Pakistan Minorities Forum : कराची (पाकिस्तान) येथील ऐतिहासिक इमारतीवरील हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड

(ही छायाचित्रे छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. –  संपादक)

कराची (पाकिस्तान) – येथे एका ऐतिहासिक इमारतीच्या भिंतींवर असलेल्या हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे अल्पसंख्य हिंदूंनी संताप व्यक्त केला आहे; मात्र पाकिस्तानमधील सत्ताधार्‍यांनी यावर मौन बाळगले आहे. पोलिसांकडूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.

पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील बहावलपूर जिल्ह्यातील अल्पसंख्य हक्क संघटनेचे अध्यक्ष शिव कच्छी यांनी ‘एक्स’वर लिहिले की,

१. कराचीतील ऐतिहासिक ‘सगन मॅसन’ इमारतीत भगवान श्रीकृष्ण आणि गोपी यांच्या मूर्तींचा केलेला अवमान अत्यंत निंदनीय आहे. ही केवळ एका इमारतीची हानी नसून पाकिस्तानच्या बहुसांस्कृतिक वारशावर, धार्मिक सौहार्दावर आणि अल्पसंख्य समुदायांच्या भावनांवर आघात आहे. या लज्जास्पद प्रकाराचा तीव्र निषेध करणे आवश्यक आहे.

२. कराचीतील एम्.ए. जिन्ना रोडवरील ही ऐतिहासिक इमारत वर्ष १९३७ मध्ये उभारण्यात आली असून ती हिंदूंच्या धार्मिक प्रतीकांच्या समृद्ध उपस्थितीचे द्योतक आहे. भगवान श्रीकृष्ण आणि गोपी यांच्या मूर्तींचे मस्तक तोडणे हा केवळ धार्मिक अनादर नसून सामायिक वारशाची हानी आहे. संबंधित अधिकार्‍यांनी तात्काळ या प्रकरणाची नोंद घ्यावी, दोषींना विलंब न लावता अटक करून कठोर शिक्षा द्यावी, तसेच या ऐतिहासिक इमारतीचे त्वरित पुनर्स्थापन करून तिची सुरक्षा सुनिश्‍चित करावी, अशी मागणी त्यांनी केली.

संपादकीय भूमिका  

इतकी वर्षे या मूर्ती अद्यापही सुरक्षित होत्या, याचेच आश्‍चर्य वाटण्यासारखी पाकिस्तानमधील स्थिती आहे ! अशा घटना जगभरातील हिंदूंना लज्जास्पद आहेत !