सद्गुरु सत्यवान कदम (वय ६३ वर्षे) यांच्या मार्गदर्शनाचे साधिकेला झालेले लाभ आणि तिला आलेल्या अनुभूती !

सद्गुरु सत्यवान कदम

१. सद्गुरु सत्यवान कदम यांच्या मार्गदर्शनाचे साधिकेला झालेले लाभ !

१ अ. साधिकेला परिस्थिती स्वीकारता येऊन तिचा मानसिक ताण न्यून होणे : ‘ऑगस्ट २०१९ मध्ये मी मुंबईतून कणकवली (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे आले. मुंबईला माझी म्हणावी तशी साधना होत नव्हती; परंतु कणकवली येथे आल्यानंतर ‘आपल्याला या सगळ्या परिस्थितीवर साधनेनेच मात करता येऊ शकते’, याची मला जाणीव झाली आणि माझ्या साधनेला प्रारंभ झाला. त्यानंतर सद्गुरु सत्यवान कदम यांच्याशी माझे बोलणे झाले. त्यांनी केलेल्या अमूल्य मार्गदर्शनामुळे माझ्यामध्ये पालट व्हायला लागला. माझा मानसिक ताण न्यून होऊन मला परिस्थिती स्वीकारता आली.

१ आ. साधिकेच्या मनातील सेवेविषयीचा नकारात्मक विचार नाहीसा होणे आणि तो विचार मनात पुन्हा कधी न येणे : त्यानंतर सद्गुरु सत्यवानदादांच्या कृपेने मला कणकवली येथे सेवांचे दायित्व मिळाले; परंतु माझ्यामध्ये असलेल्या स्वभावदोषांमुळे मला ताण येत असे. एकदा माझ्या मनात विचार आला, ‘आपण ही सेवा करण्यास असमर्थ आहोत.’ माझ्या मनातील हा विचार मी सद्गुरु दादांना बोलून दाखवला. सद्गुरु दादांनी त्या वेळी जे दिशादर्शन केले, त्यानंतर माझ्या मनावरील ताण निघून गेला आणि मनात तो विचार परत आला नाही.

सौ. भारती सावंत

२. सद्गुरु सत्यवानदादांची अनुभवलेली प्रीती !

२ अ. साधकांना त्रास होत असतांना तत्परतेने नामजपादी उपाय सांगणे : मला अनेक शारीरिक त्रास आहेत. मला केव्हाही तीव्र शारीरिक त्रास चालू होतो. त्या वेळी मध्यरात्री जरी मी सद्गुरु सत्यवानदादांना संदेश पाठवला, तरी सद्गुरु दादा तत्परतेने मला त्या त्रासांवर नामजपादी उपाय सांगतात.

२ आ. सद्गुरु सत्यवानदादा चांगली सेवा करणार्‍या साधकांचे नेहमी कौतुक करतात आणि त्यांना प्रसाद देतात.

३. साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीची तळमळ 

वर्ष २०२५ मध्ये गोवा येथे झालेल्या साधनेविषयीच्या शिबिराला जाण्यासाठी सद्गुरु सत्यवानदादांनी माझे नाव सुचवले आणि शिबिराला जाण्यातील अडचणी त्यांनीच दूर केल्या. या शिबिराच्या माध्यमातून त्यांनीच मला घडवले. माझ्यामध्ये अनेक स्वभावदोष आहेत; पण या स्वभावदोषांवर मात करून पुढे जाण्याचे दिशादर्शन सद्गुरु दादांमुळे मला या शिबिराच्या माध्यमातून प्राप्त झाले आणि काही अंशी माझ्यात पालटही झाला.

४. सहजता 

चुकांची जाणीव करून देणे असू दे किंवा साधनेतील मार्गदर्शन असू दे, सद्गुरु सत्यवानदादांच्या वाणीत सहजता जाणवते.

५. स्वतःत जाणवलेला पालट 

पूर्वी सद्गुरु सत्यवानदादांशी बोलतांना ‘कसे बोलायचे ?’, याचे माझ्या मनावर दडपण असायचे; परंतु आता मला त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलता येते.

६. सद्गुरु सत्यवानदादांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती !

६ अ. त्रास होत असतांना त्याविषयीच्या लघुसंदेशाचे भ्रमणभाषवर टंकलेखन करणे आणि सद्गुरु दादांना तो संदेश पाठवण्यापूर्वीच मन शांत होणे : वर्ष २०२४ मध्ये एकदा रात्री १२ वाजता भूतकाळातील प्रसंग आठवून मी पुष्कळ अस्वस्थ झाले होते. मला झोप लागत नव्हती आणि माझा नामजपही होत नव्हता. माझ्या मनात ‘सद्गुरु सत्यवानदादांना संपर्क करूया’, असा विचार आला; परंतु ‘एवढ्या रात्री सद्गुरु दादांना त्रास द्यायला नको’, असा विचार करून मी भ्रमणभाषवर संदेश पाठवायचा ठरवले. मी भ्रमणभाषवर माझ्या मनाच्या स्थितीचे टंकलेखन केले आणि काय आश्चर्य ! मी टंकलिखित केलेला संदेश पाठवला नव्हता, तरीही माझ्या मनाची स्थिती पूर्ववत् होऊन मन शांत झाले होते. त्याच वेळी माझ्याकडून गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आणि सद्गुरु दादा यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

६ आ. घरात पावसाचे पाणी शिरणे आणि सद्गुरु सत्यवानदादा त्यावर नामजपादी उपाय सांगत असतांनाच पाणी ओसरणे : वर्ष २०२५ मधील पावसाळ्यात आमच्या घरात पाणी शिरले होते. सद्गुरु सत्यवानदादांना भ्रमणभाषवर संपर्क केल्यावर त्यांनी नामजपादी उपाय सांगितले; पण त्यांनी भ्रमणभाष ठेवायच्या आतच पाणी ओसरले होते. ‘सद्गुरूंच्या केवळ बोलण्याने केवढा पालट होतो !’, याची मला प्रचीती आली.

६ इ. सद्गुरु दादा साधकांना नेहमी ध्येय ठेवून साधनेचे प्रयत्न करायला सांगतात. त्याप्रमाणे आज्ञापालन म्हणून आमच्याकडून प्रयत्न केले जातात. त्या वेळी ‘देव भरभरून देतो’, याची आम्ही सर्व साधकांनी अनुभूती घेतली आहे.

६ ई. सद्गुरु दादांनी प्रसादरूपी आशीर्वाद दिल्यावर साधिकेला साधनेसाठी प्रेरणा मिळणे आणि साधकांमध्ये सांघिकभाव निर्माण होऊन त्यांनी सेवेचे सर्व उपक्रम राबवणे : माझ्या मनामध्ये एकदा अहंयुक्त विचार आला, ‘मी दायित्वाची सेवा करते; पण सद्गुरु सत्यवानदादांनी मला कधी प्रसाद दिला नाही, म्हणजे माझी सेवा गुरुचरणी रुजू होत नाही’; पण देवापासून काहीच लपत नाही. त्यानंतर दोन दिवसांनी सद्गुरु दादा जिज्ञासूंना भेटण्यासाठी आम्ही रहातो, त्या ठिकाणी आले होते. आम्ही सेवेहून परत येतांना मी गाडीतून उतरत असतांना सद्गुरु दादांनी मला प्रसाद दिला. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘आता सेवा वाढवायची आहे.’’ त्या वेळी ‘त्या प्रसादाच्या रूपात त्यांनी कणकवली येथील साधकांना साधनेच्या दृष्टीने आशीर्वादही दिला’, असे मला जाणवले. त्यामुळे मला साधनेसाठी प्रेरणा मिळाली. सद्गुरु दादांच्या या प्रसादाने आणि आशीर्वादरूपी संकल्पाने आता कणकवली येथील साधकांमध्ये सांघिकभाव निर्माण झाला आहे आणि सेवेचे सगळे उपक्रम क्षमतेनुसार अल्प-अधिक प्रमाणात राबवले जात आहेत.

६ उ. सद्गुरु दादांकडे पाहिले की, मला त्यांच्या जागी मारुतिरायांचे दर्शन होते.

७. कृतज्ञता 

‘अशा सद्गुरूंच्या छत्रछायेखाली मला साधना करता येत आहे’, हे माझे परम भाग्य आहे. याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले  आणि सद्गुरु सत्यवानदादा यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते. ‘माझी साधना वृद्धींगत होऊन मला लवकरात लवकर गुरुचरणांवरचे फूल बनता येऊ दे’, अशी मी गुरुचरणी आणि सद्गुरु सत्यवानदादांच्या चरणी प्रार्थना करते.’

– सौ. भारती सावंत, कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. (१०.३.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक