US Iran War : करार केला नाही, तर इराणला पाषाण युगात पोचवू ! – ट्रम्प यांची चेतावणी

२-३ आठवड्यांत मोठे आक्रमण करण्याची चेतावणी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

नवी देहली – जर करार झाला नाही, तर अमेरिका इराणला पाषाण युगात परत पाठवेल, अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी देशाला संबोधित करतांना दिली. ट्रम्प यांनी अमेरिकेने इराण युद्ध जिंकल्याचा दावा केला, तसेच येत्या २-३ आठवड्यांत इराणवर मोठे आक्रमण करण्याची चेतावणी दिली.

ट्रम्प यांनी पुढे सांगितले की,

१. इराणची क्षेपणास्त्र आणि ड्रोन क्षमता, तसेच नौदल नष्ट करण्यात आले आहे. त्याची सैनिकी शक्ती लक्षणीयरित्या दुर्बल झाली आहे. अमेरिका हळूहळू आणि पद्धतशीरपणे इराणची ती शक्ती नष्ट करत आहे, जी अमेरिकेला धोका निर्माण करू शकते किंवा आपल्या देशाबाहेर प्रभाव टाकू शकते. या सैनिकी मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट पूर्णत्वाकडे येत आहे.

२. इराणचे सर्व प्रमुख नेते मारले गेले, सत्तांतर झाले आहे.

३. इराणने स्वतःच्याच ४५ सहस्र लोकांना ठार मारले.

. इराणला अणूशक्ती बनू दिले जाणार नाही.

५. ज्यांना हॉर्मुझच्या तेलाची आवश्यकता आहे, त्यांनी त्याचे रक्षण करावे, आम्हाला त्याची आवश्यकता नाही.

६. सौदी अरेबिया आणि बहरीन यांना एकटे सोडले जाणार नाही.

युद्ध, चर्चा आणि शस्त्रसंधी यांच्या चक्रात अडकणार नाही ! – इराण

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई म्हणाले की, युद्ध, चर्चा आणि शस्त्रसंधी यांच्या पुनरावृत्तीच्या चक्रात आम्ही अडकणार नाही. हे स्वरूप यापुढे स्वीकारार्ह असणार नाही. सध्याचा संघर्ष केवळ इराणसाठीच नव्हे, तर संपूर्ण प्रदेशासाठी विनाशकारी आहे. त्यामुळे जोपर्यंत अमेरिका आणि इस्रायल यांची आक्रमणे चालू रहातील, तोपर्यंत इराण प्रत्युत्तर देत राहील. इराणला शेजारील देशांशी चांगले संबंध राखायचे आहेत; परंतु अमेरिका आणि इस्रायल इराणवर आक्रमण करण्यासाठी या देशांच्या भूभागाचा वापर करत आहेत.

बहरीनमधील अ‍ॅमेझॉनच्या कार्यालयावर इराणचे आक्रमण

AI निर्मित चित्र

इराणने बहरीनमधील अमेरिकी आस्थापन ‘अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेस’च्या ‘डेटा सेंटर’वर आक्रमण केले. यामुळे तेथे आग लागली. आखाती देशांत असलेल्या १८ अमेरिकी आस्थापनांना लक्ष्य करण्याची धमकी इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’ने दिल्यानंतर दुसर्‍याच दिवशी हे आक्रमण झाले. १८ आस्थापनांमध्ये मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल, गूगल आणि मेटा यांचा समावेश आहे.

…तोपर्यंत युक्रेनला शस्त्रांस्त्रांचा पुरवठा थांबवू ! – ट्रम्प यांची युरोपीय देशांना चेतावणी

जोपर्यंत युरोपीय मित्र देश हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यासाठी साहाय्य करत नाहीत, तोपर्यंत युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा थांबवू, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली. त्यानंतर ट्रम्प यांनी ‘नाटो’च्या ‘प्रायोरिटाइझ्ड युक्रेन रिक्वायरमेंट्स लिस्ट’ उपक्रमाला सैनिकी साहित्याचा पुरवठा थांबवण्याचीही धमकी दिली. या उपक्रमाद्वारे युक्रेनसाठी शस्त्रास्त्रांची खरेदी केली जाते आणि यासाठी युरोपीय देशांकडून निधी दिला जातो.

इराणमध्ये सैन्य उतरवल्यास कुणीही जिवंत परतणार नाही ! – इराणचे अमेरिकेला प्रत्युत्तर

इराणचे सैन्यदलप्रमुख मेजर जनरल अमीर हातामी

ट्रम्प यांनी इराणमध्ये सैन्य उतरवणार असल्याचे सांगितल्यानंतर इराणने त्याला प्रत्युत्तर दिले आहे. इराणचे सैन्यदलप्रमुख मेजर जनरल अमीर हातामी यांनी सांगितले की, जर शत्रूने भूमीवरून आक्रमण केले, तर एकही व्यक्ती जिवंत परत जाणार नाही. जोपर्यंत आम्ही आमची निर्धारित उद्दिष्टे साध्य करत नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या शत्रूचा पाठलाग करणे थांबवणार नाही.

संपादकीय भूमिका

एप्रिल महिन्यात तिसरे महायुद्ध होण्याची, तसेच अणूबाँब टाकण्याची शक्यता आहे, असे ज्योतिषांनी वर्तवलेले भविष्य आहे. ते पहाता ट्रम्प यांचे विधान याच स्थितीकडे घेऊन जात आहे का ? असा प्रश्‍न निर्माण होतो !