छत्रपती संभाजी महाराज आणि गुढीपाडवा – सत्य काय? 

आपल्याच समाजातील वैचारिक विकृतीला समंजस आणि समर्पक उत्तर !

सध्या मुद्दामहून एक गैरसमज पसरवला जात आहे, ‘स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजे यांची हत्या गुढीपाडव्याच्या दिवशी झाली; म्हणून ब्राह्मणांनी गुढी उभारणे चालू केले. त्यामुळे या दिवशी कुणीही नवीन वर्ष साजरे करू नये.’ अर्थात् या गैरसमजाचे जन्मदाते कोण आहेत ?, हे सांगणे सूज्ञास न लगे ! 

१. ‘मनुस्मृती’वर आरोप करणार्‍यांना तो ‘कायदाग्रंथ’ नसून ‘स्मृतीग्रंथ’ असल्याचे ठाऊकच नसणे 

‘छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा आनंद साजरा करण्यासाठी ब्राह्मणांनी गुढ्या उभारल्या’, या खोट्या प्रचारामागील पाया असा मांडला जातो की, संभाजीराजे यांची हत्या ब्राह्मणांनी मनुस्मृतीप्रमाणे केली; मात्र हा पाया पूर्णपणे डळमळीत आहे; कारण मुळात ‘मनुस्मृती’ हा ‘स्मृतीग्रंथ’ आहे, तो ‘कायदाग्रंथ’ नव्हे. ‘ज्या मनूने त्याची रचना केली, तो ब्राह्मण नसून क्षत्रिय होता’, हेही अनेकांना ठाऊक नसते.

छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या जर मनुस्मृतीप्रमाणे झाली असेल, तर आमच्या ‘कृष्णदेवराय’ या राजाची हत्या कोणत्या ग्रंथाच्या आधारे झाली ?, हे का सांगितले जात नाही ? राजा कृष्णदेवराय यांची हत्या मोगल आक्रमकांनी केल्यानंतर त्यांचे शिर कापून ते न्हाणीघराच्या पाणी वाहून नेणार्‍या नालीच्या तोंडावर बसवले होते. शेवटच्या क्षणापर्यंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या समवेत असलेला कवी कलश हाही ब्राह्मणच होता. याविषयी कधीच का सांगितले जात नाही ?

२. ‘बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास’ या पुस्तकात लिहिलेला शंभूराजांच्या हत्येचा प्रसंग ! 

‘बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास’ या पुस्तकात लिहिले आहे की, ‘शंभूराजांची हत्या बामणांनी (ब्राह्मणांनी) ‘मनुस्मृती’च्या कायद्यानुसार केली. सर्व शिक्षा एकाच वेळी अमलात आणल्या. त्यामुळे शंभूराजांची घोर विटंबना बामणांनीच केली. वेदाभ्यास आणि संस्कृत पंडित होण्याचा अधिकार बामणांचाच असतांना शंभूराजे स्वतः अत्यंत हुशार अन् थोर सांस्कृतिक पंडित होते. बहुजन समाजास संस्कृत भाषेचा अधिकार नसतांनाही शंभूराजे संस्कृत पंडित होऊन बामणांचाही पराभव करतात. त्यामुळे शंभूराजे बामणांच्या हाती पडताच बामणांनी त्यांचे डोळे फोडले, कानात तेल ओतले, जीभ कापली, शिरच्छेद केला, शरिराचे तुकडे केले, चामडे काढले आणि त्यांचे शिर उंच बांबूवर लटकवून तुळापूर, वढू आणि आपटी परिसरांत फिरवले.

शंभूराजांवरील कलंक पुसणार्‍या ब्राह्मणांची नोंद कोण आणि केव्हा घेणार ?

भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे

डॉ. (सौ.) कमल गोखले (‘शिवपुत्र संभाजी’ पुस्तकाच्या लेखिका) किंवा भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे (यांनी ‘शंभूराजे’ हे पुस्तक लिहिले) यांच्यासारख्या ब्राह्मण विद्वानांनी शंभूराजांवरील कलंक पुसण्यासाठी मोलाचे कार्य केले. ‘शंभूराजे’ विषयावर सहस्रो व्याख्याने देऊन आणि स्वतःची हानी सहन करूनही पुस्तकाच्या १ लाख प्रती वितरित करण्याचे ध्येय ठेवणारे भारताचार्य पू. (प्रा.) शेवडे यांच्यासारखे कार्यकर्ते विरळाच आहेत.

– वैद्य परीक्षित शेवडे

३. ‘आलमगीर विजय’ ग्रंथातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा संदर्भ ! 

वैद्य परीक्षित शेवडे

रहाता राहिला प्रश्न, छत्रपती शंभूराजे यांच्या अमानुष हत्येचा ! तर औरंगजेबाच्या दरबारातील आणि त्या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या ईश्वरदास या गुजराथी व्यक्तीने लिहिलेल्या ‘आलमगीर विजय’ या ग्रंथातील संदर्भ पाहू. मूळ फारसी भाषेतील या ग्रंथाचे मराठी भाषांतर कै. सेतू माधव पगडी यांनी केले आहे.

बहादूरखान आणि इखलास खान यांनी सैन्य सिद्ध करून युद्धास प्रारंभ केला. त्यांनी चहूकडून संभाजींना घेरले. उभय पक्षांत भीषण लढाई झाली. छत्रपती संभाजींच्या समवेत असलेले ४०० सैनिक मारले गेले, तर मोगलांचे जवळपास २५० सैनिक मृत्यूमुखी पडले. हे पाहून मराठे मागे हटले. संभाजींनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला; पण तो यशस्वी झाला नाही आणि ते मोगलांच्या हाती सापडले. कवी कलश हेसुद्धा त्यांच्यासमवेत बंदिस्त झाले.

छत्रपती संभाजींना पकडल्याचे वृत्त बादशहाला शाहजादा आजमच्या पत्रावरून समजले. खंडूजी हरकारा यांनी सविस्तर माहिती दिली. हे वृत्त घोषित होताच लष्करात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. अमीर-उमरावांनी बादशहाला नजराणा (भेटवस्तू) देऊन त्याचे अभिनंदन केले. इखलास खान आणि बहादूर खान यांना बढती, बहुमानाचे पोशाख, जडजवाहीर आणि हत्ती-घोडे देण्यात आले.

संभाजी, कवी कलश आणि त्यांचे साथीदार यांची उंटावरून धिंड काढत त्यांना छावणीत आणण्यात आले. त्यांची विविध प्रकारे फजिती करण्यात आली. बादशहाने त्यांना न्यायालयासमोर उभे केले. संभाजींनी बादशहाला ताजीम दिली नाही (अभिवादन केले नाही). दोन दिवसांनी चौकशीच्या वेळी त्यांनी बादशहाविषयी अपमानास्पद शब्द उच्चारल्याची नोंद आहे. त्यानंतर बादशहाच्या आज्ञेने संभाजींच्या डोळ्यांत सळई फिरवून त्यांना आंधळे करण्यात आले.

छत्रपती संभाजींनी त्यानंतर अन्नत्याग केला. शेवटी बादशहाच्या आज्ञेने त्यांना वधस्तंभावर नेण्यात आले. तेथे त्यांचे शरिराचे तुकडे करण्यात आले. त्यांचे शिर विविध ठिकाणी फिरवून शेवटी दिल्लीला नेऊन शहराच्या प्रवेशद्वारावर लटकवण्यात आले.

(साभार : ‘मोगल-मराठा संघर्ष’ या पुस्तकातून, पान ३०-३१)

४. जातीपातींवरून द्वेष पसरवून हिंदु धर्माला खिळखिळे करणार्‍यांना यश मिळणार नाही ! 

शंभूहत्येचे पाप ब्राह्मणांच्या माथी मारतांना उभ्या केलेल्या विकृत चित्राचा चित्रकारही घोषित करावा. जातीपातींवरून द्वेष पसरवून हिंदु धर्माला खिळखिळे करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना यश मिळणार नाही.

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पती, डोंबिवली.