सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांचा गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे यंदा १९ मार्च २०२६ या दिवशी ६३ वा वाढदिवस आहे. यानिमित्त कुडाळ सेवाकेंद्रातील साधकाला त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे, तसेच सनातनच्या सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री मधुरा भोसले यांना सूक्ष्मातून जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
सद्गुरु सत्यवान कदम यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. कुडाळ सेवाकेंद्रातील लहान-मोठी सर्व सूत्रे स्वतः लक्ष देऊन साधकांकडून पूर्ण करून घेणे
‘सद्गुरु सत्यवान कदम कुडाळ सेवाकेंद्रातील लहान-मोठी सर्व सूत्रे स्वतः लक्ष देऊन पूर्ण करून घेतात. सेवाकेंद्राच्या परिसरात नारळाची काही झाडे आहेत. त्यांना नियमित नारळ येतात. कधी कधी तर त्यांचे प्रमाण पुष्कळ असते. नारळ अधिक आले असल्यास सद्गुरु सत्यवानदादा ते नारळ अन्य आश्रमांत पाठवतात. त्या वेळी ‘संबंधित आश्रम किंवा सेवाकेंद्र यांच्याकडून मागणी घेऊन त्यानुसार नारळ पाठवण्याचा ते स्वतः आढावा घेतात, तसेच ते ‘कुणाला किती नारळ पाठवले ?’, याच्या नोंदीही ठेवायला सांगतात.
२. साधकांमध्ये सेवेचे गांभीर्य निर्माण होण्यासाठी ती सेवा स्वतः करणे
कुडाळ सेवाकेंद्रात प्रत्येक आठवड्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साधकांसाठी सत्संग असतो. आरंभी काही सत्संगांपूर्वी सद्गुरु सत्यवानदादा स्वतः सगळी पूर्वसिद्धता होईपर्यंत बारकाईने लक्ष देत. काही वेळा ते स्वतःच पूर्वसिद्धता करण्यास आरंभ करत. त्यानंतर त्यांनी जिल्हा सत्संगातच त्याचे नियोजन करून घेतले. नंतर हळूहळू साधकांमध्येही सत्संगाच्या पूर्वसिद्धतेची जाणीव निर्माण होऊ लागली.
३. साधकांची साधना आणि सेवा गुरुदेवांना अपेक्षित अशी होण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करणे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साधकांची साधना आणि सेवा यांची घडी बसण्यासाठी सद्गुरु दादा अथक अन् अविरत प्रयत्न करत आहेत. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अध्यात्मप्रसाराची सेवा, दैनिक ‘सनातन प्रभात’विषयीची सेवा, तसेच अन्य सेवा यांची घडी बसण्यासाठी जिल्ह्यात अनेक वेळा दौरे केले आहेत. अनेकदा त्यांनी सांगितलेले प्रयत्न साधकांकडून झाले नाहीत किंवा अल्प झाले, तरीही सद्गरु दादांनी प्रयत्न करणे सोडले नाही किंवा साधकांना याविषयी कधीही दोष दिला नाही. जोपर्यंत साधकांकडून गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) अपेक्षित असे प्रयत्न होत नाहीत, तोपर्यंत ते स्वतः त्याविषयी प्रयत्न करत रहातात. ‘साधकांकडून प्रयत्न होत नाहीत किंवा प्रयत्न अल्प होत आहेत’, असे लक्षात आल्यावर ते हताश होत नाहीत. जिल्ह्याची घडी बसवण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्नरत असतात.
४. सद्गुरु सत्यवानदादांची साधकांवरील प्रीती !
अ. सद्गुरु दादांनी सांगितलेले प्रयत्न एखाद्या साधकाने केले नाहीत किंवा त्याने ‘दिलेली सेवा करायला जमणार नाही’, असे सांगितले, तरी सद्गुरु दादांची त्या साधकावरील प्रीती अल्प होत नाही.
आ. साधकांचे प्रयत्न अल्प झाले, तर ‘प्रयत्न अल्प का झाले ?’, या कारणांचा अभ्यास करून सद्गुरु दादा वेळोवेळी साधकांच्या अडचणी सोडवण्यावर भर देतात. यासाठी सद्गुरु दादा ‘साधकांना तज्ञ साधकांचे साहाय्य आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, आवश्यक असेल, तेथे स्वतः मार्गदर्शन करणे, सेवेसाठी सहसाधकांचे साहाय्य मिळवून देणे, त्यासाठी सर्वांमध्ये संघभाव निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणे’ इत्यादी उपाय करतात.
इ. सद्गुरु दादांनी सर्व साधकांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण केले आहे. सद्गुरु दादांमधील प्रेमभावामुळे साधक त्यांच्या सर्व अडचणी सद्गुरु दादांना मनमोकळेपणाने सांगतात.
ई. अनेक साधकांना सद्गुरु दादा घरातील एक सदस्यच वाटतात.
५. ‘सेवाकेंद्रातील वाहन हे गुरूंचेच वाहन आहे’, असा भाव असणे आणि त्याचा वापर आवश्यकतेनुसारच करणे
सद्गुरु दादांचे सेवाकेंद्रातील वाहनाच्या स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष असते. त्या दृष्टीने ते आवश्यक त्या सूचना संबंधित साधकांना देतात. प्रवासाला निघण्यापूर्वी आणि वाहनात बसल्यावर ते प्रथम जयघोष करून अन् श्लोक म्हणून प्रार्थना करतात. ‘स्वतःत आणि सहसाधकांत वाहनाविषयी भाव निर्माण व्हावा’, यासाठी त्यांचा हा प्रयत्न असतो. ‘हे गुरूंचेच वाहन असून गुरूंनीच आपल्याला हे वाहन सेवेसाठी दिले आहे’, असा त्यांचा वाहनाविषयी भाव असतो. सद्गुरु दादा अनावश्यक आणि वैयक्तिक कारणासाठी कधीही वाहन वापरत नाहीत. त्यांच्या दृष्टीने सेवेसाठी रत्नागिरीला जाण्यासाठी चारचाकी वाहनाचा वापर, म्हणजे अनावश्यक व्यय आहे. त्यामुळे ते रत्नागिरीला आगगाडीने जातात.
६. दैनिक ‘सनातन प्रभात’ हे गुरुदेवांचे संदेशपत्र समजून त्याचे वाचन करणे आणि त्यातील सूत्रांचे पालन करणे
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या कालावधीत सद्गुरु दादांना दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचण्यास मिळाले नाही. महोत्सव संपल्यानंतर कुडाळ सेवाकेंद्रात परत आल्यावर त्यांनी तेव्हाचे दैनिक ‘सनातन प्रभात’चे सर्व अंक वाचले. सद्गुरु दादा दैनिक वाचण्यासाठी नियमितपणे पुरेसा वेळ देतात. दैनिकामध्ये ‘ऋतूमानानुसार आपल्या आहारातील पालट आणि पथ्य’, यांविषयी लिखाण प्रसिद्ध होते. सद्गुरु सत्यवानदादा त्या सूत्रांचे तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करतात. यावरून ‘ते दैनिक ‘सनातन प्रभात’ हे गुरुदेवांचे संदेशपत्र समजून त्याचे वाचन करतात आणि त्यातील सूत्रांचे पालन करण्याचा प्रयत्न करतात’, हे मला शिकायला मिळाले.
७. एखाद्या प्रसंगामध्ये साधक पुष्कळ रागावला असल्यास तो २ मिनिटे सद्गुरु दादांशी बोलल्यावर त्वरित शांत होतो.
८. कितीही मोठा प्रसंग असला, तरी सद्गुरु दादा त्यावर असा तोडगा काढतात की, त्या प्रसंगाशी निगडित प्रत्येक साधक अंतर्मुख होऊन विचार करू लागतो.
‘हे गुरुराया, ‘आपणच मला सद्गुरु सत्यवानदादांकडून शिकण्याची संधी दिली आणि माझ्याकडून हे सर्व लिखाण करून घेतले’, याबद्दल मी आपल्या अन् सद्गुरु सत्यवानदादांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– एक साधक, कुडाळ सेवाकेंद्र, सिंधुदुर्ग. (५.७.२०२५)
| • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !