वास्तूशास्त्रविषयक लेखमाला : लेखांक १९
२१ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘आपण देवघर कुठे असावे ? आणि त्याची रचना’, यांविषयीची माहिती जाणून घेतली. आता आपण भवनातील दुसरा महत्त्वाचा भाग ‘स्वयंपाकघर’ याविषयी जाणून घेऊया. स्वयंपाकघर योग्य असणे, हे स्त्रियांच्या दृष्टीने अधिक आवश्यक असते; कारण त्यांना दिवसभर स्वयंपाकघरात स्वत: ऊर्जावान राहून इतरांसाठी स्वयंपाक करायचा असतो, तसेच स्वयंपाकघर योग्य दिशेला असणे, हे वास्तूतील सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे असते. यासाठी स्वयंपाकघराचा विचार करणे महत्त्वाचे आहे.
लेखांक १८ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1020784.html
१. स्वयंपाकघराच्या दृष्टीने आग्नेय दिशेचे महत्त्व आणि ‘अग्नीचक्रा’चा विचार
वास्तूशास्त्रामध्ये ‘अग्नीचक्रा’चा विचार स्वयंपाकघरासाठी प्राधान्याने केला जातो. सूर्याच्या परिभ्रमणामुळे वास्तूच्या प्रत्येक दिशेवर वेगवेगळ्या कालावधीत परिणाम होत असतो. उदाहरणार्थ सूर्याेदयाच्या अगोदरपासून वास्तूचा पूर्व भाग गरम होण्यास प्रारंभ होतो. पहाटे ४.३० ते सकाळी ७.३० या कालावधीत पूर्व दिशेवर परिणाम होतो. पुढे सकाळी ७.३० ते सकाळी १०.३० या कालावधीत आग्नेय दिशेवर सूर्याचा परिणाम होतो. पुढे माध्यान्ह काळात दक्षिण मग नैर्ऋत्य, पश्चिम या क्रमाने सूर्याच्या ऊर्जेचा परिणाम होत जातो.
२४ घंट्यांमध्ये सूर्याच्या परिभ्रमणाचा ८ दिशांवर परिणाम होत जातो, तसेच याचा तेथे रहाणार्या लोकांवरही दीर्घकाळ परिणाम होतो. सूर्य जसा पुढे जातो, तशी मागची दिशा हळूहळू शांत आणि थंड होत जाते. सूर्य पूर्व दिशेला येण्यापूर्वीच काही कालावधी तेथे त्याच्या ऊर्जेमुळे क्रियाशीलता वाढायला प्रारंभ होतो. जेव्हा सूर्य प्रत्यक्ष त्या दिशेला असतो, तेव्हा क्रियाशीलता सर्वाेच्च असते. जेव्हा सूर्य पुढे जातो, तशी क्रियाशीलता हळूहळू न्यून होत जाते. वास्तूशास्त्रामध्ये या अग्नीचक्राला अत्यंत महत्त्व दिले आहे. म्हणून भवनाची अंतर्गत रचना करतांना या अग्नीचक्राचा विचार करणे आवश्यक आहे. सकाळी ७.३० ते १०.३० या कालावधीत सूर्य आग्नेय दिशेत प्रभावी असतो. हीच वेळ साधारण स्वयंपाकाच्या दृष्टीने योग्य असते म्हणून ‘स्वयंपाकघर आग्नेय दिशेस असावे’, असा विचार वास्तूशास्त्रामध्ये केला आहे.
‘अपराजितपृच्छा’ या ग्रंथानुसार स्वयंपाकघरासाठी आग्नेय कोपरा निवडण्यास सांगितले आहे. या ठिकाणी अधिक काळ राहिल्याने प्रकृती स्वास्थ्य उत्तम रहाते; कारण आवश्यक असणारे कोवळ्या सूर्यकिरणांचा लाभ आग्नेय दिशेत अधिक काळ होत असतो. कोवळ्या उन्हात असणारी ‘इन्फ्रारेड’ किरणे ही शरिरास उपयोगी असून अन्नपदार्थ टिकवण्यासाठीही महत्त्वाचे कार्य करतात. या दिशेत स्वयंपाकघर असल्यास हाडांची मजबूती आणि मानसिक स्वास्थ्य या दोन्हींचा लाभ आपल्याला होत असतो.

१ अ. ईशान्य दिशेत स्वयंपाकघर असण्याविषयी मार्गदर्शन :
अंतरिक्षे भवेच्चुल्ली सत्यके स्यादुलूखलम् ।
ऐशान्यां पचनस्थानं सर्वेषां देहिनां हितम् ।। – मयमतम्, अध्याय २७, श्लोक १००
अर्थ : ‘अंतरिक्ष (आकाश)’ या पदामध्ये शेगडी असावी, तर ‘सत्य’ या पदामध्ये उखळ असावे, तसेच ‘ईशान (शिखी)’ पदामध्ये पचनस्थान (पाकगृह) असणे, हे सर्वांसाठी हिताचे आहे.
‘मयमतम्’ या ग्रंथामध्ये पूर्वीच्या दिनचर्येला धरून ईशान्य दिशेत स्वयंपाकघर असावे, असे सांगितले आहे. या ठिकाणी ते सर्वांच्या हिताचे आहे, असेही सांगितले आहे; परंतु ईशान्य दिशेत स्वयंपाकघर असल्यास पहाटे स्वयंपाक करण्याची वेळ निर्माण होते. आताच्या जीवनपद्धतीनुसार ही गोष्ट तेवढी अनुकूल होत नाही; म्हणून आग्नेय दिशेत स्वयंपाकघर घेऊन ‘आकाश’ या पदामध्ये चूल घ्यावी.
२. वर्णानुसार चूल कशी असावी ?

नरशीर्षकवन्नृपस्य चुल्ली चतुरस्रं द्युसदां महीसुराणाम् ।
चतुरायतकं विशां परेषामितरेषामितरेषु सर्वमिष्टम् ।। – मयमतम्, अध्याय २७, श्लोक १०३
अर्थ : राजासाठी चूल किंवा अग्नीस्थान बनवायचे असल्यास ते मनुष्याच्या डोक्याच्या आकाराचे, म्हणजेच गोल असे बनवावे. देवालये किंवा ब्राह्मण वर्णासाठी चूल चौकोनी बनवावी. वैश्य वर्णियांसाठी आयताकार, तर अन्यांसाठी अन्य आकारांची चूल बनवावी.
३. चुलींची संख्या
इन्द्वग्निभूतमुनिनन्दकरुद्रसंख्याश्चुल्यो । – मयमतम्, अध्याय २७, श्लोक १०४
अर्थ : इंदु म्हणजे १, अग्नी म्हणजे ३, भूत म्हणजे ५, मुनी म्हणजे ७, नन्दक म्हणजे ९ आणि रुद्र म्हणजे ११ (संस्कृतमध्ये संख्यांसाठी वरीलप्रमाणे शब्दांची योजना केली जाते. उदाहरणार्थ इंदु म्हणजे चंद्र तो एकच आहे म्हणून इंदु हा शब्द एक संख्येसाठी वापरला आहे, भूत म्हणजे पंचमहाभूत हा शब्द ५ या अंकासाठी वापरला जातो.)
चुलींची संख्या विषम, म्हणजेच १, ३, ५, ७, ९, ११ अशी असायला हवी.
४. स्वयंपाकघरातील रचनेविषयीचे महत्त्व
स्वयंपाकघरात अंतर्गत रचना करतांना सध्या पाण्याचा नळ, सिंक, शीतकपाट आणि इतर यंत्रे इत्यादी बर्याच गोष्टी स्वयंपाकघरात असतात. तेव्हा त्यांची रचना करतांनाही आपल्याला दिशांचे तत्त्व लक्षात घेऊन करायला हवे. पाण्याची व्यवस्था ही स्वयंपाकघरात करतांना स्वयंपाकघराच्या ईशान्य भागात करावी. विद्युत् यंत्रांची व्यवस्था ती सतत कार्यरत रहाण्याच्या दृष्टीने आग्नेय भागात करावी. ओला कचरा वगैरे या गोष्टी वायव्य भागात ठेवाव्यात. असा विचार आपण स्वयंपाकघराची अंतर्गत रचना करतांना करू शकतो. स्वयंपाक करणार्या गृहिणीचे मुख कायम पूर्वेकडे असणे महत्त्वाचे आहे. असे केल्यास स्वयंपाकघरातील इतर सर्व योग्य रचनेचे लाभ आपल्याला मिळू शकतात. ‘सर्वांना याप्रमाणे स्वयंपाकघराची योग्य रचना करण्यास प्रेरणा मिळून त्यायोगे राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी चांगले आरोग्य प्राप्त होवो’, अशी गुरुचरणी प्रार्थना !
(संदर्भ ग्रंथ : मयमतम्, मानसार, राजवल्लभ, अपराजितपृच्छा)
– गुरुसेवक श्री. श्रेयस पिसोळकर (वास्तूविशारद, ज्योतिष होराभूषण, होरारत्न), फोंडा, गोवा. (३१.३.२०२६)
लेखांक २० वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1028565.html

क्रिकेटचा उदो उदो नको !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?
स्त्रीत्वाचा उत्सव !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘सत्संग’ आणि कला !