Prediction On India : आखाती देशांतील काही भागांवर भारताचे नियंत्रण असणार !

  • वर्ष १९७२ मध्ये ‘शाकाहारी पत्रिका’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले भाकीत

  • पाकिस्तान नावाचा कोणताही देश उरणार नाही !

चंडीगड – जागतिक स्तरावर वाढते युद्ध आणि तणाव यांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक माध्यमांवर नव्या आणि जुन्या भविष्यवाण्या वेगाने प्रसारित होत आहेत. या पार्श्वभूमीवर वर्ष १९७२ मधील ‘शाकाहारी पत्रिका’ नावाच्या एका हिंदी मासिकाने प्रसिद्ध केलेले भाकीतही प्रसारित होत आहे. या नियतकालिकाने १२ जानेवारी १९७२ या दिवशी भाकीत छापल्याचे त्या वेळचे नियतकालिकाचे पान प्रसारित झाले आहे. यात भविष्यातील मोठी युद्धे, देशांचा विनाश आणि नरसंहार यांसारखे गंभीर अन् भयानक दावे करण्यात आले आहेत. त्यातच इस्रायल आणि अरब देश यांमध्ये युद्ध होईल. बहुतेक अरब देशांवर इस्रायलचे नियंत्रण असेल. तसेच आखाती देशांतील काही भागांवर भारताचेही नियंत्रण असेल, असेही म्हटलेले आहे. याविषयीचे वृत्त ‘पंजाब केसरी’ या हिंदी दैनिकाने प्रकाशित केले आहे.

या भाकितात म्हटले आहे की,

१. पूर्व पाकिस्तान संपला आहे, आता पश्चिम पाकिस्तानही संपेल. पाकिस्तान नावाचा कोणताही देश शिल्लक रहाणार नाही.

२. सर्व मुसलमान देश आपापसांत लढून नष्ट होतील. जगातील मुसलमानांची संख्या इतर सर्व धर्मांच्या लोकांपेक्षा अल्प होईल. जे मुसलमान वाचतील, ते धर्मात्मा असतील.

३. सर्व लहान देश फुटून मोठ्या देशांमध्ये विलीन होतील आणि जगातील बहुतांश देशांमध्ये युद्ध होईल. जगात मोठ्या प्रमाणावर नरसंहारासारखी परिस्थिती निर्माण होईल.

काय आहे ‘शाकाहारी पत्रिका’ ?

‘शाकाहारी पत्रिका’ हे एक हिंदी प्रकाशन होते. ते प्रामुख्याने शाकाहार, धर्म, समाज आणि नैतिक मूल्ये यांच्याशी संबंधित विषयांवर लेख प्रकाशित करत असे. लोकांमध्ये शाकाहार, अहिंसा आणि नैतिक जीवन यांबद्दल जागरूकता निर्माण करणे, हा या मासिकाचा उद्देश होता. हे मासिक ‘शाकाहारी सदाचारी बाल संघ’द्वारे प्रकाशित केले जात असे, ज्याची स्थापना २ ऑक्टोबर १९६९ या दिवशी बाबा जयगुरुदेव यांनी केली होती. या संघटनेचा उद्देश नैतिक शिक्षण, शाकाहार आणि आध्यात्मिक जीवन यांना प्रोत्साहन देणे हा होता.