साधनेचे प्रयत्न तळमळीने करणार्‍या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. विजयलक्ष्मी दंडमुडी (वय ६९ वर्षे) !

‘वर्ष २०२५ च्या जून मासात माझी आई (सौ. विजयलक्ष्मी दंडमुडी) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आली होती. आईची मला लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये, तिने केलेले साधनेचे प्रयत्न आणि तिच्यात झालेले पालट पुढे दिले आहेत.

सौ. विजयलक्ष्मी दंडमुडी

गुणवैशिष्ट्ये

१. समाधानी वृत्ती

‘माझ्या आईने यजमानांकडे (बाबांकडे) कपडे किंवा अलंकार घेणे, यांसाठी कधीही आग्रह केला नाही. तिला ‘काही गोष्टी विकत घेऊया’, असे विचारल्यावर ती म्हणते, ‘‘यजमानांच्या माध्यमातून भगवंतच मला सर्वकाही देतो. देवाने मला काहीच न्यून पडू दिले नाही.’’ ती तिच्याकडे जे आहे, त्यातच समाधान मानते.

२. समंजस

आई कधीही गार्‍हाणे करत नाही. तिने बाबा किंवा नातेवाईक यांच्या संदर्भात पूर्वी घडलेल्या प्रसंगांची कधीही चर्चा केली नाही. ती प्रसंगांत अडकत नाही.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी आईच्या संदर्भात काढलेले उद्गार !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

जून २०२५ मध्ये सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी आईला नामजपादी उपाय सांगितले होते. तेव्हा ते म्हणाले होते, ‘‘आईने ६ मास भावाच्या स्तरावर साधनेचे प्रयत्न केले, तर तिची जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून लवकर सुटका होऊ शकते.’’

(‘सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या या उद्गाराची प्रचीती लगेचच आली. ९.२.२०२६ या दिवशी आईने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले.’ – संकलक)

– दंतवैद्या (सौ.) संगीता श्रीकांत चौधरी

३. ऐकण्याची वृत्ती

आईला कुणी काही सांगितल्यावर ती लगेच स्वीकारते आणि त्यांनी सांगितल्यानुसार प्रयत्न चालू करते. अलीकडे तिची स्मरणशक्ती न्यून झाली आहे. ती उत्तरदायी साधकांनी सांगितलेली सर्व सूत्रे लिहून घेते आणि कोणतेही सूत्र सोडून देत नाही, उदा. स्वयंसूचना, नामजपादी उपाय, सत्संगात सांगितलेले साधनेविषयीचे दृष्टीकोन. ‘प्रत्येक सूत्र म्हणजे गुरूंचे वाक्य आहे’, असे तिला वाटते. आई तिला सांगितल्याप्रमाणे धन्वन्तरि देवतेला प्रार्थना करून औषध घेते. आईला पाठदुखीच्या त्रासासाठी सांगितलेले व्यायाम ती नियमितपणे करते.

४. प्रेमभाव

बाबा त्यांच्या मित्रांना ऐन वेळी घरी जेवायला बोलावतात. तेव्हा आई सर्वांचे प्रेमाने आदरातिथ्य करते. ती प्रतिदिन कुटुंबियांना विचारून स्वयंपाक करते. ती पुष्कळ प्रेमळ आहे.

५. सेवेची तळमळ

आई पूर्वी एकटी कुठे बाहेर जात नसे. ती मितभाषी आहे, तरीही तिने समष्टी सेवा केली. ती प्रवचन करणे, ग्रंथप्रदर्शन कक्षावर सेवा करणे, घरोघरी जाऊन प्रसार करणे, साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे इत्यादी सेवा करत असे.

साधनेमुळे झालेले पालट

डॉ. (सौ.) संगीता चौधरी

अ. साधकांशी जवळीक साधणे

पूर्वी आई रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर कुणाशी बोलत नसे. आता ती सर्व साधकांशी बोलते आणि त्यांची विचारपूस करते. पूर्वी ती आश्रमातील खोलीत बसूनच भाषांतराची सेवा करत असे. आता तिचे व्यष्टी साधना आणि सेवा यांचे नियोजन केल्यावर ते तिने लगेच स्वीकारले. ती व्यष्टी साधनेचा आढावा सत्संग आणि भावसत्संग यांमध्ये सहभागी झाली. तिने स्वयंपाकघरात सेवा करण्याचा प्रयत्न केला.


आ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवून भावस्थितीत रहाण्याचा प्रयत्न करणे


आई हिंदी भाषेत होणार्‍या व्यष्टी साधनेच्या आढाव्याला जाऊ लागली. तिला भाषा समजण्यास अडचण येत होती. त्यामुळे तिने मला विचारले, ‘‘मी आढाव्याला जाण्याऐवजी सेवा करू का ?’ तेव्हा मी तिला सांगितले, ‘‘तू सेवा घरीही करू शकते; मात्र तुझी व्यष्टी साधनेची घडी बसण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकणे तुझ्यासाठी महत्त्वाचे आहे. तुला आढावा सत्संगात काही कळले नाही, तर तू विचारून आणि शिकून घे.’’ त्यानुसार आईने प्रयत्न केले. तिने तळमळीने प्रार्थना करणे, भावाच्या स्तरावर कृती करणे, स्वयंसूचना घेणे आणि नियमित व्यष्टी साधनेचा आढावा देणे, असे प्रयत्न चालू केले. ती हे प्रयत्न करत असतांना तिच्यातही कृतज्ञताभाव वृद्धींगत झाला आणि ती भावस्थितीत रहाण्याचा प्रयत्न करू लागली.


इ. भावपूर्ण नामजप केल्यामुळे आनंद मिळणे


पूर्वी आई नामजप करत असतांना तिच्या मनात पुष्कळ विचार येत असत. तिला नामजपातून आनंद मिळत नव्हता. आता आई नामजप करतांना भाव ठेवते. त्यामुळे तिच्या मनात अनावश्यक विचार येण्याचे प्रमाण उणावले आहे आणि तिला आनंद मिळत आहे.


ई. तिच्या चेहर्‍यावरील त्वचा चमकत आहे आणि चेहरा गुलाबी झाला आहे.


उ. अनावश्यक न बोलता केवळ साधनेविषयी बोलणे


मी आणि आई केवळ साधनेविषयी बोलत असतो. आम्हाला अन्य विषयाच्या संबंधात बोलायला आवडत नाही. आई मला म्हणते, ‘‘घरी असतांना मी कुटुंबीय आणि नातेवाईक यांच्याशी बोलत असते. आता मला तुझा सत्संग मिळत आहे; म्हणून मला अन्य काही बोलावेसे वाटत नाही.’’ आई मायेतील आणि व्यवहारातील गोष्टीविषयी चर्चा न करता नामजप करण्यात मग्न असते.


ऊ. ऐकण्याच्या वृत्तीत वाढ होणे


आई आश्रमात असतांना सर्वांसाठी केलेला अल्पाहार घेते. एकदा एका साधकाने आम्हाला ‘पथ्याचा अल्पाहार चांगला झाला आहे’, असे सांगितले. तेव्हा आईला पथ्याचा अल्पाहार खाण्याची इच्छा झाली. तेव्हा मी आईला सांगितले, ‘‘पथ्याच्या अल्पाहारासाठी आधीच नोंद करावी लागते. आता तू पथ्याचा अल्पाहार घेतलास, तर तुझी साधना होणार नाही.’’ तेव्हा आईने माझे म्हणणे ऐकले आणि पथ्याचा अल्पाहार घेतला नाही.


ए. व्यष्टी साधनेचे प्रयत्न प्राधान्याने केल्यामुळे समष्टी सेवेची फलनिष्पत्ती वाढणे


आई कन्नड लिखाणाचे तेलुगु भाषेत भाषांतर करण्याची सेवा करते. पूर्वी आईला वाटायचे, ‘सनातनचे तेलुगु भाषेतील ग्रंथ समाजापर्यंत लवकर पोचले पाहिजेत.’ त्यामुळे ती सेवाच करत रहायची. तिचे व्यष्टी साधनेकडे दुर्लक्ष होत असे आणि तिच्यात कर्तेपणा जाणवत असे. आता आई नामजप करणे, स्वयंसूचना देणे, नामजपादी उपाय करणे आणि भावजागृतीचे प्रयत्न करणे, असे प्राधान्याने करते. ‘त्यामुळे तिची बौद्धिक क्षमता नसूनही तिने केलेल्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांमुळे तिची भाषांतराची सेवा चांगली होत असून तिच्या सेवेची फलनिष्पत्ती वाढली आहे’, असे मला वाटते.


– दंतवैद्या (सौ.) संगीता श्रीकांत चौधरी

६. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणे 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आईला आधीपासून तीव्र शारीरिक आणि मानसिक त्रास आहेत. आईची गुरुदेवांवर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर) दृढ श्रद्धा आहे. तिने गुरुदेवांवरील श्रद्धेच्या बळावर अनेक शारीरिक आणि मानसिक त्रास सहन केले आहेत. तिने कुणाकडे कसलेही गार्‍हाणे न करता साधना चालू ठेवली आहे.

७. साधकांना आईमध्ये जाणवलेले पालट

या वेळी आई आश्रमात आल्यावर काही साधक मला म्हणाले, ‘‘आईमध्ये पूर्वीपेक्षा पुष्कळ पालट झाले आहेत. त्या आनंदी दिसतात आणि त्यांचा चेहरा चांगला दिसत आहे.’’

८. लेख लिहितांना आलेली अनुभूती

हा लेख लिहितांना माझी अधून मधून भावजागृती होत होती. मला उत्साह वाटत होता. मला आतून शांत जाणवत होते.

‘आईच्या संदर्भातील हा लेख लिहून घेतल्याबद्दल मी श्री गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

– दंतवैद्या (सौ.) संगीता श्रीकांत चौधरी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४५ वर्षे) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.२.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक