Karnataka Police : पोलिसांनी लाच घेऊन गायींची अवैध वाहतूक करणारा ट्रक सोडून दिला !

सामाजिक माध्यमावर संतापाची लाट !

बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यात गोतस्करीविरुद्ध कठोर कायदा लागू आहे, तरीही ‘रक्षक असणारे पोलीसच भक्षक बनले आहेत’, असा संशय गोतस्करीविषयी प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमुळे निर्माण झाला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस पैसे घेऊन गायींची अवैध वाहतूक करणारा ट्रक सोडून देतांना दिसत आहेत. सामाजिक माध्यमांवर याविषयी संतापाची लाट पसरली आहे. (पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे प्रशिक्षण देतांना नीतीमत्ता शिकवली नाही. त्याचा हा परिणाम आहे ! – संपादक)

या व्हिडिओत दिसत आहे की, गायींची अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रक पोलीस तपासणीसाठी थांबवला. तपासणी करून कारवाई करण्याऐवजी पोलीस ट्रकमधील गोतस्करांकडून पैसे घेऊन ट्रकला पुढे जाऊ दिले. लोकांचे लक्ष चुकवून पोलीस लाच घेत असल्याचे दृश्य भ्रमणभाषमध्ये टिपले गेले. ‘केवळ लाच द्या, मग काहीही वाहून नेऊ शकता’ अशी पोलिसांची वागणूक झाल्याची प्रतिक्रिया सामाजिक माध्यमांवर व्यक्त करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी तातडीने हस्तक्षेप करून भ्रष्ट पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

सरकारने अशा पोलिसांना तात्काळ बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे !