‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’मध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग !

  • २४ वर्षांची मोहीम यंदाही १०० टक्के यशस्वी !

  • रंगपंचमी आणि आंतरराष्ट्रीय महिला दिन यांचे औचित्य !

‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’त सहभागी महिला आणि युवती

पुणे, ८ मार्च (वार्ता.) – रंगपंचमी आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनाची जाणीव ठेवत मोठ्या संख्येने महिलांनी ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’मध्ये सक्रीय सहभाग नोंदवला. हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने राबवण्यात येणार्‍या या मोहिमेत यंदा रंगपंचमी आणि महिलादिन या दोन्ही निमित्तांनी रविवारी सुट्टीचा दिवस असूनही महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जलाशय रक्षणाचे कार्य केले. रंगपंचमीच्या निमित्ताने जलाशयात रंग, कचरा किंवा इतर प्रदूषक पदार्थ टाकले जाऊ नयेत, यासाठी त्यांनी नागरिकांचे प्रबोधन केले. गेल्या २४ वर्षांपासून सातत्याने राबवण्यात येणारे ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ यंदाही १०० टक्के यशस्वी झाले.

या मोहिमेत शासन आणि प्रशासन यांचे सहकार्य लाभले असून पोलीस, स्थानिक प्रशासन, तसेच विविध विभागांनी आवश्यक ते साहाय्य केले. त्याचसमवेत पर्यावरणाविषयी जागरूक असलेल्या नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून या अभियानाला बळ दिले. महिलादिनाच्या निमित्ताने महिलांनी पर्यावरण रक्षणासाठीही पुढाकार घेतल्याचे या उपक्रमातून स्पष्ट झाले.

सकाळी ८ वाजता भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन आणि भावपूर्ण आरती करून या मोहिमेचा आरंभ झाला. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, सासवड, हडपसर, भोर आणि आळंदेवाडी यांसारख्या विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते या मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी झाले होते. या अभियानात अधिवक्ता, संगणक अभियंता, उद्योजक, पत्रकार यांनी सक्रीय सहभाग घेतला.

या अभियानाच्या वेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले. ‘पाण्याची नासाडी आणि प्रदूषण रोखण्यासाठी समितीचे कार्यकर्ते ज्या जिद्दीने जलाशयाभोवती उभे रहातात, ते कौतुकास्पद आहे. महाराष्ट्रातील नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी अशी अभियाने आता लोकचळवळ बनणे आवश्यक आहे’, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

मोहिमेच्या शेवटी हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी सर्व सहभागी नागरिक आणि सहकार्य करणार्‍या यंत्रणा यांचे समितीच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले.

विशेष 

वारजे माळवाडी परिसरातील शिवणे येथील ‘श्री स्वामी सान्निध्य सोसायटी’तील बालसंस्कारवर्गातील मुले या मोहिमेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाली, तसेच त्यांचे पालकही या जलाशय रक्षण मोहिमेत काही वेळ सहभागी झाले.