Israel Iran War : इराणवरील आक्रमणाची योजना अवघ्या २ दिवसांपूर्वी ठरली होती ! – इस्रायल

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलमधून परत जाईपर्यंत स्वतः इस्रायललाही आक्रमणाची कल्पना नसल्याचा खुलासा !

इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अझार (डावीकडे), नरेंद्र मोदी व बेंजामिन नेतान्याहू (उजवीकडे वर्तुळात)

जेरूसेलम (इस्रायल) – इराणवर आक्रमण करण्याची योजना आक्रमणाच्या अवघ्या २ दिवस आधीच ठरली, असा खुलासा इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अझार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौर्‍यानंतर काही वेळातच इस्रायलने इराणवर भीषण आक्रमण केल्यामुळे अनेकांकडून तर्क-वितर्क लावण्यात येत होते. आता अझार यांनी केलेल्या खुलाशानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

अझार पुढे म्हणाले, ‘‘इराणवरील आक्रमण पूर्वनियोजित नव्हते. पंतप्रधान मोदी इस्रायलमधून परतल्यानंतर कारवाई करण्याच्या मिळालेल्या संधीचा परिणाम आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौर्‍याच्या वेळी या संभाव्य आक्रमणाची माहिती स्वतः इस्रायललाही नव्हती. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि नरेंद्र मोदी यांच्या प्रादेशिक विकासावर चर्चा झाली; मात्र जी गोष्ट आम्हालाच ठाऊक नव्हती, ती आम्ही सार्वजनिक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. इराणवरील आक्रमणाला २८ फेब्रुवारीला सकाळी सुरक्षा मंडळाची संमत्ती मिळाली.’’

अनेक दशकांपासून सिद्धता आणि गुप्तचर यंत्रणांचे यश !

अझार पुढे म्हणाले, ‘‘इराणच्या धमक्यांमुळे इस्रायलने गेल्या अनेक दशकांपासून स्वतःचे सैनिकी सामर्थ्य आणि गुप्तचर क्षमता वाढवण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. इराणी राजवटीचे कामकाज, त्याची सैनिकी यंत्रणा, इराणचे निर्णय घेणार्‍यांची माहिती आणि त्यांची ठिकाणे अचूकपणे जाणून घेणे, ही प्राथमिक उद्दिष्टे होती. यासाठी, तसेच इराणची हवाई संरक्षण प्रणाली भेदण्यासाठी आम्ही नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित केले. यामुळेच हे आक्रमण यशस्वी होऊ शकले.’’