पुनर्वैभवाच्या प्रतीक्षेत पराक्रमी राजा ललितादित्याचे काश्मीर !

१. ‘काश्मीरचा अलेक्झांडर’ सम्राट ललितादित्य !

‘लिलतादित्य हा दुर्लभक प्रतापादित्य काश्मिरी राजाचा तिसर्‍या क्रमांकाचा पुत्र होता. त्याचा कार्यकाळ अनुमाने वर्ष ७२४-७६० मधील होता. हा काश्मीरच्या कर्कोटा घराण्यातील एक अत्यंत पराक्रमी आणि महान हिंदु सम्राट होता. त्याने मोठ्या सैनिकी मोहिमा राबवल्या आणि काश्मीरला मध्य आशिया अन् भारताच्या मोठ्या भागापर्यंत विस्तारून महाशक्ती बनवले. युद्ध करतांना तो कधीही थकत नव्हता आणि सदा तत्पर राहून शत्रूंचा नाश करत होता. सम्राट अशोकानंतर हा दुसरा हिंदु राजा होता, ज्याने हिंदुस्थानच्या बाहेर जाऊन त्याच्या राज्याच्या सीमा वाढवल्या आणि देशाच्या बाहेरील प्रदेश जिंकून त्यांना हिंदुस्थानला जोडले. त्याने अरबी आक्रमकांना यशस्वीपणे थोपवले आणि तिबेटी सैन्याला पराभूत केले. चीन आणि यशोवर्मन (कन्नौजचा राजा) यांसारख्या बलाढ्य सत्तांनाही त्याने धूळ चारली होती. ८ व्या शतकातील या महान सम्राटाने त्याच्या पराक्रमामुळे भारतीय इतिहासात विशेष स्थान बनवले होते. यासमवेतच ललितादित्यने अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान, तिबेट, लडाखपासून थेट बंगाल आणि नर्मदा नदी इथपर्यंत साम्राज्य विस्तार केला. ललितादित्य राजाला ‘काश्मीरचा अलेक्झांडर’ असेही म्हटले जाते.

राजा ललितादित्यच्या पराक्रमामुळे आजही गुढीपाडव्यानंतर आणि काश्मीरमध्ये ओळखल्या जाणार्‍या ‘नवरेह’ नंतरचा दुसर्‍या दिवशी काश्मिरी राजाच्या पराक्रमाची आठवण म्हणून ‘शौर्य दिवस’ पाळला जातो. तो एक महान विजेता असण्यासह एक चांगला निर्माताही होता. त्याने परिहासपूर ही राजधानी वसवली, जी स्थापत्य कला आणि संस्कृतीची ओळख देणारी आहे.

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

२. मार्तंड सूर्यमंदिराचा निर्माता

ललितादित्य याने काश्मीरमधील अनंतनाग येथे भगवान सूर्याचे प्रसिद्ध भव्य ‘मार्तंड सूर्यमंदिर’ बांधले, जे त्याच्या स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. वर्ष १३९० मध्ये बुतशिकन स्वतःला सुलतान सिकंदर समजणार्‍या या धर्मांध आक्रमकाने हे सूर्यमंदिर नष्ट करायचा प्रयत्न केला. अलीकडे वर्ष २०२६ च्या याच मंदिरात हेरथ नावाने ओळखण्यात येणारी शिवरात्र भक्तीभावाने साजरी झाली.

३. काश्मीरमध्ये चैत्र शुक्ल प्रतिपदेला साजरा होणारा ‘नवरेह’ सण

‘नवरेह’ हा शब्द संस्कृतमधील ‘नव-वर्ष’ या शब्दावरून आला आहे. हा काश्मिरी  पंडितांचा नवीन वर्षाचा दिवस असतो. महाराष्ट्रात आपण ‘गुढीपाडवा’ साजरा करतो, त्याचप्रमाणे काश्मीरमध्ये ‘नवरेह’ साजरा केला जातो. गुढीपाडव्याला आपण गुढी उभारतो, त्याचप्रमाणे काश्मिरी हिंदु पंडित नवरेहच्या आदल्या रात्री एक ‘थाळी’ (ताट) सजवतात. त्यात तांदूळ, दही, अक्रोड, सोन्याचे किंवा चांदीचे नाणे, एक आरसा, पंचांग, काही औषधी फुले-पाने आणि खडीसाखर असते. नवीन वर्षाच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम या ‘थाळी’चे दर्शन घेतले जाते. त्यामुळे संपूर्ण वर्ष समृद्धीचे जाते, असे समजले जाते. हा दिवस काश्मिरी हिंदु पंडित त्यांची कुलदेवी ‘माता शारिका’ (हरि पर्वत) हिला समर्पित करतात. या दिवशी नवीन पंचांग वाचले जाते आणि वर्षाचे भविष्य पाहिले जाते.

गुढीपाडवा आणि नवरेह हे दोन्ही सण चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच येतात. दोन्ही सण वसंत ऋतूच्या आगमनाचे आणि निसर्गातील नवचैतन्याचे प्रतीक आहेत. ज्याप्रमाणे आपण कडुलिंबाचा प्रसाद घेतो, तसे काश्मिरी पंडित अक्रोड आणि पालेभाज्या यांचा विशिष्ट प्रसाद घेतात. थोडक्यात सांगायचे, तर नवरेह हा सण काश्मीरचा गुढीपाडवाच आहे.

४. काश्मीरला पुनर्वैभव मिळवून देणे, हे भारतियांचे कर्तव्य ! 

काश्मीर ही शिव-पार्वतीसह आद्यशंकराचार्य, राजा ललितादित्य यांसारख्या देव, महात्मे आणि तेजस्वी ऋषिमुनी यांची भूमी आहे. अशा पराक्रमी आणि सर्व दृष्टीने धुरंधर असलेल्या व्यक्तींची भूमी आज परकीय धर्मांध आक्रमक अन् जिहादी यांच्या नियंत्रणात आहे. केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीर सरकार यांनी आवाहन करून कलम ३७० आणि ३५-अ (जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारी कलमे) रहित केल्यानंतरही काश्मिरी हिंदु त्यांच्या भूमीत परतू शकले नाहीत. हे कटू सत्य सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे. हे लक्षात ठेवले, तरच हिंदूंंमधील ब्राह्मतेज आणि शौर्य जागृत होईल अन् त्यांना सर्वधर्मसमभावामागील खरे स्वरूप कळेल !’

श्रीकृष्णार्पणमस्तु ।

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (२९.३.२०२६)