बहुआयामी स्वातंत्र्यवीर सावरकर !

आज ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आत्मार्पणदिन (स्मृतीदिन) (दिनांकानुसार)’ आहे. त्या निमित्ताने…

महापुरुष हे काळाच्या उदरात शिरून भविष्याचा वेध घेऊन त्याद्वारे ते वर्तमानासाठी दिशादर्शन करत असतात. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यासंदर्भात एक द्रष्टा महापुरुष आहेत. सावरकर यांनी जरी त्यांच्या जीवनात अनेक भूमिका निभावल्या, त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू असले, तरी त्या सर्वांचे प्राणतत्त्व, आपल्या राष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक भारतमाता हे आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेल्या बहुआयामी कार्याचे पैलू आपण जाणून घेऊया.

१. सशस्त्र क्रांती आणि सैनिकीकरणाचे पुरस्कर्ते

‘राष्ट्राच्या निर्जीव, निःसत्व जीवनप्रवाह पालटून त्याचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी क्रांतीसारखा दुसरा पर्याय नाही’, असे सावरकर यांचे त्यांच्या आयुष्याच्या प्रारंभीच्या काळात ठाम मत होते. राजकीय क्रांतीसाठी मात्र सशस्त्र उठाव करून राज्यसकट उलथवून टाकणे, हा मार्ग त्यांना युवावस्थेत फलदायी वाटत होता.

श्री. श्रीकांत ताम्हनकर

‘आमची क्रांती पूर्णत: यशस्वी झाली असती, तर देशाचे तुकडे पडले नसते’, असे ते म्हणत. ‘जुलूमाविरोधात राजकीय क्रांतीचीच आवश्यकता असते; मात्र तिच्यातून अराजक निर्माण होता कामा नये’, असे ते सांगत. ‘महाराष्ट्रातील तरुणांनी सहस्रोंच्या संख्येने सैन्यात शिरावे, अधिकाराच्या जागा मिळवाव्यात आणि ती पात्रता येण्यासाठी सतत ज्ञानोपासना अन् बलोपासना करावी, महाराष्ट्राचे (आणि सर्व हिंदु समाजाचे) सैनिकीकरण व्हावे, महाराष्ट्र हा भारताचा खड्गहस्त व्हावा’, असा त्यांचा संदेश होता.

दुसर्‍या महायुद्धात तशी संधी मिळाली, तेव्हा ‘तिन्ही (सैन्य) दलात शिरा’, असे सांगून ते पुढे म्हणाले होते, ‘ Today we help them (इंग्रजांना), Tomorrow we help ourselves (आज आपण त्यांना साहाय्य करू, म्हणजेच उद्या आपण स्वतःला साहाय्य केल्यासारखे आहे.)

२. महार पलटण

‘प्राणांची तमा न बाळगता उपाशीपोटी पराक्रम केवळ मराठमोळा मावळाच करू जाणे’, असे ते सांगत. मराठ्यांच्या रोमहर्षक इतिहासात याचे दाखले जागोजागी सापडतील. म्हणूनच सैन्यातील महार पलटण काढण्याचा निर्णय ब्रिटीश राज्यकर्त्यांनी घेतला, तेव्हा हाच दृष्टीकोन समोर ठेवून सावरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबरीने आवाज उठवला आणि तो निर्णय शेवटी मागे घ्यायला लावला.

३. हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्रवाद

आज ‘हिंदुत्व’ हा शब्द परवलीचा झाला आहे. सावरकर यांनी या शब्दाची शास्त्रशुद्ध व्याख्या १०० वर्षांपूर्वीच केली आहे. त्या हिंदुत्वावर आधारीत हिंदु राष्ट्रवादाची त्यांनी मांडणी केली आणि त्याचा आग्रह धरला. इतकेच नव्हे, तर ‘हिंदु महासभे’च्या अध्यक्षपदावरून त्याच्या कार्यवाहीची आवश्यकता सांगितली. सावरकर यांच्या म्हणण्याप्रमाणे ‘हिंदु’ हा शब्द ‘धर्मवाचक’ नसून ‘राष्ट्रवाचक’ आहे. या देशाला आपली ‘पितृभू’ आणि ‘पुण्यभू’ मानणारे सर्व लोक हिंदूच आहेत. ‘हिंदूंचा हा देश असल्याने त्यास ‘हिंदु राष्ट्र’ असे संबोधावे’, असा त्यांचा आग्रह होता. सावरकर यांना अभिप्रेत असलेली हिंदु राष्ट्रवादाची विचारसरणी ज्या दिवशी या देशाची शासनसंस्था पूर्णत्वाने स्वीकारील, त्या दिवशी या देशाला समर्थ, संपन्न आणि स्वतंत्र वैभवशाली स्वरूप प्राप्त होईल.

४. भाषा आणि लिपी शुद्धी

रत्नागिरीत असतांना सावरकर यांनी मराठी भाषा आणि लिपी यांच्या शुद्धीकरणाकडे पुष्कळ लक्ष दिले. भारतावर सैनिकी आणि भाषेची आक्रमणे करणार्‍या परकीय आक्रमकांनी (प्रामुख्याने अरबी अन् इंग्रजी) आपापल्या भाषाही आमच्यावर लादल्या, शिक्षणात आणि व्यवहारात आणल्या. कित्येक यावनी आणि इंग्रजी शब्द, म्हणी अन् वाक्प्रचार भारतीय भाषांमध्ये घुसवले. इतके की, ते आम्हाला स्वतःचेच वाटू लागले. ‘परकियांच्या गुलामगिरीचे जोखड झुगारून देणार्‍या स्वाभिमानी राष्ट्राने भाषेचीही गुलामगिरी नष्ट केली पाहिजे’, असे तात्याराव म्हणत. ‘यावनी भाषेचा वरचष्मा, म्हणजे आपल्या दुर्बलतेचा अवशेष आपल्या राष्ट्रीय जीवनात अनंत काळ रहाता कामा नये. संस्कृतसारख्या अतीप्राचीन, वैभवशाली आणि समृद्ध भाषेचा विलोभनीय वारसा आज आपल्याजवळ असतांना आधुनिक ज्ञान-विज्ञानाच्या परिभाषेसाठी आपल्याला परक्यांच्या भाषेकडे पहाण्याचे कारणच काय’, असे त्यांचे म्हणणे होते.

५. राष्ट्रीय व्यवहाराची जीवनसरिता

‘भाषा ही राष्ट्रीय व्यवहाराची जीवनसरिता असते. ती शुद्ध केलेल्या (पूर्वीप्रमाणे असलेल्या) गंगेप्रमाणे पवित्र आणि निर्मळ राहिली पाहिजे. तिच्यात परभाषांच्या सांडपाण्याचे प्रवाह मिसळू देता कामा नयेत. विशुद्ध राष्ट्रवादाला ते मारक ठरू देऊ नये’, असे सावरकर यांचे भाषेविषयीचे गहन विचार होते. देवनागरी लिपीचा पुरस्कारही त्यांनी केवळ परंपरेच्या अभिमानाने केला नव्हता, तर ‘देवनागरी लिपी जगातील इतर लिपींपेक्षा अधिक शास्त्रशुद्ध आहे’, असा त्यांचा दावा होता. आधुनिक लोकव्यवहाराला ती रोमन (इंग्रजी) लिपीइतकी सोयीस्कर व्हावी आणि तिचे मुद्रण अन् टंकलेखन द्रुतगतीने करता यावे म्हणून त्यांनी काही अक्षरे अल्प केली, तसेच कित्येक अक्षरांच्या रचनाही पालटल्या. आता वापरात असलेल्या संगणकावर त्या पुष्कळ सोयीस्कर आहेत, असे माझे मत आहे; पण त्यादृष्टीने कुणी अभ्यास केल्याचे ऐकिवात नाही.

६. परिस्थितीने राजकारणी

सावरकर बालवयापासूनच वृत्तीने कवी होते. त्यांचे काही गद्यमय लिखाणही पद्यमय वाटावे, असेच आहे.

हे मातृभूमि, तुजला मन वाहियेले ।
वक्तृत्व वाकविभव ही तुज अर्पियले ॥

तू तेचि अर्पिली नवी कविता रसाला ।
लेखांप्रति विषय तू चि अनन्य झाला ॥

सावरकर म्हणतात, ‘मी वृत्तीने कवी आणि कलावंत आहे; पण परिस्थितीने मला राजकारणी पुरुष बनवले.’ ‘स्वदेशीचा फटका, चापेकर, रानड्यांवरचा फटका’ अशा त्यांच्या बालवयातील कवितांमधूनही त्यांची प्रगल्भता आणि कृतीपरता ‘महाकवी’ सावरकर यांच्या ठिकाणी होती. त्यांची खंडकाव्ये आणि स्फूट कविताही सामूहिक मनाचा आविष्कार करणारी राष्ट्रीय कविता आहे.

७. जगप्रसिद्ध उडी

शत्रूच्या (ब्रिटिशांच्या) हातावर तुरी देण्याकरता शरीर शृंखलाबद्ध असतांनाही बोटीच्या ‘पोर्टहोल’ची काच फोडून तात्यारावांनी त्यातून समुद्रात उडी मारली. वरून होणारा गोळ्यांचा मारा चुकवत, काचेने अंग सोलले गेले असतांना खार्‍या पाण्याच्या समुद्रात पोहत जात मार्सेलिस (फ्रान्स)चा किनारा गाठला.

८. जन्मठेपेतील हालअपेष्टा

सक्तमजुरीसह ५० वर्षांच्या २ जन्मठेपेची शिक्षा मिळाल्यावर सावरकर यांना अंदमानच्या कारागृहात नेण्यात आले. तेथून त्यांना रत्नागिरी येथे स्थानबद्धतेत आणल्यानंतरही ३ वर्षे हालअपेष्टांना तोंड द्यावे लागले. याचे वर्णन त्यांच्या ‘माझी जन्मठेप’ आणि ‘अंदमानच्या अंधेरीतून’ या ग्रंथांमधून घडते. वाचकांनी हे ग्रंथ वाचावेत.

९. सामाजिक क्रांती आणि लोकशिक्षण

रत्नागिरीत स्थानबद्धतेच्या काळात आपल्याला सावरकर यांच्या सामाजिक क्रांतीचे दर्शन घडते. अस्पृश्यता निवारणाची मोहीम त्यांनी रत्नागिरीच्या स्थानबद्धतेच्या काळात चालवली होती. ‘तुम्ही आम्ही सकल हिंदु बंधू बंधू’, हे त्यांच्या चळवळीचे घोषवाक्य होते. ‘विज्ञानाचा प्रकाश वापरून अज्ञानाच्या अंधकाराला छेद द्यायला हवा. त्याखेरीज मानवानेच निर्माण केलेल्या भेदांच्या भिंती भुईसपाट होणार नाहीत’, असे त्यांचे सांगणे असे. समाजात समतेचे वारे सर्वत्र संचारून त्याचे सामर्थ्य वाढावे, यासाठी सामाजिक क्रांती हवी. वाङ्मयाच्या द्वारे लोकशिक्षण आणि सुधारणेचा प्रत्यक्ष आचारही तिची साधने होत, जे त्यांनी रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत असतांना प्रत्यक्ष कृतीत आणले.

१०. भारताचा गौरवशाली इतिहास

‘६ सोनेरी पाने’ या ग्रंथलेखनाद्वारे भारताचा गौरवशाली इतिहास लोकांचे समोर ठेवण्यामागचा उद्देश स्पष्ट करता करता सावरकर यांनी इतिहास लेखन केले. ‘राष्ट्रीय एकता अन् भारतीय अस्मिता समोर ठेवून इतिहासाचे लेखन आणि संशोधन व्हायला हवे’, असा त्यांचा अत्याग्रह असे. ‘इतिहासाची जी सोनेरी पाने आिण रुपेरी क्षण विद्यार्थ्यांची राष्ट्रीय अस्मिता जागृत ठेवतील, तसेच ज्याकरता प्राणही वेचावे, असे राष्ट्राचे चित्र त्यांच्या डोळ्यांपुढे उभे करतील, तेवढेच त्यांच्या वाचनाकरता विषय निवडावेत’, असे त्यांचे म्हणणे होते.

११. जोसेफ मॅझिनीचे आत्मचरित्र

सावरकर यांनी इटलीच्या जोसेफ मॅझिनीचे आत्मचरित्र मराठीत लिहिले. (त्या आत्मचरित्रास सावरकर यांनी लिहिलेली प्रस्तावना इतकी प्रभावी होती की ,त्या काळात कित्येकांनी ती मुखोद्गत केली होती.) ‘वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्यसमरचा इतिहास’ हा संशोधनपूर्वक संकलित करून त्यांनी मराठीत लिहिला आणि मग इंग्लंडमध्ये त्याचे इंग्रजीत भाषांतर करून घेऊन ते छापले. याचे कारणे ते असे देत ‘तो संग्राम आमच्या राष्ट्रीय अस्मितेचा अद्भुत अविष्कार होता. आमची मने अपमानाच्या सूडाने धगधगत होती, हे सार्‍या जगाला कळावे, म्हणजे भारत हे मृतवत् राष्ट्र आहे अन् ब्रिटीश लोकच त्यांचे कल्याण करतील, हा त्यांचा भ्रम दूर होईल.’

अशा या स्वातंत्र्यविरास त्यांच्या आत्मार्पणदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन !

– श्री. श्रीकांत ताम्हनकर, पुणे. (३.२.२०२६)