहार यांपासून अलिप्त वाटत होते. तथापि आपण वर्षानुवर्षे साधेपणा आणि विनम्रता यांना मागासलेपणा समजण्याची चूक केली आहे.

असे असतांनाही एका विशिष्ट पंथाच्या आश्रयाखाली चालणार्‍या या गुरुकुलांमध्ये शिकवणार्‍या शिक्षकांची द्विधा मनःस्थिती दिसली. एकीकडे गुरुकुलपद्धतीत धर्मग्रंथानुसार आचरण, वर्तन आणि शिस्त यांचा आग्रह धरणारे शिक्षक आहेत, तर दुसरीकडे खासगी शिक्षण संस्थांमध्ये जसे दिसते, तसे गुरुकुलांवर आपल्या पंथीय चालीरिती लादू इच्छिणारे भांडवलदार व्यवस्थापक आहेत. भारताच्या ज्ञान परंपरांमधील हे अडथळे आणि विरोधाभास भांडवल अन् ज्ञान यांच्यात घर्षण निर्माण करतात, जे पूर्वी एकमेकांना पूरक होते. भांडवलाच्या आश्रयाखेरीज ज्ञान समृद्ध कसे होऊ शकेल ? राजेशाहीचा तोच काळ समृद्धी आणि सन्मानाचा होता, जेथे विद्वान आणि धोरणे यांचा आदर केला जात असे.

२. सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे गुरुकुलातील विद्यार्थ्यांसाठी व्यापक संधीची दारे उघडी

डॉ. क्षिप्रा माथूर

आज एक दशकानंतर सरकारने सिद्ध केलेली नवीन प्रणाली आणि नवीन शिक्षण धोरण यांमध्ये गुरुकुल प्रणालीला दिलेली मान्यता अन् महत्त्व यांचे बारकाईने निरीक्षण केल्यावर असे दिसते की, देशात बरेच काही पालटले आहे. काही कट्टरपंथियांमुळे जग युद्धात ओढले जात असतांना भारताची जिज्ञासू आणि नाविन्यपूर्ण तरुण पिढी राष्ट्राच्या मुळांचे पोषण करण्यासाठी नवीन बीज पेरत आहे. नवीन शिक्षण धोरण लागू झाल्यापासून संस्कृत, भारतीय ज्ञान परंपरा आणि इतर अभ्यासक्रम यांनी स्वतःचे स्थान पक्के केले आहे. लोकांची आवडही वाढली आहे. गुरुकुलाच्या विद्यार्थ्यांसाठी उघडलेल्या नवीन संधींमुळे भारतीय ज्ञानाला शासन आणि प्रशासन यांच्या रचनेत त्याचे योग्य स्थान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ते त्यांच्या भविष्यासाठी पाया सिद्ध करू शकतील आणि नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेऊन अमर्याद शक्यतांना आकार देऊ शकतील. पुढे जाण्यापूर्वी आपण गुरुकुलाच्या इतिहासाचा थोडक्यात आढावा घेऊया.

३. स्वातंत्र्योत्तरकाळात गुरुकुल परंपरा पुनर्जीवित करण्यासाठी भारत सरकारचे उदासिन धोरण

स्वातंत्र्यानंतर ब्रिटिशांचे अनुकरण करणारा आणि त्यांच्यासारखीच जीवनशैली जगणारा एक उच्चभ्रू वर्ग अन् सरकारचे आदेश पार पाळणारा एक बाबू (अधिकारी) वर्ग उदयास आला. शिक्षण आणि ब्रिटीशधार्जिणी मानसिकता यांच्याद्वारे समाजात करता येईल, तेवढी विभागणी केली गेली. ब्रिटीश राजवटीच्या समाप्तीनंतर भारतीय शिक्षणव्यवस्था जिवंत ठेवण्यासाठी नोव्हेंबर १९८९ मध्ये भारत सरकारने ‘राष्ट्रीय मुक्त शाळा’ स्थापन केली. तथापि सरकारने कोणतीही गंभीर कार्यवाही केली नाही किंवा तिला जागृत करण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही. तोपर्यंत गुरुकुलव्यवस्था पूर्ण कोलमडली होती. ती जेथेही टिकून राहिली, ते केवळ स्वतःचा वारसा गमावण्यास सिद्ध नसलेल्या जागरूक समाजामुळेच शक्य झाले. ज्यांना गुरुकुल शिक्षणव्यवस्थेत स्वतःच्या अस्तित्वाची झलक दिसली, त्यांनी ती पूर्ण शक्तीने जिवंत ठेवली. देशाच्या विविध भागांमध्ये लुप्त होत चाललेले ज्ञान, विद्या शाखा आणि कला यांचे जतन अन् संवर्धन करण्याचे कार्य चालू राहिले.

४. स्वदेशी शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘भारतीय शिक्षण मंडळा’ची स्थापना

वर्ष २०२२ मध्ये स्वदेशी शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ‘भारतीय शिक्षण मंडळा’ची स्थापना केली, ज्याचे दायित्व ‘पतंजलि योगपिठा’कडे सोपवण्यात आले. त्या माध्यमातून शाळा, गुरु-शिष्य परंपरा आणि गुरुकुल या तिन्हींना मान्यता दिली जात आहे. आधुनिक शिक्षणामध्ये भारतीय ज्ञानाचा समावेश करून नवीन अभ्यासक्रम विकसित करणे आणि जागतिक नेतृत्व घडवणे, हे त्याचे ध्येय आहे. उच्च शिक्षणासाठी सरकारने ‘केंद्रीय संस्कृत विद्यापिठा’त (सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीमध्ये) अनेक अभ्यासक्रम चालू केले आहेत, जे विशेषतः गुरुकुल विद्यार्थ्यांसाठी सिद्ध करण्यात आले आहेत. गुरुकुलातील विद्यार्थ्यांना आयुर्वेद, कायदा आणि प्रशासकीय सेवा यांमध्येही प्रवेश देण्याची सिद्धता चालू आहे.

इंग्रजांकडून लक्षावधी गुरुकुले नष्ट


उज्जैन शहरातील अवंतिका येथील सांदिपनी ऋषींच्या आश्रमात कृष्ण आणि बलराम यांनी ६४ कला आणि १४ विद्या यांचे ज्ञान ग्रहण केले. केवळ ज्ञान आणि कलांनी परिपूर्ण असलेल्या व्यक्तींमध्येच नेतृत्वगुण असतो. धर्मपालच्या ‘द ब्युटीफुल ट्री’ या ग्रंथात उल्लेख आहे की, वर्ष १८३० मध्ये भारतात ७ लाख ३२ सहस्र गुरुकुल होते. लॉर्ड मॅकॉले आणि थॉमस मुनरो यांनी केलेल्या सर्वेक्षणांमुळे ब्रिटिश अधिकार्‍यांची खात्री पटली की, भारताला गुलाम बनवण्याच्या मार्गातील खरा अडथळा ही ‘संस्कृती’च होती. तेव्हापासून गुरुकुल शिक्षण बंद करण्याचा आणि त्यांचे अनुदान थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. देशाला आज्ञाधारक आणि पारतंत्र्यास सक्षम बनवण्यासाठी इंग्रजी विचारांनी ओतप्रोत भरलेले शिक्षण लागू करण्यात आले.

– डॉ. क्षिप्रा माथूर, लेखिका, अभ्यागत प्राध्यापिका आणि पत्रकार, जयपूर, राजस्थान.

५. गुरुकुलातील विद्वानांसाठी सेतूबंध विद्वान योजना

आयुर्वेदिक चिकित्सक होण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘राष्ट्रीय पात्रता परीक्षे’च्या धर्तीवर ‘आयुर्वेद कार्यक्रम प्रवेश परीक्षा’ (आयुर्वेद प्रोग्राम एंट्रेंस टेस्ट) घेतली जाईल. विश्वविद्यालयांमध्ये ‘आयुर्वेद गुरुकुलम्’ स्थापन केले जातील, ज्याचा प्रारंभ नाशिक आणि देहली येथील ‘कॅम्पस’पासून होईल. ‘सेतूबंध’ नावाची योजना गुरुकुल परंपरेची पुनर्स्थापना करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. या ‘केंद्रीय संस्कृत विद्यापिठा’च्या या योजनेअंतर्गत गुरुकुल विद्यार्थ्यांना ‘आयआयटी’मध्ये संशोधन करण्याची आणि इतर विविध अभ्यासक्रम निवडण्याची संधी मिळेल. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्तीचेही प्रावधान करण्यात आले आहे. ही योजना पारंपरिक गुरुकुल शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना औपचारिक पदवीविना ‘भारतीय तंत्रज्ञान संस्था’ (आयआयटी), ‘भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था’ (आय.आय.एस्.ई.आर्.) आणि इतर नामांकित तांत्रिक संस्था यांमध्ये संशोधन करण्याची संधी देते. ६ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक परिषद मान्यताप्राप्त अभ्यासक्रमही या सत्रात चालू होत आहेत.

६. गुरुकुल शिक्षणाची आधुनिक शिक्षणाशी सांगड

राजस्थानमधील नागौरचा रहिवासी असलेला जय हा युवक आधुनिक विज्ञानाचा विद्यार्थी होता आणि त्याला वैदिक गणिताच्या खोलीविषयी माहिती नव्हती. तथापि तो ते योग्य प्रकारे शिकला. त्यानंतर गुरुकुल परंपरा आणि वैदिक ज्ञान यांनी त्याला इतके मोहित केले की, त्याने ते त्याच्या जीवनशैलीत समाविष्ट केले, तसेच शेवटी तेच त्याच्या उपजीविकेचे साधनही बनवले. गुरुकुलामध्ये दीड दशकांहून अधिक काळ शिकवतांना त्याने शेकडो विद्यार्थ्यांना भारतीय गणितीय परंपरेशी जोडले, तसेच ‘आधुनिक विषय आणि मुख्य प्रवाहातील शिक्षण प्रणालीशी जोडले जाण्यासाठी गुरुकुल हा एक अडथळा आहे’, हा अपसमज दूर केला. त्याची एक विद्यार्थिनी गुरुकुलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर सनदी लेखापाल (सीए) बनली. अन्य विद्यार्थी विज्ञान शाखेत शिकत आहेत आणि अनेकांनी योगशास्त्रात पदवी मिळवली आहे.

विदेशात स्थायिक झालेल्या भारतीय वंशाचे युवकही भारतीय ज्ञानात रस घेऊन त्यात रोजगाराची संभावना पहात आहेत. ‘सेतूबंध’ योजनेच्या अंतर्गत त्याच्या गुरुकुलामध्ये शिकलेल्या एका मुलीची ‘भारतीय तंत्रज्ञान संस्थे’त (‘आयआयटी’त) निवड झाली. त्यांचे अनेक विद्यार्थी भारतीय ज्ञानामध्येच पारंगत होऊन चांगले उत्पन्न मिळवत आहेत. अनेक ठिकाणी नवीन गुरुकुल स्थापन करण्यास साहाय्य करणारा जय आचार्यांच्या भूमिकेत रहातांना एका ‘आभासी गुरुकुला’ ची (व्हर्च्युअल गुरुकुलाची) रूपरेषा सिद्ध करण्याचे काम करत आहे. हे पाहून असे वाटले की, प्रतिभेचे असे दृढ प्रयत्न रोजगार निर्मितीसाठी अनेक मार्ग उघडतील.

७. नवीन पिढीने जीवन समृद्ध करण्यासाठी आधुनिक आणि प्राचीन ज्ञान यांचा उपयोग करणे आवश्यक !

अशा नवनवीन शोधांमध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेची (‘एआय’ची) उपयुक्तता प्रचंड आहे, जी विविधतेने नटलेल्या देशाला अन् जगाला जोडून प्राचीन ज्ञानाला जिवंत रूप देऊ शकते. कोणत्याही नवीन गुरुकुलात भाषाशास्त्र प्रयोगशाळा आणि गुरु-शिष्य परंपरेला साकार करणारे वातावरण असावे, अशी आचार्यांची निश्चितच अपेक्षा असते. एकाच गुरूने शिकवलेल्या शिष्यांनी गुरुकुलात येऊ न शकणार्‍या विद्यार्थ्यांनाही शिकवावे, असे एक स्वप्न आहे.

काही वर्षे या कामाचे निरीक्षण केल्यानंतर आता हे स्पष्ट झाले आहे की, जयसारखे अनेक तरुण ग्रामीण अर्थव्यवस्थेला नव्याने आकार देण्यास पूर्णपणे सक्षम आहेत. त्यांना सक्षम करण्याचे मार्ग तात्काळ उघडले पाहिजेत. जर गावातील आणि शहरातील तरुण-तरुणींनी आधुनिक अन् प्राचीन ज्ञानाचा उपयोग त्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी केला, तर आर्थिक समीकरणे पालटण्यास फार वेळ लागणार नाही. महिलांना घरबसल्या ज्योतिष, गणित, आयुर्वेद आणि योग यांसारखे विषय शिकवून त्यांना उपजीविकेसाठी सिद्ध करण्याचीही योजना आहे. आत्मसन्मान टिकवण्यासाठी स्वावलंबन हाच एकमेव मार्ग आहे. ‘आभासी’ गुरुकुल ही देशात घडत असलेली एक स्वस्थ आणि सूक्ष्म क्रांती आहे, ज्याचा महिलांच्या सहभागामुळे सर्वाधिक लाभ होईल; कारण हा केवळ देशांतर्गत सकल उत्पादन (जीडीपी) वाढवण्याचा प्रश्न नाही, तर भारतीय अर्थव्यवस्थेला आकार देण्याचाही प्रश्न आहे.

– डॉ. क्षिप्रा माथूर, लेखिका, अभ्यागत प्राध्यापिका आणि पत्रकार, जयपूर, राजस्थान.

संपादकीय भूमिका

आताच्या शिक्षणप्रणालीत आधुनिक आणि प्राचीन ज्ञानाचा उपयोग केल्यास जीवन समृद्ध होण्यासह आर्थिक समीकरणे पालटतील !