वास्तूशास्त्रविषयक लेखमाला : लेखांक १६
२८ फेब्रुवारीच्या लेखामध्ये आपण प्रवेशाचे विविध प्रकार पाहिले. त्यानुसार आपण आपल्या वास्तूचा प्रवेश निश्चित करणे आवश्यक असते. या लेखामध्ये आपण द्वारवेधाविषयी जाणून घेणार आहोत.
वेध म्हणजे अडथळा. द्वारवेध म्हणजे द्वारासमोरील अडथळा. आपल्या प्रवेशद्वाराच्या समोर जर काही गोष्टी आल्या, उदाहरणार्थ झाड, खांब, खड्डा इत्यादी, तर त्याला ‘द्वारवेध’ असे म्हणतात. या द्वारवेधाचे विविध प्रकार वास्तूशास्त्रामध्ये सांगितले आहेत. त्याच प्रकारे त्यांचे परिणामही वेगवेगळे आहेत. त्याचा आपण आता अभ्यास करूया.
लेखांक १५ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/1013087.html

१. ‘मत्स्यपुराणा’नुसार वेधाचे प्रकार आणि त्याचे परिणाम
‘मत्स्यपुराणा’नुसार वेधाचे पुढील प्रकार आणि त्याचे परिणाम सांगितले आहेत.
तथा वास्तुषु सर्वत्र वेधं द्वारस्य वर्जयेत् ।
द्वारे तु रथ्यया विद्धे भवेत् सर्वकुलक्षय: ।।
तरुणा द्वेष बाहुल्यं शोक: पङ्केन जायते ।
अपस्मारो भवेन्नूनं कूपवेधेन सर्वदा ।।
व्यथा प्रस्रवणेन स्यात् कीलेनाग्निभयं भवेत् ।
विनाशो देवताविद्धे स्तम्भेन स्वीकृतो भवेत् ।।
गृहभर्तुविनाश: स्याद् गृहेण च गृहे कृते ।
अमेध्यावस्करैर्विद्धे गृहिणी बन्धकी भवेत् ।।
तथा शस्त्रभयं विन्द्यादन्त्यजस्य गृहेण तु ।
उच्छ्रायाद् द्विगुणां भूमिं त्यक्त्वा वेधो न जायते ।। – मत्स्यपुराण, अध्याय २५५, श्लोक १० ते १४
अर्थ : सर्व प्रकारच्या वास्तूमध्ये द्वार वेध वर्ज्य करावा. दारासमोर गल्ली, बोळ, रस्ता यांमुळे वेध होत असल्यास कुलक्षय होतो. वृक्षामुळे वेध होत असल्यास द्वेष वाढतो. चिखलामुळे वेध झाल्यास शोक प्राप्त होतो. विहिरीचा वेध झाल्यास घराच्या स्वामीला अपस्मार (फेफरे) नावाचा रोग होतो. कील, खिळा किंवा खुंटी यांमुळे वेध झाल्यास अग्नीभय संभवते. देवतांचा वेध झाल्यास म्हणजेच दारासमोर मंदिर आल्यास विनाश संभवतो. अपवित्र द्रव्यांमुळे वेध झाल्यास स्त्री वंध्या होते. अंत्यजाच्या घराचा वेध झाल्यास शस्त्रभय संभवते.

२. ‘विश्वकर्मप्रकाश’ या ग्रंथानुसार द्वारवेध आणि त्याचे परिणाम
प्रधान यन्महाद्वारं बाह्यभित्तिषु संस्थितम् ।
रथ्याविद्धं न कर्तव्यं नृपेण भूमिमिच्छता ।। – विश्वकर्मप्रकाश, अध्याय ७, श्लोक ७२
अर्थ : प्रधान (मुख्य) द्वार जे बाहेरील भिंतीवर स्थापित असते, ते राजमार्गाने वेधित नसावे. भूमीची इच्छा करणार्या राजाने मुख्य दरवाज्याला रथ्यापासून (मार्गाने होणार्या वेधापासून) वाचावयास हवे.
सरलेन च मार्गेण प्रवेशो यत्र वेश्मनि ।
मार्गवेधं विजानीयान्नाशोकफलप्रदम् ।। – विश्वकर्मप्रकाश, अध्याय ७, श्लोक ७३
अर्थ : एखाद्या घरात सरळ मार्गाने प्रवेश केला जातो (सार्वजनिक रस्ता समोरून आपल्या मुख्य द्वारापर्यंत येत असल्यास), तेव्हा मार्गवेध होतो. हा वेध शोककारी होतो.
तरुवेधं विजानीयाद्यदि द्वारमुखे स्थितम् ।
कुमारमरणं ज्ञेयं नानारोगश्च जायते ।। – विश्वकर्मप्रकाश, अध्याय ७, श्लोक ७४
अर्थ : दरवाजाच्या समोरच वृक्ष असल्यास त्याला ‘तरुवेध’ असे म्हणतात. त्यामुळे कुमारवयाची मुले दगावण्याची शक्यता असते, तसेच घर रोगग्रस्त होते. घरातील लोकांना अपस्मार (फेफरे) हा रोग जडतो.
जलस्रावस्तथा द्वारे मूलेऽनर्थंच यो भवेत् ।
द्वाराग्रे देवसदनं बालानामार्तिदायकम् ।। – विश्वकर्मप्रकाश, अध्याय ७, श्लोक ७६
अर्थ : घराच्या दरवाजासमोरून पाणी वहात असेल, तर त्यामुळे अनर्थकारी घटना घडतात. दरवाजासमोर देवालय असल्यास लहान मुलांना आजारपण येते.
श्मशानाभिमुखे गेहे राक्षसाद् भयमादिशेत् । – विश्वकर्मप्रकाश, अध्याय ७, श्लोक ८१ (अर्थ : घराचे मुख्यद्वार हे स्मशानाभिमुख असल्यास राक्षसांचे भय असते.)
घराच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरापेक्षा अधिक अंतरावर असलेल्या वेधामुळे त्या वेधाचा दोष संभवत नाही.– श्री. श्रेयस पिसोळकर |

याप्रमाणे सर्वच वास्तूग्रंथांमध्ये द्वारवेध अवश्य टाळावा, याविषयी उल्लेख आलेला आहे. एकंदर मुख्य प्रवेशद्वारासमोर खांब, खड्डा, चिखल, खुंटी, मोठा पाषाण, वृक्ष, समोरून येणारा मुख्य रस्ता, मंदिर, विहीर इत्यादी गोष्टी नसाव्यात. त्याने द्वाराला वेध निर्माण होऊन त्याचे अशुभ परिणाम वास्तूमालकाला भोगावे लागतात. यासह एका द्वारासमोरच दुसरे द्वार नसावे, म्हणजेच घराची द्वारे ही एका रांगेत नसावीत. त्याला ‘भिन्नदेही वास्तू’ म्हणतात.
त्याचप्रमाणे सेफ्टी डोअर करतांना मुख्य द्वारापेक्षा मोठे किंवा अरुंद करू नये अथवा मुख्य प्रवेशद्वारापेक्षा त्याला अधिक सजवू नये. तसे झाले, तर ते संकटकारक ठरते. यामध्ये वेधाचे परिणाम वास्तूशास्त्राच्या ग्रंथांनुसार वेगळे असले, तरी सर्व शास्त्रकारकांचे द्वारवेध असणे, हे दोषकारक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे वास्तू बांधतांना वरील प्रकारचे वास्तूवेध अवश्य टाळावेत.
(संदर्भ ग्रंथ : ‘विश्वकर्मप्रकाश’, ‘मत्स्यपुराण’, ‘समराङ्गणसूत्रधार’)
– श्री. श्रेयस पिसोळकर (वास्तूविशारद, ज्योतिष होराभूषण, होरारत्न), फोंडा, गोवा. (४.३.२०२६)
लेखांक १७ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/1018168.html
क्रिकेटचा उदो उदो नको !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?
स्त्रीत्वाचा उत्सव !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘सत्संग’ आणि कला !