जागतिक पातळीवर चालू असलेल्या युद्धाचा व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर परिणाम

गॅसचा तुटवडा 

  • युद्धामुळे संपूर्ण राज्याच्या औद्योगिक आणि व्यावसायिक चक्रावर मोठा परिणाम !

  • पुण्यात गॅस दाहिन्या बंद, छत्रपती संभाजीनगरमधील उद्योग ठप्प !

(‘एल्.एन्.जी.’ म्हणजे द्रवीकृत नैसर्गिक वायू)

मुंबई – इराण आणि इस्रायल-अमेरिका यांमध्ये भडकलेल्या युद्धाच्या ठिणगीने आता महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला अन् जनजीवनाला होरपळून काढण्यास चालू केले आहे. जागतिक स्तरावर ‘एल्.एन्.जी.’ गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने राज्यातील उद्योगधंदे, हॉटेल व्यवसाय आणि अगदी देवस्थानांमधील अन्नछत्रेही संकटात सापडली आहेत. मुंबईतील २० टक्के हॉटेल्सना टाळे लागले असून पुण्यातील शवदाहगृहे गॅसअभावी बंद पडली आहेत. पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली येथे व्यावसायिक गॅसपुरवठा ठप्प झाला असून काही ठिकाणी ५० टक्केहून अधिक हॉटेल्स बंद होण्याची भीती आहे. पुणे जिल्ह्यातील चाकण आणि शिक्रापूर येथील गॅस प्लांटमधून पुरवठा थांबल्याने हॉटेल आणि मिठाई व्यवसाय यांवर मोठा परिणाम झाला आहे. व्यावसायिक सिलिंडर न मिळाल्याने हॉटेलचालकांसमोर मोठा आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

युद्धाच्या या भीषण सावटामुळे संपूर्ण राज्याचे औद्योगिक आणि व्यावसायिक चक्रच जणू ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. इराण आणि इस्रायल-अमेरिका युद्धाच्या वाढत्या प्रभावामुळे निर्माण झालेली गॅसटंचाई पहाता महाराष्ट्रात पुन्हा एकदा ‘कोविड-१९’ महामारीसारखी भीषण परिस्थिती निर्माण होते कि काय, अशी भीती निर्माण झाली आहे. कोविड काळात जसे परप्रांतीय कामगार गावी परतले होते, तसेच आता हॉटेल आणि आस्थापने बंद पडल्यामुळे कामगारांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर चालू होण्याची शक्यता आहे. ज्याप्रमाणे दळणवळणबंदीमध्ये मालाची ने-आण बंद झाली होती, तशीच स्थिती आता इंधन टंचाईमुळे निर्माण होत आहे. मालवाहतूक महागल्याने महागाई प्रचंड वाढू शकते. ४०० ते ५०० मोठ्या आस्थापनांचे उत्पादन थांबल्याने औद्योगिक मंदीचे ढग गडद झाले आहेत, जे थेट राज्याच्या सकल देशांतर्गत उत्पन्नावर परिणाम करतील.

पुरवठ्याअभावी छत्रपती संभाजीनगरमधील उद्योग ठप्प !

कतारने द्रवीकृत नैसर्गिक वायू अर्थात् ‘एल्.एन्.जी.’चे उत्पादन थांबवल्याने, भारताला होणारा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘एल्.एन्.जी.’च्या तुटवड्याचा अनेक उद्योगांना फटका बसला असून ‘एल्.एन्.जी’च्या अभावी ५ मोठ्या उद्योगांचे उत्पादन ठप्प झाले आहे. औद्योगिक वसाहतीमधील आणखी उद्योग ठप्प होण्याची शक्यता आहे. वाहन उद्योग, औषध निर्माण करणारी आस्थापने यांना ‘एल्.एन्.जी’ तुटवड्याचा मोठा फटका बसत आहे. औद्योगिक वसाहतीला प्रतिदिन २५० ते ३०० मेट्रिक टन ‘एल्.एन्.जी.’ची आवश्यकता आहे; मात्र युद्धामुळे तो विस्कळीत झाला आहे. शेंद्रा, वाळूज, चिखलठाण्यातही गॅस तुटवड्याचा फटका बसत आहे. याशिवाय ‘एल्.एन्.जी.’च्या तुटवड्यामुळे स्टील आस्थापनात युनिट बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

सोलापूरमध्ये भरारी पथकाची कारवाई !

सोलापूर जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी सांगितले की, जिल्ह्यात एकूण ९४ ‘गॅस एजन्सी’ सुरळीत कार्यरत आहेत. घरगुती गॅसपुरवठा सामान्य आहे; परंतु व्यावसायिक मागणी थांबवण्यात आली आहे. पेट्रोल-डिझेलचा साठाही पुरेसा असून पुरवठा सुरळीत आहे. गॅस, पेट्रोल आणि डिझेल यांच्या साठ्याची पहाणी करण्यासाठी ४ ‘भरारी पथके’ सिद्ध करण्यात आली आहेत.

नागपूरमध्ये विशेष पथकाची पडताळणी !

नागपूरमध्ये एल्.पी.जी. सिलेंडर टंचाईच्या तक्रारी येत असल्याने जिल्हा प्रशासनाने विशेष पथक नेमले आहे. या पथकात जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्न आणि नागरी पुरवठा अधिकारी अन् ‘गॅस एजन्सी’चे प्रतिनिधी सामील आहेत. शहरातील हॉटेल्सना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.

रत्नागिरी शहरात गॅससाठी अनेक ठिकाणी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा ! 

रत्नागिरी शहरात गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. रत्नागिरी शहरातील प्रमुख गॅस वितरक असलेल्या गॅस एजन्सीसह अनेक ठिकाणी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळत आहेत. गॅस सिलेंडर मिळेल या आशेने नागरिक पहाटेपासूनच स्वत:च्या रिकाम्या टाक्या घेऊन रांगेत उभे रहात आहेत. गॅस सिलिंडरच्या नोंदणीनंतर १५ ते २० दिवस उलटूनही सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारी ग्राहक करत आहेत. काही ठिकाणी गॅसअभावी पुन्हा एकदा पारंपरिक चुली पेटवण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

पंढरपूरच्या ‘श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरा’तील अन्नछत्राला फटका !

पंढरपूर येथील ‘श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती’च्या अन्नछत्राला गॅसटंचाईच्या झळा बसल्या आहेत. प्रतिदिन अनुमाने १० सहस्र भाविकांना महाप्रसाद वाटप केला जातो, ज्यासाठी प्रतिदिन ६ गॅस सिलेंडर वापरले जातात. सध्या केवळ दोन-तीन दिवस पुरेल इतकाच गॅसचा साठा शिल्लक राहिल्याने मंदिर समितीसमोर अन्नछत्र चालवण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. इंधन टंचाईमुळे देवस्थानांनाही फटका बसत आहे.

घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा पालट !

घरगुती गॅसच्या दुसर्‍या सिलिंडरसाठी १५ दिवसांचा कालावधी पालटून २५ दिवसांचा करण्यात आला आहे, तसेच केंद्र सरकारने गॅस वितरक आस्थापनांना व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडर महिनाभरातून एकच देण्याविषयी सूचना दिल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

युद्धाचा साखर उद्योगाला फटका ! 

युद्धाचा भडका आता देशातील साखर उद्योगापर्यंत पोचला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि सागरी वाहतुकीतील अडथळ्यांमुळे भारताची साखर निर्यात जवळपास ठप्प झाली आहे. याचा मोठा परिणाम देशांतर्गत बाजारावर होणार असून १५ लाख टन साखरेचा अतिरिक्त साठा शिल्लक रहाण्याची भीती निर्माण झाली आहे.