संपादकीय : ज्योतिषशास्त्रविरोधी प्रचार !

नाशिकमधील अशोक खरात नावाभोवती गेले काही दिवस माध्यमे फिरत आहेत. एका महिलेने त्याच्या विरोधात तक्रार केल्यानंतर प्रत्येक दिवशी त्या व्यक्तीच्या अश्लील कारनाम्यांचे व्हिडिओ प्रसारित होत आहेत. महिलांचे शोषण करणार्‍या अशोक खरात याच्याशी निगडित महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना पदत्याग करावा लागला. अनेक राजकारणी, प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांचा खरात प्रकरणाशी संबंध असल्याचे सांगितले जात आहे. काही नावे उघड झाली असली, तरी बरीचशी नावे गुलदस्त्यात आहेत. अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत आहे. मुख्यमंत्री फडणवीस स्वतः या प्रकरणात लक्ष घालत असून खरात याची चौकशी चालू आहे. प्रतिदिन प्रसारित होणार्‍या नवनवीन व्हिडिओंमुळे खरात प्रकरण महाराष्ट्रात चांगलेच गाजत आहे. राजकारणी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैर्‍या झाडत आहेत. समवेतच खरात याच्या पूर्वायुष्यापासून शिक्षण, संपत्ती, भूमी, कुटुंबीय, त्याच्या धंद्याचा पसारा, त्याने केलेले अघोरी विधी, खोटा साप आणि काय काय…!

अशोक खरात प्रकरणातील सत्य बाहेर येईल, त्याला शिक्षा होईल, संबंधित राजकारणी, प्रशासकीय अधिकारी यांचे जे होईल, ते होईल; पण खरात प्रकरणातील बातम्यांतून एकप्रकारचा दुष्प्रचार चालवला जात आहे. ‘लिंगपिसाट ज्योतिष सांगणार्‍याचा आणखी एक कारनामा’, ‘ज्योतिषाच्या नावाखाली महिलांशी लगट’, ‘भक्तांच्या श्रद्धेवर आघात’ या आणि अशा ‘टॅगलाईन’ चालवतांना माध्यमे थकत नाहीत; म्हणूनच या निमित्ताने हिंदु धर्मविरोधकांना ज्योतिषशास्त्राची निंदानालस्ती करण्यासाठी आयते कोलीत मिळाले आहे. खरात या व्यक्तीने त्याच्या कृत्यांतून अनैतिकतेची परिसीमा ओलांडली आहे, यात दुमत नाहीच; पण ज्योतिषशास्त्राला धारेवर धरून पुन्हा एकदा हिंदु धर्माची अपकीर्ती करण्याचे आणि हिंदूंमध्ये भ्रम निर्माण करण्याचे कारनामे चालू आहेत, हे नक्की !

पुरो(अधो)गामी, माध्यमे निधर्मी नाहीतच !

देश निधर्मी आहे, व्यवस्था निधर्मी आहे, तरी माध्यमे निधर्मी नाहीतच; कारण मुल्ला-मौलवी, पाद्री करत असलेल्या लैंगिक अत्याचारांच्या बातम्या मीठमसाला तर सोडाच, आहे तशा माहितीनुसार दाखवण्याचे धारिष्ट्यही माध्यमांमध्ये अद्याप पहायला मिळालेले नाही. खरातच्या कथित ज्योतिषाच्या कृत्यांवरून ज्योतिषशास्त्राला, हिंदु धर्माला थोतांड ठरवत त्यांची नालस्ती करण्यासाठी एरव्ही काम नसलेल्या पुरो(अधो)गाम्यांनी बाह्या सरसावल्या आहेत. सत्संगाला ‘बाजार’ म्हणत हिंदूंच्या साधूसंतांना लक्ष्य करण्याची संधी न गमावणारे माफीवीर ज्ञानेश महारावांसारखे ज्येष्ठ-श्रेष्ठ पुरोगामी यात मागे राहिलेले नाहीत. खरातची ‘कुंडली’ मांडण्याऐवजी त्यांना ज्योतिषशास्त्राला थोतांड ठरवण्यातच मजा घ्यायची आहे, यात काय नवल ? यांच्या तोंडी मशिदीतील मौलवी आणि चर्चमधील पाद्री यांचा उल्लेख आजपावेतो आला नाही. त्यातही इस्लाम अथवा ख्रिस्ती धर्माला आव्हान देण्याची आणि चिकित्सा करण्याची यांची क्षमता नाही; कारण सरड्याची धाव कुंपणापर्यंतच ! सोवळे नेसणे, पायी यात्रा, पारंपरिक जत्रा, ज्योतिषशास्त्र हे यांचे आवडीचे विषय असल्याने त्यावर यथेच्छ टीका केली जाते; पण ‘लव्ह जिहाद’पीडित महिला, पाद्र्यांच्या शोषणाने पीडित अल्पवयीन मुले त्यांना दिसत नाहीत. पुरो(अधो)गामी इस्लामी आणि ख्रिस्ती कट्टरतावाद्यांचे सखे आहेत का ?, अशीच त्यांची कृत्ये आहेत.

प्रत्येक वेळी कुणा भोंदूंच्या अनैतिक कृत्यांना हिंदु धर्माशी जोडले जाते आणि धर्माच्या वाटेला जाऊ पहाणार्‍या सश्रद्ध हिंदूंना पायबंद घातला जातो. खरात प्रकरणाला ‘महाराष्ट्रातील एपस्टिन फाइल्स’ म्हणणे चुकीचे नाहीच ! जो खरातला नियम लागू, तो एपस्टिनलाही लागू व्हायला नको का ? एपस्टिन हा ख्रिस्ती आहे. हे प्रकरण पोपपर्यंत जात असल्याच्याही चर्चा आहेत; पण आतापर्यंत कुणीतरी ख्रिस्ती धर्माला नावे ठेवल्याचे ऐकले आहे का ? अनेक राजकारणी, प्रशासकीय अधिकारी यांचा खरात प्रकरणाशी संबंध आहे; पण कुणी एखाद्या पक्षाला किंवा प्रशासनाला लक्ष्य केले आहे का ? मग ज्योतिषशास्त्राला लक्ष्य का केले जाते ? म्हणजेच हा हिंदु धर्म आणि ज्योतिषशास्त्र यांच्या विरोधात दुष्प्रचार करायचा आहे. पुरो(अधो)गाम्यांना समाजाचे भले करायचे आहे ना ? मग त्यांनी समाजाच्या प्रत्येक स्तरावरील भोंदूगिरीवर प्रहार करायला हवा; पण तसे होतांना दिसत नाही. हिंदु धर्माची नालस्ती करण्यातच त्यांना रस आहे. त्यांचा हाच ‘सिलेक्टिव्ह ॲप्रोच’ त्यांना हिंदु धर्मविरोधी बनवतो.

अंनिसने २० वर्षे वाट का पाहिली ?

सनातनला दोषी ठरवून न्यायालयात तोंडघशी पडल्यावर अंनिसला कुणी विचारेनासे झाले. मग काय ? येईल तो दिवस झळकण्याची नवी धडपड… स्वतःची संघटना न सांभाळू शकणार्‍या विवेकींनी हिंदु धर्माला छेद देण्यासाठी अवघे आयुष्य पणाला लावले आहे. डोंगर पोखरून कुणाचा का असेना उंदीर मिळाला, तर त्याचा उपयोग का करून घेऊ नये ? म्हणूनच मग ‘२० वर्षांपूर्वी खरातने आम्हाला धमकी दिली होती. खरातच्या कृत्यांनी त्रस्त झालेले पीडित अंनिसकडे संपर्क करत होते’, असा दावा अंनिसवाल्यांनी केला. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समिती अनेक दशके काम करत आहे. अंनिसवाल्यांनुसार त्यांनी अनेकांना पाणी पाजले आहे….त्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा राज्यात लागू होऊनही अनेक वर्षे झाली, मग इतकी वर्षे अंनिसने खरातच्या विरोधात काहीच कसे केले नाही ? यांचा वेळ गेला कुठे ? तब्बल २० वर्षे महिला खरातच्या अत्याचारांमुळे नाहक पीडित झाल्या, त्यासाठी अंनिसला उत्तरदायी का धरू नये ? बरं, समाज त्यांना उत्तरदायी धरणार नाही, हे नक्की !

पण स्वतःचा ‘विवेक’ सिद्ध करण्यासाठी अंनिसला याहून चांगली संधी मिळणार नाहीच. या संधीचा त्यांनी अवश्य लाभ घ्यावा.

नैतिकतेसाठी हिंदु धर्मच हवा !

नैतिक समाजाची निर्मिती अध्यात्मातून होऊ शकते. आता समाजाची जी काही नैतिकता शाबूत आहे, ती वेगवेगळ्या आध्यात्मिक संस्था आणि संत यांच्यामुळेच ! सूर्यप्रकाशाइतके हे स्वच्छ असे सत्य स्वतःला पुरोगामी म्हणवणारेही नाकारू शकत नाहीत. खरातसारख्या प्रकरणांतून पुनःपुन्हा हिंदु धर्म आणि त्याच्या शाखा यांना नावे ठेवली जाणार असतील, तर समाजाची स्थिती अजून खालावेल. दूरचित्रवाहिन्यांवरील घरगुती कार्यक्रम म्हणून मिरवल्या जाणार्‍या ‘बिगबॉस’मध्ये चालू असलेली अश्लीलता, ‘ओटीटी’ वाहिन्या यांना पायबंद घालायला पुरोगामी पुढे येऊ शकतातच; पण तसे करणारा एखादाही पुरोगामी आजवर दृष्टीस पडलेला नाही, म्हणजेच पुरोगाम्यांचे काम केवळ न केवळ हिंदु धर्माची अधोगती करण्याचे आहे, समाजाला पुढे नेण्याचे नाही. हा वरवरचा पुरोगामीपणा समाजाला सुधारू शकत नाही; म्हणूनच नैतिक आचरणासाठी हिंदु धर्माची आवश्यकता आहे !

पुरो(अधो)गाम्यांनी ज्योतिषशास्त्राला लक्ष्य करण्यापेक्षा समाजहितासाठीची कामे केल्यास समाजाचे खर्‍या अर्थाने भले होईल !