छत्रपती शिवरायांच्या चरित्रातील बोध मांडणारी पुस्तिका : ‘छत्रपती शिवाजी महाराज’ !

श्री. अजिंक्य अनिल गणोरकर हे ‘कॉर्पोरेट’ जगतात पुणे येथे चांगल्या दायित्वाची नोकरी करत होते. सनातन संस्थेच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमातील एकूण कार्य पाहून ते नोकरी सोडून पूर्णकालीन साधक बनले. रामनाथी येथील सनातनच्या आश्रमामध्ये ते मार्च २०१८ ते जून २०२१ इतका कालावधी होते. ‘कॉर्पोरेट’ जगत सोडून पूर्णकालीन साधक बनण्यामागील त्यांची वृत्ती मला कौतुकास्पद वाटली होती. नंतर कौटुंबिक दायित्वामुळे ते जबलपूर (मध्यप्रदेश) येथे गेले आणि त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केला. अचानक माझ्यासमोर त्यांनी लिहिलेली, संरचना, चित्रांकितही केलेली छत्रपती शिवाजी महाराज ही पुस्तिका आली. त्याविषयीचे लिखाण येथे देत आहे.

पुस्तकाचे मुखपृष्ठ • संपर्क भ्र.क्र. : ९७६४६११७०४ • ई-मेल : [email protected]

१. पुस्तक प्रयोजनाची पार्श्वभूमी

प्रारंभीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आणि इतक्या मोठ्या अक्षरांमधील पुस्तिका लहान मुलांसाठी म्हणून छापले असेल, असे मला वाटले. प्रत्यक्षात ती उघडून भाषेची ढब पहाताच ती सर्वसामान्य प्रौढ तरुण वाचकांसाठी आहे, हे लक्षात आले. त्याविषयी मला मोठे आश्चर्य वाटले.

डॉ. दुर्गेश सामंत

लेखकाचे मनोगत वाचल्यानंतर हे आश्चर्य दूर झाले. या पुस्तिकेचे प्रयोजन कथा सांगण्यासाठी नसून लेखकाच्या हृदयात छत्रपतींच्या जीवनातून जी मूल्ये रुजली आहेत, ती इतरांनाही सांगण्यासाठी आहे. ते लिहितात, ‘…छत्रपतींच्या जीवनातून समजते की, खरी शक्ती तलवारीत नसते, तर योग्य विचारांत, धैर्यात आणि आपल्या लोकांवरील प्रेमात असते. जेव्हा तुम्ही सत्य बोलता, इतरांना साहाय्य करता, कष्ट करता आणि प्रत्येकाशी न्याय करता, तेव्हा तुम्ही त्याच मार्गावर चालत आहात, ज्यावर शिवाजी महाराज चालले होते.’

‘आजच्या डिजिटल जमान्यातील छापील पुस्तक का ?’, हे सांगतांना ते (गणोरकर) म्हणतात, ‘नव्या जमानातील मोबाईल (भ्रमणभाष), इंटरनेट इत्यादी गॅजेट्समधून (उपकरणांमधून) पुस्तकातून जे मिळते, ते मिळणार नाही; कारण पुस्तक आपला मित्र आणि कायम समवेत असणारा मार्गदर्शक आहे.’

२. पुस्तकाची आकर्षक, सुटसुटीत आणि चित्रमय मांडणी

पुस्तिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रत्येक महत्त्वाचा प्रसंग स्वतंत्र प्रकरणातून दिला आहे. ‘प्रत्येक प्रकरण, म्हणजे एक पान असे आहे. काही प्रसंग मिळून एक कालखंड म्हणून त्या कालखंडाचा एक अध्याय’, अशी मांडणी आहे. प्रत्येक चित्रांच्या माध्यमातून वाचकाला त्या काळाचा अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक इतिहास सांगण्यासाठी नव्हे, तर ते वाचकाच्या हृदयात स्वाभिमान, शौर्य आणि देशप्रेम जागृत करण्यासाठी हा प्रयत्न आहे, हे आपल्याला समजते. यातून आपल्याला एक दिशा मिळते.

यात एकूण ७ अध्याय आहेत. ज्यामध्ये छत्रपतींच्या जन्मापासून देहत्यागापर्यंत वेगवेगळे प्रसंग आहेत. त्यात प्रथम प्रसंग साररूपाने तर नंतरचा भाग त्यातून घ्यायचा बोधाविषयी आहे. दोन्हीमधून जो नेमका बोध लेखकाला सांगावासा वाटतो, तो ठळक अक्षरामध्ये देण्यात आलेला आहे. सध्याच्या काळातील मराठी वाचकाला अडचण येऊ नये, यासाठी अत्यावश्यक ठिकाणी संज्ञा स्पष्ट करणार्‍या टिपा द्यायला लेखक विसरलेले नाहीत. उदाहरणार्थ गनिमी कावा, मावळ प्रदेश इत्यादी. पुस्तकातील पान संख्या रोमन लिपीत लिहिलेली आहे. ते पाहून छोट्या बाळाला गालावर दृष्ट लागू नये म्हणून छोटीशी काळी तीट लावतात, तसे काहीसे वाटले. असो.

प्रत्येक प्रकरणाच्या प्रारंभीला समर्पक चित्र आहे. याचे एक उदाहरण पहा. ‘आगर्‍याची घटना’ या प्रकरणाच्या प्रारंभीलाच जे चित्र आहे, त्यामध्ये संपूर्ण अंधार, छोटा चंद्र दूर आकाशात आणि घोड्यावर स्वार झालेल्या छत्रपती शिवरायांच्या थोड्याच अंगावर प्रकाश, असे दाखवले आहे. यातून प्रसंग मोठा बाका आहे; पण कुठेतरी सुटकेची वाट आहे, हे लक्षात येते. अशी जवळपास २७ चित्रे आहेत. प्रत्येक चित्र रंगीत अन् पूर्ण पानभर आहेत. या चित्रांच्या माध्यमातून लेखकाची त्या प्रकरणाकडे पहायची दृष्टी, तसेच ते बनवण्यातील तांत्रिक कुशलता स्पष्ट होते.

श्री. अजिंक्य गणोरकर

३. लेखकाची महत्त्वाची दृष्टी

छत्रपती शिवरायांचा इतिहास मराठी माणसांना नवीन नाही. त्यामुळे त्यात आणखीन एक विस्तारीत ग्रंथ लिहिण्याऐवजी एखादी पुस्तिका की, ज्यातून छत्रपती शिवरायांचे गुण समोर येतील आणि सध्याच्या काळात आचरणात आणण्यायोग्य असा काही बोध मांडता येइल, ही लेखकाची दृष्टी महत्त्वाची आहे.

४. पुस्तिकेसंबंधी अन्य माहिती

पुस्तिकेची छपाई आणि रचना इत्यादी तांत्रिक अंगे चांगली आहेत. हे पुस्तक ५६ पानी आहे. प्रत्येक पानच अतीउत्तम दर्जाच्या कागदावर छापले आहे. पुस्तिका ‘डिझाईन कंपनी पब्लिकेशन’ या प्रकाशन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेली असून ती त्यांच्या ‘स्वराज्याच्या गाथा’ या मालिकेतील पहिली पुस्तिका आहे. आगामी पुस्तिकांची नावे आहेत, ‘छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्याचे स्तंभ पेशवा बाजीराव.’

श्री. अजिंक्य गणोरकर यांना आगामी सर्व पुस्तिकांसाठी शुभेच्छा !

गुरुचरणार्पणमस्तु ।

– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६५ वर्षे), एम्.डी. (मेडिसीन), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.३.२०२६)