‘या लेखाचा मुख्य मथळा वाचून काही जणांना विचित्र वाटेल, तर काही जणांना राग येईल; परंतु वस्तूस्थितीच आज अशी आहे की, आपल्याला माणूस होण्याची आवश्यकता आहे. आज विविध व्यासपिठांवरून मानवतेवर मोठमोठी व्याख्याने दिली जातात; परंतु समाजात माणुसकी निर्माण होणे पुष्कळ कठीण झाले आहे. आज अनेकांचे वागणे माणुसकीला शोभणारे नसते. एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यास त्याला साहाय्य करण्याऐवजी त्याचे चलचित्र काढले जाते. ‘त्याच्या कोणत्या वस्तू चोरून नेता येतील’, असाही विचार काही संधीसाधू करतात; परंतु त्याला त्वरित वैद्यकीय साहाय्य उपलब्ध होईलच, असे नसते. विविध शहरांमध्ये पादचार्यांसाठी सिद्ध केलेल्या पदपथांवरून काही तरुण भरधाव वेगाने गाड्या चालवतात आणि त्या पदपथावरून जाणार्या लोकांनाच ‘ते बाजूला सरकले नाहीत;’ म्हणून शिव्याही देतात. कित्येक वेळा गर्दीच्या ठिकाणी तर युवकांना समजवावे लागते की, अरे, ‘माणसा’सारखे वर्तन कर !
श्री. योगेश जलतारे, संपादक, ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम समूह. (५.२.२०२६)
भाग १

भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितल्याप्रमाणे त्याच्या मार्गाचे अनुसरण करून ‘नराचा नारायण’ होणे, हा पुरुषार्थ आहे.
१. माणुसकी असणाराच खरा माणूस !
‘स्वाध्याय’ परिवाराचे संस्थापक प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले त्यांच्या मार्गदर्शनात सांगत, ‘‘माणूस असेल, तर त्याच्या ठायी ‘माणुसकी’ असलीच पाहिजे. ती नसली, तर त्याला माणूस कसे म्हणायचे ? केवळ दोन पाय असतात; म्हणून तो माणूस झाला, असे होत नाही; कारण कावळ्यालाही दोन पाय असतात. एखादा संसार करतो; म्हणून त्याला माणूस म्हणायचे का ?; कारण पशू-पक्ष्यांचाही संसार असतो. त्यामुळे माणसाने माणसासारखे वर्तन केले, तरच त्याला ‘माणूस’ म्हणता येईल.’’
२. आध्यात्मिकदृष्ट्या ‘माणूस’ कोण ?
आजच्या लिखाणाचा विषय माणुसकीच्या अर्थाने नाही, तर आपल्यापैकी प्रत्येकाने आज आध्यात्मिक परिभाषेत सांगितल्याप्रमाणे खर्या अर्थाने ‘माणूस’ होण्याची आवश्यकता आहे, यासंबंधी आहे. वर्षारंभी आपण सर्वांनी ‘माणूस’ होण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी काय करणे आवश्यक आहे ? हे समजून घेऊन तसे आचरण करण्याचा प्रयत्न करूया.
भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला ‘कर्मयोग’ समजावून सांगतांना उपदेश केला आहे की,
यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः ।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ।। – भगवद्गीता, अध्याय ३, श्लोक २३
अर्थ : ‘हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), जर का मी सावध राहून कर्मे केली नाहीत, तर मोठी हानी होईल; कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुकरण करतात. यात एका अर्थाने जो भगवंताने सांगितलेल्या मार्गाने मार्गक्रमण करील, त्याला माणूस म्हणता येईल’, हे स्पष्ट होते. याच अध्यायात भगवंताने ‘माणसाने कसे कर्म करायला हवे ?’, याचा आदर्श घालून दिला आहे. तसे आचरण करणे अपेक्षित आहे. त्यामुळे जो भगवंताने सांगितलेल्या मार्गाने जात नाही, भगवंताने सांगितल्याप्रमाणे जो कर्म किंवा आचरण करत नाही, त्याला आध्यात्मिक अर्थाने ‘माणूस म्हणता येणार नाही.’
आज भगवंताने सांगितलेल्या मार्गाने जाणे तर दूरच, उलट एखादी व्यक्ती त्या मार्गाने वाटचाल करत असेल, तर तिची टिंगलटवाळी केली जाते.
आजचा माणूस म्हणजे शेपूट नसलेला एक प्राणी ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले मार्गदर्शनात सांगतात की, आजचा माणूस हा शेपूट नसलेला एक प्राणी आहे; कारण सर्व प्राणी स्वेच्छेने वागतात, त्यांना परेच्छा किंवा ईश्वरेच्छा असे काही ठाऊकच नसते. आज मनुष्यही प्राण्यांप्रमाणे स्वेच्छेने आचरण करतो. स्वतःला पाहिजे तसे उन्मत्त जीवन जगतो. त्यामुळे ‘त्याला ‘माणूस’ म्हणायचे का ?’, हा प्रश्न निर्माण होतो. हे सूत्र समजून घेण्यासाठी आता नेहमीच्या जेवणाचेच उदाहरण घेऊया.

प्रार्थना न करता जेवणाच्या ताटात हात घालणारा माणूस गायी-म्हशींसमानच !
भारतीय परंपरेत आचारधर्मानुसार जेवणापूर्वी प्रार्थना करून जेवण्यास सांगितले आहे; परंतु आज आपण सर्वत्र पहातो किंवा अनुभवतो की, जेवणाचे ताट समोर आल्यानंतर माणूस लगेच जेवायला आरंभ करतो. खरेतर ते जेवण ज्या भगवंताच्या कृपेने आपल्याला मिळालेले आहे, ते बनवण्यासाठी ज्या समाजघटकांनी कष्ट घेतले आहेत, अशा सर्वांविषयी मनात कृतज्ञताभाव निर्माण करून त्या जेवणातून आपल्यात चैतन्य आणि गुण यांची वृद्धी होण्यासाठी प्रार्थना करायची असते; परंतु माणसाला आज या सर्व गोष्टी गावंढळ वाटतात. एक प्रसिद्ध कीर्तनकार त्यांच्या कीर्तनात नेहमी सांगत, ‘‘गायी-म्हशी यांच्यासमोर चारा ठेवल्यानंतर त्या जशा त्यात लगेच तोंड घालतात, तसे मनुष्याचे झाले आहे. तोही लगेचच ताटात हात घालतो. त्यामुळे मनुष्यात आणि त्या प्राणीमात्रांत अंतर ते काय ?’’ यातून भगवंत किंवा संत यांना माणूस कसा असणे अपेक्षित आहे, हे समजते.
– श्री. योगेश जलतारे
३. केवळ भजन, पूजापाठ, श्लोक इत्यादी तोंडपाठ असणे म्हणजे मनुष्यत्व नव्हे !
प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले म्हणत, ‘‘आज माणसाला पुष्कळ भजने, श्लोक इत्यादी तोंडपाठ आहेत. भगवद्गीता आणि भागवत यांची पारायणेही अनेक जण करतात; परंतु ते करत असतांना ‘स्वतः माणूस आहोत’, हे विसरतात. त्यामुळेच माणसाचे अधःपतन होत आहे; परंतु दुर्दैवाने एखाद्या माणसाला ‘माणसासारखे वाग’, असे म्हटले, तर तो चिडतो. तो माकडचेष्टा करत असतो; परंतु त्याला ‘माकड’ म्हणता येत नाही. तो बोकडासारखा गुरगुरतो; परंतु त्याला ‘बोकड’ म्हणता येत नाही. तो भर रस्त्यात, सर्वांदेखत प्रणयचेष्टा करतो; परंतु त्याला ‘कुत्रा’ म्हणता येत नाही.’’ थोडक्यात केवळ धार्मिक अवडंबर करून चालणार नाही, तर त्या धार्मिकतेतून माणूस सदाचरणी व्हायला हवा. त्याच्यातील दुष्प्रवृत्तींचे विघटन होऊन त्याच्यात सद्गुण निर्माण व्हायला हवेत. यातून त्याला ‘माणूस’पण अनुभवता येईल. थोडक्यात माणसाला जर मनुष्यजन्माची अनुभूती घ्यायची असेल किंवा जीवनात खरा आनंद मिळवायचा असेल, तर त्याने सर्वप्रथम परमार्थाचे अनुसरण करून ‘माणूस’ व्हायला शिकले पाहिजे.

४. माणूस होण्यासाठी परमार्थ का आवश्यक ?
वर सांगितल्याप्रमाणे स्वतःसाठी जगणार्याला माणूस म्हणता येत नाही. त्यामुळेच माणसाला स्वतःत माणूसपण आणण्यासाठी म्हणजे माणसाचे गुण निर्माण करण्यासाठी आणि त्या माध्यमातून आनंदप्राप्ती म्हणजे ईश्वरप्राप्तीच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी पारमार्थिक जीवन जगणे आवश्यक आहे. त्यासाठी नित्यनेमाने साधना किंवा उपासना करायला हवी; कारण साधनेद्वारे या सर्व गोष्टी केवळ मनुष्यजन्मातच मिळवता येतात. एकदा का मनुष्यजन्म संपला की, परत अन्य योनींमध्ये साधना करता येत नाही. त्यामुळे मनुष्यजन्माचे पुष्कळ महत्त्व आहे. श्रीकृष्णाने गीतेत सांगितल्याप्रमाणे त्याच्या मार्गाचे अनुसरण करून ‘नराचा नारायण’ होणे, हा पुरुषार्थ आहे. हे साध्य करायचे असल्यास साधनेला पर्याय नाही. साधना केल्याविना जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सुटकाच होणे नाही. त्यानंतर मग ‘नराचा नारायणा’शी एकरूपतेचा टप्पा आहे. त्यामुळे गीतेचे आचरण करणे माणसाला अनिवार्य आहे.
५. माणसाच्या विचारांमधील गंमत !
आज संतांना माणसाच्या बुद्धीची कीव वाटते; कारण माणसाची गंमत म्हणजे हल्ली जन्माला आल्यानंतर लगेचच मुलाचा ‘विमा’ काढला जातो. त्याचे पुढील आयुष्य सुखासमाधानात जावे, ही मातृ-पितृ इच्छा त्यामागे असते. काही जण लग्नानंतर किंवा नोकरी-व्यवसाय चालू केल्यावर स्वतःचा विमा उतरवतात. का ? तर उद्याच्या जीवनाची कुणालाच शाश्वती नाही. याउलट ‘साधना म्हणून नामजप चालू करा’, असे जर सांगितले, तर ‘नामजप करणे हे काही तरुणपणीचे साधन नाही, ते म्हातारपणी करण्याचे उद्योग आहेत’, असे माणूस सांगतो. एकीकडे जगण्याची शाश्वती नाही, म्हणून विमा काढणारा माणूस ‘नामजप म्हातारपणी करू’, असे सांगून स्वतःच्या आयुष्याची निश्चिती देत असतो. आहे कि नाही गंमत ?
(क्रमशः)
– श्री. योगेश जलतारे, संपादक, ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम समूह. (५.२.२०२६)
भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1020301.html
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !