International Arms Smuggling : घातक शस्त्रांच्या तस्करीप्रकरणी १० जणांना अटक

अटक करण्यात आलेले आरोपी (डावीकडे) व जप्त करण्यात आलेली शस्त्रास्त्रे (उजवीकडे)

नवी देहली – देहली पोलिसांच्या गुन्हे शाखेने शस्त्रांच्या तस्करी करणार्‍या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील १० जणांना अटक केली. या टोळीचे धागेदोरे पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश यांच्याशी जोडलेले असून ही टोळी ‘जुनी देहली’ परिसरातून तिचे कामकाज चालवत होती.

पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींकडून २१ घातक परदेशी बनावटीची शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत. यात शॅडो सीझेड, बेरेटा आणि टॉरस या उच्च दर्जाच्या पिस्तुलाही आढळल्या. तसेच विशेष दलांकडून वापरल्या जाणार्‍या पीएक्स-५.७ प्रकारच्या पिस्तुलांचा यामध्ये समावेश आहे. ही शस्त्रास्त्रे देहली-एन्.सी.आर्. (नॅश्‍न कॅपिटल रीजन, म्हणजेच राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) परिसरातील गुन्हेगारी टोळ्यांना पुरवण्याच्या उद्देशाने आणली गेली होती. ही शस्त्रास्त्रे नेपाळ सीमेमार्गे पाकिस्तानातून भारतात तस्करी करून आणण्यात आणली गेली. ही टोळी सीमेपलीकडून शस्त्रांची तस्करी करून ती देहली आणि आसपासच्या राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या मोठ्या गुन्हेगारी टोळ्यांना पुरवत होती, असे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आहे.