वास्तूशास्त्रविषयक लेखमाला : लेखांक १७
मागच्या लेखामध्ये आपण द्वारवेधाविषयी माहिती जाणून घेतली. आता आपण द्वाराचे नेमके स्थान कुठे असावे ? आणि द्वाराविषयी काही अन्य नियम समजून घेऊया.
लेखांक १६ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/1015692.html

१. द्वाराचे स्थान
‘मयमतम्’ या वास्तूशास्त्राच्या ग्रंथानुसार चारही दिशांना द्वार घेऊन चालते; परंतु ते ‘आपण घराच्या मध्यभागी उभे राहिल्यास मध्यरेषेच्या डाव्या बाजूच्या दोन पदांमध्ये घ्यावे’, असे सांगितले आहे. ही स्थाने द्वारासाठी योग्य आहेत. बाहेरून घरात प्रवेश करतांना हाच भाग मध्यरेषेच्या उजव्या बाजूला येतो.
वासगेहानि सर्वेषां प्रविशेद् दक्षिणेन तु ।
द्वाराणि तु प्रवक्ष्यामि प्रशस्तानीह यानि तु ।।
पूर्वेणेन्द्रं जयन्तं च द्वारं सर्वत्र शस्यते ।
याम्यं च वितथं चैव दक्षिणेन विदुर्बुधा: ।।
पश्चिमे पुष्पदन्तं च वारुणं च प्रशस्यते ।
उत्तरेण तु भल्लाटं सौम्यं तु शुभदं भवेत् ।। – मत्स्यपुराण, अध्याय २५५, श्लोक ७ ते ९
अर्थ : सर्वांच्याच घरात बाहेरून उजव्या बाजूने प्रवेश करावा. पूर्वेकडचे ‘महेंद्र’ आणि ‘जयंत’ या पदावर बांधलेले द्वार प्रशस्त मानले आहे. बुद्धीमान लोक दक्षिण दिशेला याम्य आणि वितथ पदावर द्वार नियोजन करतात. पश्चिमेला द्वार पुष्पदंत आणि वरुण पदामध्ये प्रशस्त आहे अन् उत्तर दिशेला भल्लाट, तसेच सोम या पदांमध्ये द्वार शुभदायक आहे.
यानुसार आपल्याला लक्षात येते की, घराला मुख्य प्रवेशद्वार हे चारही दिशांना चालते; परंतु घराच्या मध्यभागातून पाहिल्यास मध्यरेषेच्या डाव्या बाजूला असायला हवे.

२. द्वारमान
वास्तूशास्त्रकारांच्या मते मानवासाठी बांधावयाच्या घराचे मुख्य प्रवेश द्वारमान हे त्या घराच्या खांबाच्या उंचीस आठने भागावे. जे आठ भाग होतील, त्यापैकी साडेसहा भाग एवढी द्वाराची उंची असावी. उदा. घराच्या खांबाची उंची जर १६ फूट असेल, तर त्याचे आठ भाग केल्यास १६/८ = २ प्रत्येक भाग हा २ फुटाचा येतो. द्वाराची उंची साडेसहा भाग म्हणजे ६.५ गुणिले (X) २ = १३ फूट, म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराची उंची ही १३ फूट असायला हवी.
द्वाराच्या रुंदीचा विचार करतांना द्वाराच्या उंचीचे समान ९ भाग करावे. त्यातील अर्धा भाग बाजूला काढून उर्वरित ८.५ भागांची निम्मी द्वाराची रुंदी असावी. उदाहरणार्थ द्वाराची उंची १३ फूट, तर त्याचे ९ भाग केल्यास १३/९ = १.४४ फूट. प्रत्येक भाग हा १.४४ फुटाचा येतो. १.४४ चा अर्धा भाग म्हणजे ०.७२. एकूण ८.५ भागांचे माप येईल १३ – (वजा) ०.७२ = १२.२८. त्याचा निम्मा भाग केल्यास १२.२८/२ = ६.१४, म्हणजेच द्वाराची रुंदी असावी ६.१४ फूट.

३. दरवाजा चौकटीवर कुठे बसवावा ?
पूर्वी घराच्या भिंती या भरपूर जाड असायच्या. ३ ते ४ फुटांपर्यंत रुंदी असायच्या, तेव्हा नेमके भिंतीच्या रुंदीच्या ठिकाणी द्वाराची चौकट आणि द्वार कुठे असावे, याविषयीही शास्त्रकारांनी सांगितले आहे. एकूण भिंतीच्या रुंदीचे समान १२ भाग करावे. त्यापैकी बाहेरील बाजूस ५ आणि आतील बाजूस ७ असे भाग करणारी जी रेषा असेल, त्यावर चौकटीची मध्य रेषा असावी. उदाहरणार्थ भिंतीची रुंदी ४ फूट आहे, तर त्याचे समान १२ भाग म्हणजे ४/१२ = ०.३३ फूट. त्यापैकी बाहेरील बाजूस ५ भाग सोडायचे, म्हणजे ०.३३ गुणिले (X) ५ = १.६५ फूट. एवढी जागा बाहेरील बाजूस सोडून रेषा मारावी. त्या रेषेवर मध्यभागी द्वाराची चौकट बसवावी. सध्या भिंतीची रुंदी एवढी नसत; परंतु आपण १ ते २ फूट भिंतींमध्येसुद्धा याचा विचार करू शकतो.
४. मुख्य प्रवेशासाठी एक द्वार कि दोन द्वारे ?
मुख्य प्रवेशासाठी एक द्वार घ्यावे कि दोन ? असा प्रश्न बर्याच जणांना पडतो. त्याविषयी आपल्या शास्त्रात सांगितले आहे.
कवाटबहलं प्रोक्तं देवद्विजमहीभृताम् ।।
द्विकवाटविशेषेण एक एव प्रकीर्तित: ।
सामन्तप्रमुखादीनां द्वीकवाटं प्रशस्यते ।। – मयमतम्, अध्याय ३०, श्लोक १३,१४
अर्थ : कोणत्याही मजल्यावरील दाराच्या नियोजनासाठी त्या मजल्याच्या उंचीनुसार जे दार असेल, त्यास एकच कवाड ठेवता येईल; परंतु देऊळ, ब्राह्मण आणि क्षत्रिय यांसाठी २ कवाडांचे दार असावे. सामंत (प्रशासकीय अधिकारी) आणि प्रमुख यांच्यासाठी २ कवाडे प्रशस्त समजावीत.
दारासाठी २ कवाडे असतात, तेव्हा त्यापैकी डाव्या बाजूचे मोठे आणि दुसरे लहान असावे. मोठ्या कवाडास मातृ कवाड, तर लहान कवाडास पुत्रिका कवाड, अशी संज्ञा आहे.

५. द्वाराच्या आकारानुसार त्याचे फल
अ. चौकोन : लाभकारक
आ. त्रिकोण : स्त्रियांना पीडा
इ. शकटाकार : स्वामी मृत्यू
ई. सूपाकार : गृह कलह
उ. वर्तुळाकार : कन्या वृद्धी
ऊ. मध्यभागी कमी असणारे : शोकप्राप्ती
६. द्वाराविषयी अन्य नियम
अ. बृहत्संहितेनुसार मुख्य प्रवेशद्वार हे घरातील अन्य द्वारांसमान नसावे. ते इतर द्वारांपेक्षा मोठे असावे.
आ. मुख्य प्रवेशद्वारावर कलश, श्रीफळ, पाने, वेली इत्यादी मंगल चिन्हे असावीत.
इ. आवाज करत बंद होणारा दरवाजा कधीही नसावा. तो भयकारक असून गर्भपात करणारा असतो.
ई. सध्या बर्याच सदनिकांमध्ये बैठक कक्षामध्ये ‘ओपन गॅलरी’ (खुली गच्ची) ठेवली जाते, त्याचे द्वारही सदनिकेत प्रवेश करणार्या द्वारापेक्षा मोठे असते. त्यामुळे शास्त्रात सांगितलेल्या नियमानुसार ते सिंहद्वार म्हणून गणले जाते. परिणामी त्याचे फल यजमानाला भोगावे लागते. आपण विचार करत असतो की, आपले प्रवेशद्वार पूर्वेला आहे; परंतु ‘ओपन गॅलरी’चे द्वार हे आकाराने सर्वांत मोठे असल्याने त्याच्या दृष्टीने फल विचारात घ्यावे लागते. त्यामुळे घरामध्ये मुख्य प्रवेशद्वारापेक्षा मोठे अन्य द्वार असू नये.
(संदर्भ ग्रंथ : ‘विश्वकर्मप्रकाश’, ‘मयमतम्’, ‘मत्स्यपुराण’, ‘बृहत्संहिता’)
– श्री. श्रेयस पिसोळकर (वास्तूविशारद, ज्योतिष होराभूषण, होरारत्न), फोंडा, गोवा. (१३.३.२०२६)
लेखांक १८ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1020784.html
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
क्रिकेटचा उदो उदो नको !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?
स्त्रीत्वाचा उत्सव !