‘काही संत साधकांना साधनेचे महत्त्व पटवून सांगण्यासाठी येणार्या आपत्काळाचे गांभीर्य समजावून सांगतात, तसेच ‘किमान आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी तरी साधना करा’, असे दिशादर्शन करतात. या मार्गदर्शनासंबंधी योग्य चिंतनाद्वारे बोध करून न घेतल्याने काही जणांकडून आपत्काळाच्या किंवा मृत्यूच्या भयापोटी साधना केली जाते, तर काही जण ‘कधी ना कधी मृत्यू येणारच आहे, तर त्याला घाबरायचे कशाला ?’, असे म्हणून साधना करण्यास टाळाटाळ करतात. काही जण स्वतःला समजेल, आकलन होईल, अशा परिभाषेत आपत्काळ समजून घेण्याचा प्रयत्न करतात. ‘अद्याप आपत्काळ आलेला नाही. जेव्हा येईल, तेव्हा पाहू. सर्वांचे होईल, तेच आमचे होईल’, असे काही गैरसमज मनाशी बाळगून साधनेत चालढकल करतात. काहींना ‘संत-महात्मे मृत्यूची भीती दाखवत आहेत’, असाही विकल्प येतो. या दृष्टीने साधना नेमकी का करायची असते ? आणि मनुष्याला साधनेची आवश्यकता काय ? हे जर समजून घेतले, तर आपत्काळ, मृत्यू आणि साधना यांची योग्य वैचारिक सांगड घालून साधनेत योग्य वाटचाल करता येईल अन् दृष्टीकोन स्पष्ट झाल्याने जीवन सुकर होईल, या दृष्टीने हा लेख आहे !
१. मृत्यू हे शाश्वत सत्य
मृत्यू हा अटळ आहे. प्रत्येक जण कधी ना कधी मरणारच आहे. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नेहमी सांगतात, ‘जन्म, मृत्यू आणि विवाह’, या तीनही गोष्टी १०० टक्के प्रारब्धानुसारच होतात. साक्षात् ईश्वरही व्यक्तीच्या प्रारब्धात ढवळाढवळ करत नाही.’

प्रारब्ध म्हणजे आपल्या मागील जन्मांचे कर्मफल असल्याने ते भोगून संपवणेच आवश्यक असते. तसे प्रारब्ध आपोआप न्यून होत नाही. चांगले कर्म केल्यास चांगले फळ आणि वाईट कर्म केल्यास वाईट फळ भोगणे अनिवार्यच. त्यामुळे आपण साधना केली, तर प्रारब्धवशात असलेला एखाद्याचा मृत्यू टळेल, असे नसते; परंतु एखाद्याची साधनेची पुष्कळ तळमळ असेल आणि त्याची याच जन्मी चांगली आध्यात्मिक उन्नती होणार असेल किंवा एखाद्या जिवाकडून चांगले धर्मकार्य घडत असेल, तर मात्र ईश्वर गुरूंच्या माध्यमातून त्याच्यावरील महामृत्यूयोगासारखे संकटही दूर करून त्याला साधनेला काही काळ उपलब्ध करून देतो. अर्थात् ईश्वराने आपल्याला ही संधी द्यावी, यासाठी खडतर साधना करणेच आवश्यक असते.
२. संत-महात्मे मृत्यू समोर असल्याचे सांगून साधना करण्यास का सांगतात ?
कुणाचा मृत्यू कधी आणि कसा होणार ? त्याचे आयुष्य किती शिल्लक आहे ? कोणत्या कारणाने मृत्यू होणार ? हे सर्व सुनिश्चित असतांना संत-महात्मे सतत ‘मृत्यू समोर आहे, त्यामुळे साधना करा’, असे मार्गदर्शन का करतात ? असा प्रश्न साहजिकच सर्वांना पडतो. साधनेमुळे मृत्यू टळणार का ?, तर नाही. मृत्यूपासून अभय नाही. येथे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे, ‘साधना म्हणजे जीवनविमा नाही !’ ‘आपण साधक झालो, म्हणजे आपला जीवनविमा निघाला, आपण मृत्यूच्या भयापासून मुक्त झालो’, असे नाही.
मृत्यूचे कारण सांगून साधना करण्यास उद्युक्त् करण्याचे महत्त्वाचे आणि मूलभूत कारण असे की, साधना ही केवळ मनुष्य जन्मातच करता येते; कारण अन्य भोगयोनी आहेत. ‘आपल्या या जन्मातील कर्मफलामुळे पुढील जन्म मनुष्याचाच मिळेल’, याची शाश्वती काय ?; कारण ‘अन्ते मतिः सा गतिः ।’ या वचनाप्रमाणे मृत्यूसमयी जिवाचे जसे विचार असतात, तशी त्याला पुढची गती मिळते. आपल्या मनात मृत्यूसमयी साधनेचा विचार असल्यास पुढील जन्म साधनेला पूरक असा मिळेल, म्हणजे मृत्यू तर येणारच आहे; परंतु मृत्यू येईपर्यंत जर आपल्या मनावर साधनेचा संस्कार झाला, तर मृत्यूनंतर आपल्याला पुढील मनुष्यजन्मात तेथून पुढची साधना चालू करता येईल.
थोडक्यात पुढच्या जन्मी साधनेचा प्रवास चालू राहील; परंतु ‘मृत्यू लांब आहे’, या विचाराने आपण जर साधनेपासून लांब राहिलो आणि व्यवहारात स्वतःला गुरफटून घेतले, तर या जन्मात आपल्या चित्तावर अनंत संस्कार होतील अन् मृत्यूसमयी भगवंताचे नाम मुखात न आल्यामुळे पुढचा मृत्यूत्तर प्रवास ज्या गतीने व्हायला हवा, त्या गतीने न होता परत आपण भौतिक सुखाच्या आहारी जाऊ. साहजिकच मनुष्य जन्माचे जे सार्थक आपण करून घेणे संतांना अपेक्षित आहे, ते होणार नाही. त्यामुळेच संत-महात्मे मृत्यूचा दाखला देऊन सातत्याने साधना करण्याचा आग्रह करत असतात.
आज साधना चालू केली, तरच आपत्काळात निभाव लागणार !

एखादी व्यक्ती त्याच्या प्रारब्धानुसार किंवा पूर्वपुण्याईमुळे आपत्काळातही जिवंत राहू शकते; परंतु प.पू. गगनगिरी महाराज त्यांच्या मार्गदर्शनात एकदा म्हणाले होते, ‘पुढे येणारा आपत्काळ इतका भयानक असणार की, आम्हा संतांनाही वाटेल, आधीच डोळे मिटले असते, तर बरे झाले असते !’

संतांनी सांगितलेल्या आपत्काळाविषयीच्या भीषणतेविषयी ऐकून त्या आपत्काळात माणसाचे मानसिक संतुलन कितपत टिकून राहील, याविषयी साशंकता आहे. आज आपल्याला अगदी छोटी आव्हानेही पेलवतांना नाकीनऊ येतात, तर अशा परिस्थितीत ‘आपल्या डोळ्यांसमोर नातेवाइकांचे मृत्यू झाले किंवा कुणी जवळचे नातेवाईक युद्धजन्य परिस्थितीत अपंग, अंध अथवा अधू झालेले पाहून किंवा आपली संपत्ती कुणी लूबाडून नेली अथवा आपल्या जवळच्या वाटणार्यांनी आपला घात केला’, असे काही झाले, तर खरोखर कल्पना करा की, स्वतःचे मानसिक संतुलन टिकून रहाणार का ?
केवळ आणि केवळ साधना हाच असा मार्ग आहे की, जो माणसाचे मानसिक संतुलन टिकवून ठेवू शकतो. त्यामुळे आपण आज साधना चालू केली, तर मनावर योग्य संस्कार होऊन आपत्काळामध्ये स्थिर रहाता येणार आहे.
– श्री. योगेश जलतारे
३. आपत्काळ जवळ : साधना करा !
संत असेही दिशादर्शन करतात, याचे कारण काय, हेही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांच्या एका मार्गदर्शनात सांगितले आहे. ते म्हणतात, ‘‘कालमाहात्म्य फार मोठे असते. ‘काळ पालटू शकू’, असे सामर्थ्य आपल्यात कुणातच नसते. जेव्हा कलियुगाला आरंभ झाला, तेव्हा पांडव राजा परीक्षित याला कळले की, कलियुग पुष्कळ वाईट असणार आहे. कलीच्या प्रभावाने सर्व लोक साधना, उपासना, धर्म यांपासून पुष्कळ लांब जातील. हे कळल्यावर त्याने ‘कलियुग येऊच देणार नाही’, असा निश्चय करून प्रत्यक्ष काळालाच आव्हान दिले. तेव्हा ऋषिमुनींनी राजाला मार्गदर्शन केले आणि सांगितले, ‘‘कलियुग जरी वाईट असले, तरी अन्य युगांच्या तुलनेत या काळात सर्व जिवांची आध्यात्मिक उन्नती साधनेमुळे जलद होणार आहे. त्यामुळे ती एक प्रकारची इष्टापत्ती आहे. यातून मानवाचे कल्याणच होणार आहे. हे शास्त्र समजल्यानंतर राजा परीक्षिताने शस्त्र खाली ठेवले. कलियुगातील आपत्काळामध्ये थोडी जरी साधना केली, तरी त्याचे फळ कित्येक पटींनी अधिक मिळते.’’ त्यामुळे संत-महात्मे सातत्याने ‘आपत्काळ जवळ आला आहे. आतातरी साधना चालू करा’, असे आग्रहपूर्वक सांगत असतात.
आपत्काळात साधना करण्यास किंवा ती वाढवण्यास सांगण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण असे की, एखाद्या जिवाचे किंवा जिवाच्या नातेवाईकाचे काही बरे वाईट झाल्यास, उदाहरणार्थ युद्धाच्या परिस्थितीमुळे कुणी अपंग झाल्यास, एखाद्याचे डोळे गेल्यास किंवा एखाद्याच्या प्रिय व्यक्तीचे निधन झाल्यास त्याला जगणे नकोसे होईल, तर अशा परिस्थितीत साधना करणे तर दूर; पण जगण्यासाठीसुद्धा माणसाला संघर्ष करावा लागणार आहे. जर साधनेचे बळ पाठीशी असले, तर त्याही परिस्थितीमध्ये साक्षीभावाने आणि समाधानाने जीवन व्यतित करण्याचे सामर्थ्य केवळ साधनेने प्राप्त होईल. यासाठी साधनेला आजच आरंभ करायला हवा. जसे भविष्यातील सुखसोयी डोळ्यांसमोर ठेवून आपण अधिकोशात पैसे साठवतो आणि योग्य वेळ आल्यावर ते धन आपल्या स्वप्नपूर्तीसाठी किंवा सुखकर जीवन जगण्यासाठी वापरतो, तसे हे आहे.
आपत्काळ म्हणजे काय ?

आपण आपल्या दृष्टीकोनातून आपत्काळाकडे पहातो. येथेच खरे दुर्लक्ष होते. सर्वकाही ठीक असतांना अचानक प्रलय येईल का ? किंवा भूकंप होईल का ? किंवा मोठ्या प्रमाणात महापूर येईल का ? आग लागेल का ? असे विविध प्रश्न आपल्या मनात असतात; परंतु संतांच्या दृष्टीने आपत्काळाची व्यापकता केवळ युद्ध, नैसर्गिक आपत्ती, महामारी अशा भौतिक संकटांपुरती सीमित नसते, तर समाजाचे घसरते नैतिक मूल्यही संत-महात्म्यांच्या दृष्टीने मोठा आपत्काळच असतो. आज सर्वत्र युद्धजन्य परिस्थिती आपण अनुभवतच आहोत. कोरोना महामारीच्या काळात आपण एक वेगळा आपत्काळ अनुभवला, काहींनी नैसर्गिक आपत्तींचाही सामना केला आहे; पण नैतिकता हरवल्याने निर्माण झालेल्या आपत्काळाविषयी आपण तितकेसे सजग नाही.
काही वर्षांपूर्वी मुलगी तिचे वडील, भाऊ किंवा मामा यांच्यासमवेत सुरक्षितपणा अनुभवत असे; परंतु आज ती मुलगी या नातेवाइकांसह सुरक्षित राहीलच, याची खात्री आपल्याला देता येत नाही. आईच्या कुशीत मूल अत्यंत सुरक्षित अनुभव करत असते; परंतु आज आईनेच तिच्या पोटच्या मुलाचा खून केल्याच्या घटना आपण जेव्हा ऐकतो, तेव्हा याला आपत्काळ नाही, तर काय म्हणणार ?
आज आई-वडिलांशी बोलतांना मुलांमध्ये नम्रता अन् आदर दिसून येत नाही. आई-वडिलांना मुले आज अरे-तुरे म्हणतांना आढळतात. आचारधर्माचा तर विसरच पडला आहे. अशा कितीतरी गोष्टी आपल्याला उदाहरणादाखल अभ्यासता येतील.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनीही ३७८ वर्षांपूर्वी ‘तुकाराम गाथे’मध्ये सांगितले आहे,
उत्तमकुळीं जन्म क्रिया अमंगळ ।
बुडविलें कुळ उभयतां ।। – तुकाराम गाथा, अभंग ३९०७, ओवी २
अर्थ : कलियुगात लोक उच्च कुळात जन्म घेतील खरे; परंतु त्यांची कर्मे मात्र अतिशय वाईट किंवा अमंगळ असतील. यामुळे ते आपल्या पूर्वजांचे आणि स्वतःचे अशा दोन्ही कुळांचे नाव खराब करतील.
तुका म्हणे ऐसी कलयुगाची चाली ।
स्वार्थे बुडविलीं आचरणें ।। – तुकाराम गाथा, अभंग ३९०७, ओवी ३
अर्थ : कलियुगाची चालच अशी आहे की, प्रत्येक माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचे चांगले आचरण आणि नीतीमत्ता विसरून जाईल.
हे उदाहरण येथे वानगीदाखल दिले आहे. असे कितीतरी दाखले संतांनी ४०० वर्षांपूर्वीच देऊन ठेवले आहेत. आज तीच दुरवस्था आपण पहात आहोत. त्यामुळे संतांच्या दृष्टीने आपत्काळ ही संज्ञा पुष्कळ व्यापक आहे, ती केवळ युद्ध, नैसर्गिक आपत्ती इत्यादींपुरती सीमित नाही. त्यामुळे संत एखादे सूत्र परत परत सांगतात, तेव्हा त्यामागील कार्यकारणभाव समजून आचरण करणे फार महत्त्वाचे असते. आपण बुद्धीने प्रत्येक गोष्टीची मीमांसा करू लागलो, तर संतांच्या कथनामागील कारण कधीच लक्षात येणार नाही. त्यांनी सांगितल्याप्रमाणे कृती न केल्यामुळे आपण आपल्या जीवनाची हानी करून घेऊ.
– श्री. योगेश जलतारे
४. जीवनात होणारी हानी टाळण्यासाठी संतांचे आज्ञापालन करण्याची वृत्ती निर्माण होणे महत्त्वाचे !
काही वेळा संत एखादी गोष्ट सांगतात, ती आपण कृतीत आणतो; परंतु कालांतराने संत दुसरी गोष्ट सांगतात, तेव्हा ‘पहिली गोष्ट आधी का सांगितली ?’, असा विकल्प आपल्या मनात निर्माण होतो. काहींना ‘संतांनी सांगितले, तसे काही न झाल्याने स्वतःची हानी झाली’, असाही नकारात्मक विचार येतो; कारण सकृतदर्शनी तसे काही घडलेले नसते; परंतु ‘त्या माध्यमातून संतांनी आपले किती प्रारब्ध संपवले’, हे आपल्याला कळूच शकत नाही. संत आपल्याला साधनेसाठी अधिकाधिक काळ उपलब्ध व्हावा, यासाठी स्वतःचा एकेक श्वास वेचून आपत्काळाला थोपवून ठेवतात, यथासंभव तो साधकाच्या जीवनात येऊच नये, यासाठी ते जिवाचे रान करतात. त्यांनी प्रत्यक्षात आपल्या रक्षणासाठी काय केले, हे बुद्धीअगम्य असते. स्थुलातून पहायचे झाल्यास या माध्यमातून संतांचे ऐकण्याचा संस्कार आपल्यावर अवश्य होतो; कारण आज जर आपल्याला संतांचे ऐकायची सवय लागली, तर पुढे जेव्हा प्रत्यक्ष आपत्काळ येईल किंवा आलेला आपत्काळ रौद्ररूप धारण करील, तेव्हा संतांचे निर्विकल्प आज्ञापालन करण्याची सवय आपल्याला लागेल.
भगवान श्रीकृष्णाच्या काळात त्याने गोपगोपींना प्रथम गोकुळ सोडून वृंदावन येथे जायला सांगितले. पुढे कंस वधानंतर जरासंध सतत आक्रमण करू लागला, तेव्हा तो जनतेला मथुरा सोडून द्वारकेला घेऊन गेला. तेव्हा गोपगोपींनी श्रीकृष्णाचे आज्ञापालन केले, हा भाग आपण लक्षात ठेवून त्यांच्याप्रमाणे कृती करण्याची सवय मनाला लावायला हवी. आपत्काळासंबंधी संतांच्या मार्गदर्शनाचा बुद्धीने विचार केल्यास आपण अचूक निर्णय घेण्यात कमी पडू; कारण आपल्याला काळाची पावले कळत नाहीत, तर संत काळाच्या पलीकडे जाऊन मार्गदर्शन करत असतात.
त्यामुळे जीवनात पुढे होणारी हानी टाळण्यासाठी संतांनी सांगितल्याप्रमाणे आज नव्हे, तर आताच साधना आरंभ करणे अत्यंत आवश्यक आहे.
५. अध्यात्मात डोळस श्रद्धा हवी !
काही लोक थोडेथोडके धार्मिक कर्मकांड प्रतिदिन करतच असतात. देवाला तितके पुरेसे आहे. तोच आमचे रक्षण करणार, असे ते चारचौघांत बोलूनही दाखवतात. देव रक्षण करणार, हे निश्चितच आहे; परंतु त्यासाठी त्याचा भक्त होणे आवश्यक आहे; कारण ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्लोक ३१), म्हणजे ‘माझ्या भक्ताचा नाश होत नाही’, असे त्याचे वचन आहे. भक्ती निरंतर साधनेतून निर्माण होते. ‘भक्ती कशी वाढवायची ?’, याचे मार्गदर्शन देवच विविध संत-महात्म्यांच्या माध्यमातून करत असतो, हे लक्षात घेऊन आपण त्यांचे आज्ञापालन करायला हवे. अध्यात्मात डोळस श्रद्धा असावी लागते. त्यामुळे केवळ भाव असून चालत नाही, तर संतांचे गुरूंचे ऐकून तशी कृती सतत करणे आवश्यक असते. त्यातूनच त्यांची कृपा संपादन करता येते. ‘संतवचनाचे मर्म लक्षात येऊन त्यानुसार कृती करण्याची बुद्धी आम्हा सर्वांना होवो’, अशी गुरुचरणी प्रार्थना !
– श्री. योगेश जलतारे, संपादक, ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम समूह. (१४.३.२०२६)

अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
सर्वसाधारण व्यक्ती आणि साधक यांच्या विचारसरणीतील मूलभूत भेद !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
साधनेतील ‘स्वीकारणे’ या गुणाचे अनन्यसाधारण महत्त्व !
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी