श्रीरामरक्षास्तोत्राचा अर्थ

आज २६ मार्च या दिवशी ‘श्रीरामनवमी’ आहे. त्या निमित्ताने…

श्रीरामनवमीच्या निमित्ताने श्रीरामरक्षास्तोत्र (अर्थासहित) प्रसिद्ध करत आहोत. त्यातील काही श्लोकांचा अर्थ आपण २५ मार्च या दिवशी पाहिला. आज त्यापुढील श्लोकांचा अर्थ पाहूया. संस्कृत भाषेत २ शब्दांमध्ये स्वल्पविराम येत नाही; परंतु हे स्तोत्र म्हणतांना जिथे आपण किंचित् थांबतो, तिथे २ शब्दांमध्ये स्वल्पविराम दिले आहेत. मोठ्या शब्दांचा उच्चारासाठी संधीविग्रह केला आहे, तिथे स्वल्पविराम दिला आहे; पण शब्दांत अंतर ठेवलेले नाही. यामुळे श्रीरामरक्षास्तोत्र म्हणणार्‍यांना उच्चार करणे सुलभ होईल.

भाग २ 

भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा →  https://sanatanprabhat.org/marathi/1022106.html

सनातनच्या लघुग्रंथाचे मुखपृष्ठ

हातांत तलवार आणि धनुष्य असून (पाठीवर) भाता बांधलेला, राक्षसांचा संहार करणारा अन् स्वतः जन्मरहित, सर्वव्यापी असूनही जगाच्या रक्षणासाठी सहज लीलेने अवतीर्ण झालेला आहे, अशा रामाचे ध्यान करून,

रामरक्षाम् पठेत्प्राज्ञः, पापघ्नीं सर्वकामदाम् ।
शिरो मे राघवः पातु, भालन् दशरथात्मजः ॥ ४ ॥

अर्थ : (पूर्वार्ध) पापांचा नाश करणार्‍या आणि सर्व इच्छा पूर्ण करणार्‍या या रामरक्षास्तोत्राचे शहाण्या माणसाने पठण करावे.

(येथे मुख्य रामरक्षा आरंभ होते. श्लोक क्रमांक ४ ते ९ रामकवच आहे. ते म्हणतांना शक्य असल्यास शरिराच्या त्या त्या अवयवाला उजव्या हाताच्या बोटांनी स्पर्श करून न्यास करावा. न्यास म्हणजे देवतेची एखाद्या ठिकाणी स्थापना करणे होय.)

(उत्तरार्ध) रघुराजाच्या कुळात जन्मलेला राम माझ्या मस्तकाचे रक्षण करो. दशरथपुत्र राम माझ्या कपाळाचे रक्षण करो.

कौसल्येयो दृशौ पातु, विश्वामित्रप्रियः श्रुती ।
घ्राणम् पातु मखत्राता, मुखं सौमित्रिवत्सलः ॥ ५ ॥

अर्थ : कौसल्यापुत्र राम माझ्या डोळ्यांचे रक्षण करो. विश्वामित्रऋषींना प्रिय असणारा राम माझ्या कानांचे रक्षण करो. (ऋषींच्या) यज्ञाचे रक्षण करणारा राम माझ्या नाकाचे रक्षण करो. सुमित्रानंदन लक्ष्मणावर प्रीती करणारा राम माझ्या मुखाचे रक्षण करो.

जिह्वां विद्यानिधिः पातु, कण्ठम् भरतवन्दितः ।
स्कन्धौ दिव्यायुधः पातु, भुजौ भग्नेशकार्मुकः ॥ ६ ॥

अर्थ : सर्व विद्यांचा निधी (ठेवा) असा राम माझ्या जिभेचे रक्षण करो. भरत ज्याला वंदन करतो, असा राम माझ्या कंठाचे रक्षण करो. दिव्य आयुधे धारण करणारा राम माझ्या खांद्यांचे रक्षण करो. शिवधनुष्य मोडणारा राम माझ्या दोन्ही बाहूंचे रक्षण करो.

करौ सीतापतिः पातु, हृदयञ् जामदग्न्यजित् ।
मध्यम् पातु खरध्वंसी, नाभिञ् जाम्बवदाश्रयः ॥ ७ ॥

अर्थ : सीतापती राम माझ्या दोन्ही हातांचे रक्षण करो. जमदग्नीपुत्र परशुरामाला जिंकणारा राम माझ्या हृदयाचे रक्षण करो. ‘खर’ नामक राक्षसाचा नाश करणारा राम माझ्या शरीरमध्याचे (हृदय आणि नाभी [बेंबी] यांच्या मधल्या भागाचे), जाम्बवन्ताला आपलेसे करणारा राम माझ्या नाभीस्थानाचे रक्षण करो.

सुग्रीवेशः कटी पातु, सक्थिनी हनुमत्प्रभुः ।
ऊरू रघूत्तमः पातु, रक्षःकुलविनाशकृत् ॥ ८ ॥

अर्थ : सुग्रीवाचा स्वामी राम माझ्या कटीचे (कमरेचे) रक्षण करो. हनुमंताचा प्रभु राम माझ्या जंघांचे रक्षण करो. रघुकुलात श्रेष्ठ आणि राक्षसकुलाचा संहारक असा राम माझ्या मांड्यांचे रक्षण करो.

जानुनी सेतुकृत्पातु, जङ्घे दशमुखान्तकः ।
पादौ बिभीषणश्रीदः, पातु रामोऽखिलं वपुः ॥ ९ ॥

अर्थ : सेतू बनवणारा राम माझ्या गुडघ्यांचे रक्षण करो. दशमुख रावणाला ठार मारणारा राम माझ्या पोटर्‍यांचे रक्षण करो. बिभीषणाला सर्व वैभव देणारा राम माझ्या पायांचे रक्षण करो. श्रीराम माझ्या संपूर्ण देहाचे संरक्षण करो.

(येथे मुख्य रामरक्षा समाप्त होते. यापुढील श्लोक फलश्रुतीचे आहेत.)

एतां रामबलोपेताम्, रक्षां यः सुकृती पठेत् ।
स चिरायुः सुखी पुत्री, विजयी विनयी भवेत् ॥ १० ॥

अर्थ : रामसामर्थ्याने युक्त अशा या (राम) रक्षास्तोत्राचे जो पुण्यवान मनुष्य पठण करील, तो दीर्घायुषी, सुखी, पुत्रवान, विजयी आणि विनयसंपन्न होईल.

पातालभूतलव्योम,चारिणश्छद्मचारिणः ।
न द्रष्टुमपि शक्तास्ते, रक्षितं रामनामभिः ॥ ११ ॥

अर्थ : रामनामाने ज्याचे रक्षण केले जाते, त्याला पाताळ, पृथ्वी आणि आकाश यांत हिंडणारे कपटी (मायावी) लोक पाहूसुद्धा शकणार नाहीत.

रामेति रामभद्रेति, रामचन्द्रेति वा स्मरन् ।
नरो न लिप्यते पापैर्,भुक्तिम् मुक्तिञ् च विन्दति ॥ १२ ॥

अर्थ : राम, रामभद्र किंवा रामचंद्र या नामोच्चाराने जो मनुष्य रामाचे स्मरण करतो, त्याला पाप लागत नाही. तसेच त्याला भुक्ती (ऐहिक लाभ) आणि मुक्ती (पारमार्थिक लाभ) प्राप्त होतात.

जगज्जैत्रैकमन्त्रेण, रामनाम्नाऽभिरक्षितम् ।
यः कण्ठे धारयेत्तस्य, करस्थाः सर्वसिद्धयः ॥ १३ ॥

अर्थ : जगाला जिंकणारा मंत्र जो रामनाम, त्याने संरक्षित एखादी वस्तू (अंगारा, ताईत इत्यादी) कंठात धारण करणार्‍याला सर्व सिद्धी प्राप्त होतात.

वज्रपञ्जरनामेदं, यो रामकवचं स्मरेत् ।
अव्याहताज्ञः सर्वत्र, लभते जयमङ्गलम् ॥ १४ ॥

अर्थ : वज्रपंजर (वज्राच्या पिंजर्‍याप्रमाणे अभेद्य) नामक हे रामकवच (रामरक्षास्तोत्र) जो स्मरण (पठण) करतो, त्याची आज्ञा सर्वत्र मानली जाते आणि त्याला जय अन् कल्याण दोन्ही प्राप्त होतात.

आदिष्टवान् यथा स्वप्ने, रामरक्षामिमां हरः ।
तथा लिखितवान् प्रातः, प्रबुद्धो बुधकौशिकः ॥ १५ ॥

अर्थ : ही रामरक्षा भगवान शिवाने बुधकौशिकऋषींना स्वप्नात जशी सांगितली, तशी त्यांनी प्रातःकाली उठल्यानंतर लिहून काढली.

(येथे ‘वज्रपञ्जर’ नामक रामकवच पूर्ण झाले.)

(क्रमश:)

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्रीरामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र (अर्थासह)’)

भाग ३ वाचण्यासाठी क्लिक करा →  https://sanatanprabhat.org/marathi/1022863.html