ढोंगीबाबाच्या विळख्यात महाराष्ट्राचे पुरोगामी राजकारण !

 

१. महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षांचा ढोंगी पुरोगामीपणा

‘काही दिवसांपूर्वी ‘मुलींना आपण पोथ्या पुराणे वाचण्यात अडकवून ठेवले. अन्यथा त्यांची पुष्कळ प्रगती झाली असती. खरेतर आपण मुलींना त्यांच्या लग्नाच्या वेळी राज्यघटनेची प्रत द्यायला हवी’, असे वक्तव्य करणार्‍या महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. वास्तविक हिंदूंना धर्मशिक्षण दिले असते किंवा महिलांनी धार्मिक ग्रंथ भावपूर्ण वाचले असते, तर आज समाजात वेगळे चित्र दिसले असते. ज्या ढोंगी बाबाने, म्हणजेच अशोक खरातने शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केले, त्याला महिला आयोगाच्या या पुरोगामी म्हणवणार्‍या अध्यक्षांनी पाठीशी घातले. खासगी जीवनात भोंदूबाबाच्या नादी लागून त्यांनी त्याचे पाय धुतले आणि स्वतःच्या पदराने त्यांचे पाय पुसले, तसेच त्यांना स्वहस्ते केकही भरवला. त्यामुळे त्यांच्यावर आज वृत्तवाहिन्या आणि सामाजिक माध्यमे यांवर प्रतिदिन खालच्या पातळीवरून टीका चालू आहे.

२. महिला आयोगाच्या अध्यक्षांचा दायित्वशून्य कारभार

महिला आयोगाची स्थापना ही महिलांचे कल्याण करणे आणि त्यांचे वासनांधांपासून रक्षण करणे यांसाठी झालेली आहे; पण आयोगाने त्याचे काम पार पाडले नाही. काही दिवसापूर्वी पुणे परिसरातील वैष्णवी हगवणे हिला सासुरवाडीच्या लोकांनी छळ करून आत्महत्या करण्यास भाग पाडले. जिवंत असतांना तिने आणि एका वेगळ्या वेळी तिच्या जावेने सासुरवाडीतील छळवणुकीविषयी पोलिसांकडे तक्रार केली होती. महिला आयोगाकडेही साहाय्य मागितले होते; परंतु सासरवाडीची मंडळी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि धनदांडगे असल्याने त्यांनी आरोपींना पाठीशी घातले. पर्यायाने पीडितेला आत्महत्या करावी लागली. डॉ. संपदा मुंडेलाही आत्महत्या करणे क्रमप्राप्त ठरले. तिनेही अनेक वेळा पोलीस आणि महिला आयोग यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या दोन्ही प्रकरणांमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून चाकणकर यांची वर्तणूक आक्षेपार्ह ठरली. अगदी मनीषा भिसे या गर्भवती महिलेचा योग्य वैद्यकीय उपचाराअभावी मृत्यू झाला होता. या प्रकरणातही त्यांची भूमिका वादग्रस्त राहिली. कदाचित् या पीडितांचा शापच चाकणकर यांना भोगावा लागला नाही ना, असा कुणाच्या मनात विचार आल्यास चुकीचे ते काय ?

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

या भोंदूबाबाच्या विरुद्ध दीड वर्षांपूर्वी सिन्नर येथील ‘दैनिक खबरदार’मध्ये वृत्त प्रकाशित झाले होते. त्या वेळी त्या संपादकाविरुद्ध फौजदारी गुन्हे लावण्यात आले, तसेच त्यांना भोंदूबाबाची क्षमायाचना करायला लावली. हे सर्व महिला आयोगाच्या याच भूतपूर्व अध्यक्षांनी केले. त्याच वेळी या वासनांधाला अटक झाली असती, तर अनेक महिला अत्याचारांपासून वाचल्या असत्या. आता या भूतपूर्व अध्यक्षांना सहआरोपी करा, अशी मागणी त्यांच्या एकेकाळच्या सहचारिणी करत आहेत. पापाचा घडा भरल्यावर काळ बरोबर दंडित करतो, हे यातून दिसते.

३. राजकारण्यांचे ढोंगी पुरोगामीत्व ! 

सार्वजनिक जीवनात सामान्य माणसांनी विज्ञानवादी असावे, असे तत्त्वज्ञान लोकांना सांगणे, हे राजकारणी असलेल्या पदाधिकार्‍यांचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रात काही व्यक्ती जाणीवपूर्वक हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, अतुलनीय पराक्रम करणारे पेशवे, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा न सांगता पुरोगामी असल्याचे सांगत असतात. सर्वसामान्य जनतेला विज्ञानवादी रहाण्यास सांगणारे ढोंगी राजकीय पक्ष स्वतःच्या खासगी जीवनात मात्र ढोंगी बाबांसमोर नतमस्तक होतात. महाराष्ट्रात अडीच वर्षे आघाडीचे सरकार असतांना या भोंदूबाबासाठी धरणातून पाईपलाईन टाकून सहस्रो लिटर पाणी देण्यात आले. महाराष्ट्रातील काही गावांमध्ये गरीब जनतेला काही किलोमीटर अंतरावरून पायी डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागते, अशांना पाणी देऊन त्यांचे आशीर्वाद शासनकर्त्यांना नको असतात !

मुख्यमंत्रीपदी असतांना पांडुरंगाच्या शासकीय पूजेत सहभागी न होणे, मकरसंक्रांतीच्या वेळेस जाणीवपूर्वक विधवा महिलांचे हळदी कुंकू कार्यक्रम ठेवणे इत्यादीद्वारे पुरोगामीत्व सिद्ध करण्याचा आटापिटा ही मंडळी करतात; पण त्यांचे बगलबच्चे भोंदूबाबांच्या मागे लागून महिलांसह गोरगरिबांचे तळतळाट घेतात. सत्तेचा उन्माद फार काळ टिकत नाही. समाजाला भुलवण्यासाठी जगात सर्वश्रेष्ठ असलेल्या हिंदु धर्माला दोष देत असाल, तर तुमचे पितळ उघडे पडेल आणि तुमची छी-थू होईल, हे कायम लक्षात ठेवावे. हेच या घटनेतून दिसून येते.’

श्रीकृष्णार्पणमस्तु ।

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (२३.३.२०२६)