हॉर्मुझ, खार्ग बेट – बगदाद ते लॅबेनॉन : एक युद्ध आणि ७ आघाड्या !
इराण आणि अमेरिका-इस्रायल युद्ध चालू होऊन आता २५ दिवस उलटून गेले आहेत. ‘पहिल्याच दिवशी इराणी धार्मिक नेते अयातुल्ला खामेनी यांच्या हत्येनंतर इराण २४ घंट्यांत शरण येईल आणि स्वतःच्या पसंतीचा नेता सत्तेत बसवून इराणी तेल आपण चोरू’, ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांची आशा धुळीस मिळालेली आहे. इराणी शिया राजवटीच्या बहुस्तरीय रचनेमुळे इराणी राजवट तग धरून आहे.

१. एक युद्ध आणि ७ आघाड्या
बाहेरून दिसतांना हे युद्ध एकाच ठिकाणी चालू आहे, असा भास होतो; पण प्रत्यक्षात हे युद्ध एकाच वेळी ७ आघाड्यांवर चालू आहे, त्या आघाड्या अशा…
अ. इराणवर प्रतिदिन होणारी इस्रायली आणि अमेरिकन बाँबफेक
आ. इराणकडून अमेरिकेचे अरब देशातील सैन्य तळ आणि खुद्द इस्रायलवर होणारे क्षेपणास्त्र अन् ‘ड्रोन’ (मानवरहित विमान) आक्रमणे

इ. इराणने हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याने चालू असलेले मूक आर्थिक युद्ध, ज्यात न्यूनतम दारूगोळा व्यय होत आहे, न्यूनतम मनुष्यहानी होत आहे; पण अतोनात जागतिक आर्थिक हानी होत आहे. ही बंदी मोडून काढण्यासाठी अमेरिका विविध सैनिकी पर्यायांवर विचार करत आहे.
ई. इस्रायल विरुद्ध लॅबेनॉन यांच्यामधील शिया हिजबुल्ला गट यांच्यातील क्षेपणास्त्र, ‘ड्रोन’ आणि आमनेसामने होत असलेले युद्ध
उ. इराक, सीरिया यांच्यामधील ‘पॉप्युलर मोबलायझेशन फोर्सेस’ अर्थात् ‘शिया ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स’ने अमेरिकन, ‘नाटो बेस’ (उत्तर अटलांटिक करार संघटना), अमेरिकन दूतावास यांच्याविरुद्ध चालू केलेले निर्णायक युद्ध
ऊ. इराण समर्थित येमेनी शिया हुती बंडखोरांनी अद्याप चालू न केलेले; पण ‘लवकरच आपण बाब अल मांदेबची चिंचोळी सामुद्रधुनी आम्ही बंद करू’, म्हणून केलेली घोषणा. या युद्धातील ही अजूनपर्यंत शांत असलेली सहावी युद्ध आघाडी आहे.
ए. खार्ग बेटावर आक्रमणाची अमेरिकन योजना : ही अजून एक शांत आघाडी आहे; पण हॉर्मुझ सामुद्रधुनी इराणने बंद केल्याने अमेरिकन सैन्य आता इराणच्या तेल व्यापाराची आर्थिक नाडी असलेल्या खार्ग बेटावर ‘मरीन एक्स्पिडिशनरी फोर्स’ आणण्याच्या सिद्धतेत आहे. तसे झाल्यास इराणी भूमीवर अमेरिकन सैन्य प्रत्यक्ष उतरण्याची या युद्धातील ही पहिलीच वेळ असेल.
बगदादमधील फौदा, इराकमधील ‘रिजिम चेंज’च्या हालचाली आणि इराकमधून ‘नाटो’ फौजांची माघार

इराणवर इस्रायल आणि अमेरिका यांची आक्रमणे चालू झाल्यापासून इराकमधील अमेरिकन अन् ‘नाटो’ फौजांना ‘पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेस’कडून होणार्या तिखट आक्रमणांचा सामना करावा लागत आहे. इराकमध्ये शिया लोकसंख्या ६९ टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे शिया क्रेसेंट किंवा शिया ॲक्सिस येथील विविध शिया सशस्त्र गटांनी या वेळी इराणवरील आक्रमणांचा सूड म्हणून मोठा सैनिकी संघर्ष चालू केलेला आहे. ‘कतईब हिजबुल्ला’, ‘असाईब अहल अल हक’ आणि ‘बद्र ग्रुप’ हे ३ प्रमुख इराण समर्थक शिया सशस्त्र गट आहेत. पैकी कतईब हिजबुल्लाने या वेळी बगदादमधील अमेरिकन दूतावासावर, रडार केंद्रावर, कुर्दिश आणि फ्रेंच संयुक्त तळांवर मोठी आक्रमणे केली आहेत. इराणकडून मिळणारे भरघोस सैनिकी साहाय्य आणि प्रशिक्षण यांमुळे ही आक्रमणे अतिशय प्रभावी ठरत आहेत.
या आक्रमणात फ्रेंच सैनिक मारले गेल्यानंतर आणि अन्य कित्येक तळांवर क्षेपणास्त्र, ड्रोन आक्रमणे अहोरात्र होत राहिल्याने ‘नाटो’च्या फौजांनी बहुसंख्य तळ रिकामे करून माघार घेतली आहे. इराकच्या आकाशात या गटांनी केलेल्या आक्रमणात अमेरिकन सैन्याचा एक ‘एरियल रिफ्युएलिंग टँकर’ (हवाई इंधन भरणारे विमान) पडल्याने मोठा गदारोळ उडाला होता. यासह बगदादमधील अमेरिकन दूतावासावर झालेल्या आक्रमणाने दूतावास बंद करावा लागला. याखेरीज उत्तर इराकमधील कित्येक अमेरिकन तळांवर सततच्या आक्रमणांनी ते तळ सोडून अमेरिकन सैनिक ज्या ज्या इराकी हॉटेलमध्ये रहात आहेत, त्यांच्यावर शिया गटांकडून आक्रमणे चालू आहेत. स्थानिक गट आणि इराणी सैन्य यांनी एकत्रितपणे वेचून वेचून अमेरिकन ‘रडार स्टेशन’ उद्ध्वस्त करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे आता कोणतीही पूर्वसूचना न मिळता इराणी क्षेपणास्त्र थेट लक्ष्यावर येऊन आदळत आहेत. यामुळे अमेरिकन सैन्य मोठ्या अडचणीत आहे. इराकच्या नजफमधून उत्तर इराणमध्ये विशेष सैन्याची पथके आणण्याची मूळ अमेरिकन योजना यात पार फसलेली आहे आणि त्यावर अमेरिकन सैन्याला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कष्ट घ्यावे लागत आहेत. त्यामुळे अमेरिकासमर्थित इराक सरकारवर आता दबाव वाढत आहे.
– विनय जोशी
२. इराणच्या ‘साऊथ पार्स गॅस फिल्ड’वर आक्रमणे
इराणच्या घरगुती मागणीच्या बहुसंख्य गॅस प्रकल्प असलेल्या ‘साऊथ पार्स गॅस फिल्ड’वर इस्रायली सैन्याने हवाई आक्रमण केले. यामुळे इराक आणि तुर्कीये यांच्यामध्ये जाणारा इराणी गॅस पुरवठासुद्धा खंडित झाला. यानंतर इराणने अवघ्या काही घंट्यांत सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कुवेत, कतार आणि बहरीन येथील गॅस अन् तेल ठिकाणांवर मोठी आक्रमणे केली. इथे दोन आघाड्या एकाच वेळी जळतांना दिसल्या. यामुळे जागतिक गॅस पुरवठ्यात मोठी उलथापालथ झाली आणि अनेकांनी यानंतर ‘इराणी तेल अन् गॅस ठिकाणे यांवर आक्रमणे करू नयेत’, अशी विनवणी चालू केली. इथे लक्षात ठेवण्याजोगे, म्हणजे इराणी गॅस फिल्डवर आक्रमणे झाल्या झाल्या इराणने अरब देशातील कारखान्यांची सूची घोषित करून त्यावर आक्रमणे केली. अमेरिका आणि इस्रायल सतत ‘इराणी क्षेपणास्त्र लाँच पॅड उद्ध्वस्त झाली’, हे घोषित करत असतांना इराणने इतक्या अल्प वेळात प्रत्युत्तर देणे, हे सगळ्या अरब देशांसाठी मानसिक धक्का देणारे ठरले आहे.
३. हिजबुल्ला आणि इस्रायल संघर्ष
गेली २ वर्षे लॅबेनॉनमधील ‘शिया मिलिशिया हिजबुल्ला’ आणि इस्रायल यांच्यात युद्धबंदी होती. ‘हिजबुल्लाचा प्रमुख नसरल्लाह याला आणि अनेक प्रमुख कमांडर्स मारल्याने हिजबुल्ला अत्यंत कमजोर अवस्थेत आहे’, या गृहितकावर इस्रायल विसंबून होते; पण इराणवर संयुक्त आक्रमणे चालू झाल्यापासून हिजबुल्लाने ज्या नव्या रणनैतिक योजनेने आणि सिद्धतेने उत्तर इस्रायलवर आक्रमणे चालू केली आहेत, ते बघता खुद्द इस्रायली सैन्य नेतृत्व बुचकळ्यात पडले आहे. इराण युद्ध चालू झाल्यापासून हिजबुल्लाने इस्रायलवर आतापर्यंत ४३२ रॉकेट, क्षेपणास्त्र आक्रमणे, १६२ ड्रोन आक्रमणे, २५ ‘अँटी टँक’ (रणगाडाविरोधी) आक्रमणे असे जवळपास ६५० आक्रमणे केली आहेत. या वेळी हिजबुल्लाच्या सततच्या क्षेपणास्त्रांच्या आक्रमणात मोठी अचूकता दिसत आहे. याखेरीज इराणी सैन्य आणि हिजबुल्ला यांच्या आक्रमणात कमालीचे नियोजन दिसत आहे अन् बहुसंख्य आक्रमणे एकाच वेळी इस्रायलवर येत आहेत. यामुळे इस्रायली हवाई संरक्षण यंत्रणांवर कमालीचा ताण येऊन क्षेपणास्त्र आणि ड्रोन थेट भूमीवरील लक्ष्यावर जाऊन फुटण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे इस्रायलमध्ये अभूतपूर्व हानी झाली आहे. अनुमाने ५ लाख सैनिकांसह दक्षिण लॅबेनॉनमध्ये इस्रायली सैन्य कारवाई चालू होणार आहे. त्यापैकी सध्या ५ डिव्हिजन, म्हणजे ५० सहस्र सैनिक लिटानी नदीच्या दक्षिणेला ‘बफर झोन’ (तटस्थ क्षेत्र) सिद्ध करण्याच्या लढाईत गुंतले आहेत; पण या भागात त्यांना होणारा प्रतिकार अनुमानापेक्षा पुष्कळ अधिक आहे.
४. ‘रादवान फोर्सेस’ इस्रायलसाठी डोकेदुखी आणि इस्रायलची मोठ्या प्रमाणात झालेली हानी
हिजबुल्लाचे रादवान फोर्सेस ! सध्या इस्रायली सैन्यासाठी मोठी डोकेदुखी बनतांना दिसत आहेत. हिजबुल्लाच्या इमाद मुघलीय याच्या नावाने सिद्ध झालेले हे कडवे जिहादी इस्रायली सशस्त्र दलासमोर रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र घेऊन उभे आहेत आणि आतापर्यंत २ डझन इस्रायली टँकवर त्यांनी भीषण आक्रमणे केल्याच्या बातम्या आहेत. याखेरीज उत्तर इस्रायलवर त्यांनी केलेल्या आक्रमणांनी मोठी हानी झाली आहे. या युद्धाच्या पहिल्या ३ आठवड्यांत इस्रायलमध्ये झालेल्या हानीची आकडेवारी मोठी आहे. तेल अवीव आणि अश्कलोन येथे प्रत्येकी ५ सहस्र विमा भरपाईचे दावे प्रविष्ट (दाखल) झाले आहेत अन् जेरुसलेममध्ये ३००. एकूण इस्रायलमध्ये १२ सहस्र ‘इन्शुअरन्स डॅमेज क्लेम्स’ (विमा हानीभरपाई दावा) प्रविष्ट झाले आहेत. यात ८ सहस्र इमारती, २ सहस्र गाड्या आणि अन्य दावे अनुमाने २ सहस्र आहेत. या सगळ्याची एकूण किंमत कित्येक बिलियन डॉलर्समध्ये पोचत आहे. याखेरीज हैफा रिफायनरी, बेन गुरियन विमानतळ आणि अन्य कित्येक औद्योगिक अन् सैनिकी भागांत झालेली हानी याची यात नोंद नाही.
इराकी सरकारसमोर पेच

‘नाटो’ आणि अमेरिकन सैन्य माघारी गेल्यास वर्तमान पंतप्रधान महंमद शिया अल सुदानी यांना सत्ता सोडावी लागू शकते. इराणचा प्रयत्न असा असणार आहे की, हे सरकार पाडून त्याच्या जागी इराणला सोयीचा एखादा नेता ‘बद्र’ किंवा ‘कतईब हिजबुल्ला’ या गटांमधून निवडून त्याला सत्तेत बसायला साहाय्य करायचे. हे शक्य झाल्यास इराणची उत्तर सीमा एकदम सुरक्षित होईल. हे अयशस्वी झाल्यास अमेरिकन सैन्यासमोर अल सुदानीची राजवट सुरक्षित ठेवण्यासाठी दबाव राहील आणि तिथून इराणमध्ये घुसखोरीसाठी वेळ मिळणार नाही. त्यामुळे काहीही झाले तरी सध्या इराणला सोयीची स्थिती आहे. ‘पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेस’ सध्या अमेरिकन सैन्याचा प्रचंड वेळ खर्ची पाडत आहे. याखेरीज इराणवर आक्रमण केल्यास आपल्याला इराकमधून सहजपणे कुर्दिश योद्ध्यांना ‘स्पेशल फोर्सेस’सह आत घुसवता येईल. ही अमेरिकन अपेक्षा ‘पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेस’मुळे अयशस्वी झाली आहे. असाच अजून एक अनपेक्षित नसला, तरी कल्पनेच्या पलीकडचा तिखट संघर्ष उत्तर इस्रायलमध्ये हिजबुल्लासह चालू आहे.
– विनय जोशी
५. दोन शांत आघाड्या आणि एक अस्वस्थ आघाडी
एकूण ७ आघाड्यांपैकी हॉर्मुझची आघाडी अस्वस्थ; पण शांत आहे. इथे इराणने सध्या आपल्या किनार्याच्या जवळून केशम आणि लरक बेटांमधून पैसे घेऊन काही मालवाहू नौकांना बाहेर जायची अनुमती दिली आहे. चीन आणि रशिया यांच्या सर्व नौकांना पूर्ण अन् विनामूल्य अनुमती आहे. बाकीच्यांना प्रत्येकी २० लाख डॉलर्स (१८ कोटी ८० लाख रुपये) घेऊन इराण बाहेर जाऊ देत आहे. हे पैसे त्यांना चिनी चलन रेनमीनबीमध्ये देणे बंधनकारक आहे. यावर कुणी चलाखी दाखवली, तर इराणी सैन्य तात्काळ त्यावर क्षेपणास्त्र डागून जाळपोळ करत आहे. त्यामुळे कुणीही पैसे न देता जाण्याचे धाडस दाखवत नाही.
हॉर्मुझ सामुद्रधुनी उघडण्यासाठी बळाचा वापर करण्याच्या दृष्टीने अमेरिका ‘नाटो’ देशांना विनवण्या करून दमली आहे. आता अमेरिका अन् इस्रायल यांचे हवाई सैन्य हॉर्मुझच्या पूर्वेला असलेल्या बंदर अब्बास या इराणी बंदरावर अंदाधुंद हवाई आक्रमणे करत आहे; पण प्रत्यक्षात तिथे सैन्य आणून इथून इराणी उपद्रव थांबवणे, म्हणजे काही सहस्र अमेरिकन सैनिकांची हत्या आहे, असे अमेरिकन सैन्य अधिकारी मानतात. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने इराणच्या खार्ग बेटावर हवाई आक्रमणे केली; पण इराणी तेलासंबंधीच्या पायाभूत सुविधांवर आक्रमणे केली. तेथे अमेरिकन ‘मरीन एक्स्पिडिशनरी फोर्स’ आणून इराणचे नाक दाबायची योजना आहे; पण तेथे सैनिक उतरल्यास इराण मुख्य भूमीवरून त्यांना शब्दशः भाजून काढेल, ही रास्त भीती अमेरिकन जनरल व्यक्त करत आहेत; पण ट्रम्प बेट कह्यात घेण्यावर ठाम आहेत, तरी सध्या ही आघाडी शांत आहे.
दुसरी शांत आघाडी आहे येमेनी शिया हुती बंडखोरांची. इराणने बहुधा शेवटची खेळी म्हणून त्यांना शांत ठेवले आहे, अशी चर्चा आहे. हॉर्मुझ नाकेबंदी उठवण्याचा आनंद अमेरिका साजरी करू लागली किंवा तिथे प्रत्यक्ष लढाईला तोंड फुटल्यास येमेनी बंडखोरांच्या माध्यमातून बाब अल मांदेबची कोंडी करून एका झटक्यात जगाच्या तेल पुरवठ्याच्या ३७ टक्क्यांच्या हिश्यावर घाला घालायचा आणि जगाच्या अर्थव्यवस्थेत हाहाःकार माजवायचा अशी इराणी योजना असावी.
६. निष्कर्ष
अशा ७ आघाड्यांपैकी सध्या ५ आघाड्या पेटलेल्या आहेत. येमेनी शिया हुती बंडखोर कोणत्याही क्षणी युद्धात उतरू शकतात आणि अमेरिकन ‘मरीन एक्स्पिडिशनरी फोर्स’ लवकरच उत्तर अरबी समुद्रात येऊ घातला आहे. हे झाल्यास आणि आता ठरल्याप्रमाणे ट्रम्प वागल्यास अमेरिका खरेच खार्ग बेटावर सैन्य आणेल. हे बेट जिंकणे अमेरिकेला फार कठीण नाही; पण नंतर होणारा अमेरिकन रक्तपात कल्पनेच्या पलीकडे पोचू शकतो. एका अमेरिकन पत्रकाराच्या भाषेत ‘खार्ग बेटावर सैन्य उतरवणे, म्हणजे ‘मीट ग्राईंडर’मध्ये (शिजवलेले मांस बारीक करण्याचे यंत्र) मांस घातल्यासारखे आहे ! इराणी सैन्य प्रवक्ते म्हणाले, त्याप्रमाणे अफगाणिस्तान २१ वर्षांत जितकी अमेरिकेची हानी झाली, तेवढी इराणच्या खार्ग बेटावर एका आठवड्यात होईल ! यामुळे कोणत्याही अंगाने विचार केल्यास हे खोटे वाटत नाही !
– विनय जोशी, गौहत्ती, आसाम. (२२.३.२०२६)
(साभार : ‘आय.सी.आर्.आर्.’चे संकेतस्थळ)
संपादकीय भूमिकाइराण आणि इराक येथे सत्तापालटासाठी होत असलेले अमेरिकेचे प्रयत्न पहाता केंद्र सरकारनेही सतर्क रहाणे महत्त्वाचे ! |
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !