मान आखडणे, दुखणे, तसेच त्याला लागून असलेले स्नायू दुखत असतील (मुख्यतः ‘ट्रॅपेझियस), तर खालील प्रश्नांकडे लक्ष द्यावे –

१. तुम्हाला घशाशी येणे / जळजळ वारंवार आहे का ?
२. एकच प्रकारचे ‘पोश्चर’ (शरिराची ठेवण) सतत असते का ? (स्वयंपाक / भ्रमणभाष / भ्रमणसंगणक (लॅपटॉप) / वाचन / वाहन चालवणे)
३. पुष्कळ उंच किंवा ओबडधोबड उशी आहे का?
४. सतत चिंता करत रहाण्याची सवय आहे का ? प्रतिदिन जागरण होते का ?
५. सांध्यांचे व्यायाम अजिबात केले जात नाही का ?

आयुर्वेदाच्या दृष्टीने उपाय
जुनाट आम्लपित्तामध्ये मुख्यतः मानेच्या मणक्यांची आणि मग बाकीही हाडांची झीज झाल्याने आजूबाजूचे स्नायू ओढले जातात. यामुळे मानदुखी होतांना दिसते. खराब उशी किंवा ‘पोश्चर’ या दोन्ही गोष्टींमध्ये स्नायूंचा समतोल बिघडल्यामुळे त्रास होतांना दिसतो. जागरण आणि चिंता यांमुळे शरिरात वात वाढून स्नायू आखडल्यासारखे होतात आणि मानदुखीला प्रारंभ होतो. यासाठी पुढील उपाय करावेत –
१. मूळ कारणावर इलाज करावा. उशी पालटणे, ‘पोश्चर’संबंधीचे व्यायाम, ‘पोश्चर’ पालटणे इत्यादी. आम्लपित्त झाल्या झाल्या मनाने प्रतिदिन एक ‘अँटासिड’ (आम्लरोधी गोळी) खाण्यापेक्षा औषध आणि पथ्य याने तो आजार पूर्ण दूर ठेवणे चांगले. भ्रमणसंगणक डोळ्याच्या उंचीला ठेवणे आणि वाचन करतांना मध्ये मध्ये मानेचे व्यायाम करणे, हे उपाय करावे.
२. मनातल्या मनात कुढत रहाण्यापेक्षा बोलून त्यावर मार्ग काढावा. असलेल्या परिस्थितीचा विनाअट स्वीकार कसा करता येईल, याचा विचार केला, तर प्रतिदिनच्या गोष्टींचे अधिक त्रास होणार नाहीत.
३. आयुर्वेदात आलेल्या नस्य, अभ्यंग, शिरोधारा या उपक्रमांचा मानदुखीवर चांगला परिणाम दिसतो; पण दुखण्यासाठी आणि मूळ कारणासाठी घेतलेल्या औषधांसमवेतच केल्यावर परिणाम दिसेल.

४. सगळ्या हाडांच्या सर्व दुखण्यावर केवळ ‘कॅल्शियम’ आणि ‘व्हिटॅमिन डी’ एवढेच औषध घेत राहू नये. प्रत्येक वेळी मणक्यांच्या आजारात हाडांची झीज तेवढी अधिक असतेच, असे नाही. बर्याचदा त्यांच्यामधील गादीला असलेली सूज, आजूबाजूच्या स्नायूंच्या आखडलेपणामुळे आलेला कडकपणा, त्यांना पकडून ठेवणार्या ‘लिगामेंट’मधला (स्नायूंमधील) तणाव यांमुळे मान दुखते. अशा वेळी तेथील रक्तपुरवठा चांगला होण्यासाठी योग्य असा व्यायाम, तेल, शेक आणि सूज न्यून करणारी अन् वात न्यून करणारी औषधे द्यावी लागतात.
५. घरच्या घरी प्रतिदिन कोमट करून वातशामक तेल वरून खाली अशा पद्धतीत लावावे. इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की, प्रत्येक दुखण्यावर केवळ तेल इतकाच उपाय नाही. ‘जरा मी मान चोळून घेतली…’, असे सांगून आमच्याकडे येतांना ती दुखावली गेलेली असते बर्याचदा. योग्य प्रशिक्षण नसलेल्या व्यक्तीकडून मान चोळून घेतली असता दुखावले जाण्याची शक्यता आहे. घरी तेल लावत असतांनाही मणक्यांच्या वर बोटांनी जोरजोरात दाब देऊ नये.
६. वारंवार मानदुखी असल्यास त्याला आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या करून त्यानुसार औषधोपचार करावे. मनाने उपचार करू नये.
सध्या रस्त्याला असलेले खड्डे आणि वाहतूक, तसेच कामाचे स्वरूप यांमुळे मानदुखी अन् तत्सम आजार यांवरही उपचार घेण्यासाठी येणार्या रुग्णांची संख्या भरपूर वाढली आहे. त्या दृष्टीने वरील काही गोष्टी लक्षात घेतल्या असता मानदुखी आणि त्रास आटोक्यात ठेवणे थोडे सोपे जाईल.
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे. (२०.३.२०२६
‘काशीविश्वनाथ सुसज्ज महामार्गा’च्या विकासाआड येणारी याचिका उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाकडून असंमत !
कल्पनेद्वारे नकारात्मकतेला सकारात्मकतेमध्ये पालटणे !
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
वारकरी संप्रदायातील घुसखोर ओळखा !
‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !
अहंकार कि सत्याचा शोध ?