सव्वा २ लाख सैनिकांची ‘चतुरंगिणी सेना’ उभारणार – Swami Avimukteshwarananda Saraswati

  • शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची काशीमध्ये घोषणा

  • प्रत्येकाच्या हातात असणार परशू !

  • पुढील १० महिन्यांत सेना उभारणार

  • गोमाता, धर्म, शास्त्र आणि मंदिर यांच्या संरक्षणासाठी कार्य करणार

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती

वाराणसी (उत्तरप्रदेश) – ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी येथे ‘चतुरंगिणी सेने’च्या स्थापनेची घोषणा केली. या सेनेत एकूण २ लाख १८ सहस्र ७०० सदस्यांचा समावेश करण्याचे लक्ष्य असून देशभरातील लोक यात सहभागी होऊ शकतील. ‘ही सेना गोसंरक्षण, धर्मसंरक्षण, शास्त्रसंरक्षण आणि मंदिरसंरक्षण यांसाठी कार्य करील’, असे त्यांनी सांगितले. या सेनेसाठी २७ सदस्यीय पदाधिकार्‍यांची घोषणा करण्यात आली आहे. या सेनेचे अध्यक्ष स्वतः शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती असतील.

रोखा, थांबवा आणि ठोका

सेनेच्या कार्यपद्धतीविषयी शंकराचार्यांनी सांगितले की, प्रथम सूचना देण्यात येईल, चुकीचे होत असल्याचे सांगितले जाईल. त्यानंतरही ऐकले नाही, तर अडवले जाईल. तरीही प्रतिसाद न मिळाल्यास पुढील कारवाई केली जाईल. ‘ठोका’ याचा अर्थ थेट आक्रमण नसून न्यायालयीन कारवाई करणे, तक्रार नोंदवणे किंवा स्थानिक पातळीवर निर्णय प्रक्रिया राबवणे, असा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे सर्व घटनात्मक मार्गाने केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

१० महिन्यांत सेना उभारणार

शंकराचार्य यांनी सांगितले की, ही चतुरंगिणी सेना पुढच्या माघ मेळ्यापर्यंत पूर्णपणे उभारण्यात येईल आणि कार्यरत होईल. यासाठी घोषवाक्यही घोषित करण्यात आले असून ‘गोसंरक्षण’ हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी म्हटले.

अशी असेल सेना !

१. एका पथकात १० सदस्य असतील, अशा २१ सहस्र ८७० पथकांची उभारणी झाल्यास सेना पूर्ण होईल.

२. भारतात सुमारे ८०० जिल्हे असून प्रत्येक जिल्ह्यात २७ पथके, म्हणजे २७० सदस्य सिद्ध झाले, तर २ लाख १६ सहस्र सदस्य सिद्ध होतील.

३. ही सेना पिवळ्या वस्त्रांत दिसेल आणि सेनेतील प्रत्येकाच्या हातात परशू असेल.

चतुरंगिणी सेनेचा अर्थ

चतुरंगिणी सेना म्हणजे ४ घटकांपासून बनलेली सेना. यात पदाती (पायदल), अश्वदल, रथदल आणि गजदल असतील. प्राचीन भारतात ही सेना अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. महाभारत आणि रामायण यांसारख्या ग्रंथांमध्ये तिचा उल्लेख आढळतो, जिथे मोठ्या युद्धांमध्ये या चारही घटकांचा संघटित वापर करण्यात आल्याचे वर्णन आहे. ही पद्धती वैदिक काळात प्रारंभ झाल्याचे मानले जाते आणि पुढे अधिक विकसित झाली. ती केवळ युद्धकौशल्याचे प्रतीक नव्हती, तर प्राचीन भारतीय सैनिकी संघटना आणि रणनीतीची प्रगत संकल्पनाही दर्शवते.