वास्तूशास्त्रविषयक लेखमाला : लेखांक १८
१४ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखामध्ये आपण प्रवेशद्वार आणि त्याचे नियम यांविषयी जाणून घेतले आहे. आता मुख्य भवनातील अंतर्गत रचनेच्या अंतर्गत देवघराविषयी जाणून घेऊया.
लेखांक १७ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/1018168.html
१. देवघराचे महत्त्व
देवघर हा आपल्या भवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. देवघरातून संपूर्ण घरामध्ये वैश्विक ऊर्जा, म्हणजे चैतन्याचे प्रक्षेपण होत असते. घरात रहाणार्या सर्वांनाच येथून ऊर्जा प्राप्त होत असते; पण सध्या वास्तूनिर्मितीच्या वेळी देवघराचा तेवढा प्राधान्याने विचार होतांना दिसत नाही. घर बांधून झाल्यावर स्वयंपाकघरातील जागा देवघरासाठी ठेवली जाते. सध्या बर्याच सदनिकांमध्ये देवघरासाठी वेगळे नियाेजन नसते, तेव्हा एखाद्या भिंतीवर लाकडी देव्हारा लावून ते सिद्ध केले जाते. अशा वेळी देवघराविषयी सर्व नियमांचा विचार करणे कठीण जाते. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा
टिकून रहाण्याचे प्रमाणही न्यून झाले आहे. म्हणून नवीन घर बांधतांना आपण कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवे, ते आता आपण पाहूया.
२. देवघर कोणत्या दिशेला असावे ? आणि देवघरातील मूर्तींची उंची
‘ईशान्यां देवतागेहं ।’ – बृहत्संहिता
देवघर हे घराच्या ईशान्य दिशेला असावे, याविषयी सर्वच वास्तूशास्त्रकारकांनी सांगितले आहे. पूर्वेकडे स्वतःचे मुख होईल, असे शिखी पदामध्ये देवघर घेतल्यास किंवा अदिती पदात उत्तरेकडे स्वतःचे मुख होईल, असे देवघर घेतल्यास त्यामुळे तेथे रहाणार्यांचे शरीर बळकट आणि आरोग्य चांगले रहाण्यास सकारात्मक ऊर्जेचा लाभ होत असतो.
आरभ्यैकाङ्गुलादूर्ध्वं पर्यन्तं द्वादशाङ्गुला ।
गृहेषु प्रतिमा पूज्या नाधिका शस्यते तत: ।।
तदूर्ध्वं नवहस्तान्तं पूजनीया सुरालये ।
दशहस्तादितो याऽर्चा प्रासादेन विनार्चयेत् ।। – रूपमंडन, अध्याय १, श्लोक ७, ८
अर्थ : भवनात पूजा करावयाची मूर्ती एक अंगुल (३ ते ४ इंच) ते १२ अंगुल (९ इंच) याच्यामधील ठेवून पूजा करता येते. १२ अंगुलपेक्षा अधिक उंची असल्यास अशा मूर्ती देवालयात ठेवून पूजा करावी. १० हातापेक्षा अधिक उंच असलेल्या मूर्ती मंदिराबाहेर ठेवून पूजा करावी.

३. मूर्तीचे प्रकार आणि त्याचे परिणाम
अ. सुवर्ण : शांती, ऐश्वर्य, मोक्ष
आ. चांदी : समृद्धी, धन वृद्धी, सुख, संतोष
इ. तांबे : संतती, समृद्धी
ई. पितळ : विद्या, आयुरारोग्य, धनवृद्धी
उ. कांसे : आरोग्य, आयु
ऊ. लोह, शिसे आणि जस्त : कटुता, दु:ख, अनारोग्य, हिंसक वृत्ती
ए. माती : कामना पूर्ती (अल्प काळ लाभदायक)
ऐ. स्फटिक : धनलाभ
ओ. पंचधातू (पितळ ५, तांबे ४, कांस्य ३, चांदी २, सोने १ या प्रमाणात) : सर्वार्थ साधन
घरातील देवघरात २ शिवलिंगे, २ शाळीग्राम (१, ४, ६, ८ प्रमाणात घ्यावे), २ सूर्यकांत, ३ देवी, ३ गणपती, २ शंख, आयुधासह उग्र दशावतारी मूर्ती, अग्नीने दग्ध मूर्ती, भग्न मूर्ती, मृत व्यक्तीचे टाक देवघरात असू नये.
देवघर हे भूमीपासून काही उंचीवर असावे; परंतु पूजा नेहमी बसून करता येईल, या पद्धतीने त्याची व्यवस्था असावी. घरातील देवघराला कळस नसावा. पूजा करतांना पूजा करणार्याचे मुख हे पूर्व किंवा उत्तर दिशेला असायला हवे.
(संदर्भ ग्रंथ : ‘मयमतम्’, ‘मानसार’, ‘रूपमंडन’, ‘बृहत्संहिता’)
– श्री. श्रेयस पिसोळकर (वास्तूविशारद, ज्योतिष होराभूषण, होरारत्न), फोंडा, गोवा. (१९.३.२०२६)
लेखांक १९ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1026049.html

क्रिकेटचा उदो उदो नको !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?
स्त्रीत्वाचा उत्सव !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘सत्संग’ आणि कला !