Hormuz Strait : हॉर्मुझ सामुद्रधुनी भारताच्या नौकांसाठी उघडी रहाणार ! – इराण

इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची

नवी देहली – इराणने हॉर्मुझजची सामुद्रधुनी त्याच्या शत्रू राष्ट्रांसाठी बंद केली असतांना भारतासाठी मात्र ती उघडी असल्याचे घोषित केले आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले की, हा मार्ग सर्वांसाठी बंद नाही. आम्ही आमच्या मित्रांसाठी तो मोकळा ठेवला आहे; पण शत्रूंना तेलाचा एक थेंबही येथून नेऊ देणार नाही. भारत हा इराणच्या ५ सर्वांत जवळच्या मित्रदेशांपैकी एक असून भारतीय नौकांना हॉर्मुझ सामुद्रधुनीच्या मार्गावरून सुरक्षित प्रवासाची अनुमती देण्यात आली आहे.

काय आहे इराणची नवी रणनीती ?

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी हॉर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याचे आवाहन केल्यानंतर इराणने त्याची भूमिका स्पष्ट केली. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हॉर्मुझमधून जातांना चीन, रशिया, भारत, इराक आणि पाकिस्तान या देशांच्या नौकांना कोणताही अडथळा येणार नाही. याउलट अमेरिका, इस्रायल आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांशी संबंधित नौकांना शत्रू मानले जाणार असून त्यांच्यासाठी हा मार्ग पूर्णपणे बंद राहील. ज्या देशांनी इराणविरुद्ध कोणत्याही आक्रमक कारवाईत सहभाग घेतलेला नाही, त्यांनाच या मार्गावरून जाण्याची अनुमती असेल. यासाठी इराणच्या नौदलाशी समन्वय साधणे अनिवार्य आहे.

भारतीय युद्धनौका करत आहेत संरक्षण !

भारताच्या १८ नौका हॉर्मुझ सामुद्रधुनीच्या परिसरात अडकून पडल्या होत्या; मात्र भारताच्या यशस्वी कूटनीतीमुळे पेट्रोलियम पदार्थ घेऊन येणार्‍या ४ नौका आधीच सुखरूप बाहेर पडल्या असून ५ अधिक नौका लवकरच भारतात पोचतील. भारताने या नौकांच्या सुरक्षेसाठी ‘ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा’ चालू केले आहे. भारतीय नौदलाने अरबी समुद्रात आणि ओमानच्या आखातात ५ हून अधिक आघाडीच्या युद्धनौका तैनात केल्या आहेत. एल्.पी.जी., एल्.एन्.जी. आणि कच्चे तेल यांचा पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी भारतीय नौदल कवच बनून भारतीय मालवाहू नौकांना संरक्षण देत आहे.