Madhyapradesh Raisen Fort : ‘अल्लाहू-अकबर, आम्ही इराणला साथ देण्यासाठी जात आहोत’, असे सांगत रायसेन (मध्यप्रदेश) गडावरून मुसलमानांनी डागली तोफ !

४ मुसलमान तरुणांना अटक

(अल्लाहू अकबर म्हणजे अल्ला महान आहे)

रायसेन (मध्यप्रदेश) – येथील रायसेन गडावर काही मुसलमान तरुणांनी तोफ डागल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर वेगाने प्रसारित होत आहे. यात हे तरुण गडाच्या टेकडीवर उभे राहून ‘अल्लाहू अकबर’ आणि ‘आम्ही इराणला साथ देण्यासाठी जात आहोत’ अशा घोषणा देतांना दिसत आहेत. तसेच एक मुसलमान काडेपेटीद्वारे तोफेला आग लावतांना दिसतो, त्यानंतर मोठ्या आवाजासह तोफ डागली जाते आणि परिसर धुराने भरून जातो. या प्रकरणात रायसेन कोतवाली पोलिसांनी ४ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे. त्यामध्ये रायसेनचा शादाब कुरेशी, भोपाळचा युसुफ शेख, वसीम महंमद आणि पप्पू उपाख्य सलमान कुरेशी यांचा समावेश आहे.

रायसेनमधील पटेल नगर येथील रहिवासी बृजेश चावरिया यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून कारवाई केली. यात तक्रारीत म्हटले आहे की, व्हिडिओमध्ये  आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्या असून त्यामुळे हिंदु समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात आणि शहरातील वातावरण बिघडू शकते.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचाही आक्षेप

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांनी या घटनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले की, पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या गडावरून निवासी भागाच्या दिशेने तोफ डागणे धोकादायक आहे आणि त्यामुळे लोकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.

या प्रकरणात पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासन यांनी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

संपादकीय भूमिका  

दुसर्‍या देशासाठी स्वतःच्या देशात अशा प्रकारचे कृत्य करणार्‍यांना कठोर शिक्षा करून देशातून हाकलून लावण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !