‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त संगणकाशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा !

‘अनुमाने फेब्रुवारी २०२५ मध्ये आम्हाला ‘मे मासात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ होणार आहे’, याविषयी समजले. संगणकाच्या संबंधी सेवेची व्याप्ती अफाट होती आणि ती आम्हा साधकांच्या अल्पमतीला लक्षात येणे कठीण होते. तेव्हा ‘गुरूंनी सेवेची संधी दिली आहे, तर ते करून घेणारच आहेत’, अशी श्रद्धा आमच्या मनात निर्माण होत होती.

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या कार्यक्रम स्थळाची प्रतिकृती

१. संगणक सेवेसंबंधीच्या सेवेचे स्वरूप आणि व्याप्ती  

आमच्याकडे ‘संगणकीय सेवा करणार्‍या साधकांना इंटरनेट (माहितीजाल) देणे, मैदानात ‘वाय्फाय्’ची (तारांविना ‘इंटरनेट कनेक्शन’ देणारी तंत्रज्ञान प्रणाली) जोडणी करणे, आवश्यक ते संगणकीय साहित्य उपलब्ध करून देणे, साहित्याची जोडणी करणे, कार्यक्रमस्थळी ‘सर्व्हर’साठी (अन्य संगणकांना विशिष्ट सेवा देणारा संगणक) खोली सिद्ध करणे, डेटा स्टोअर करणे (संगणकात माहिती सुरक्षित ठवणे), क्लोज्ड सर्किट दूरचित्र प्रणाली (सी.सी.टी.व्ही.), घडणारी गोष्ट त्या क्षणी संगणकीय प्रणालीद्वारे दाखवणे (‘लाईव्ह स्ट्रीम’ करणे) इत्यादी सेवा होत्या. त्याचप्रमाणे चित्रीकरण केल्यावर सिद्ध होणारी अमूल्य माहिती (डेटा) संरक्षित करणे, मैदानात ‘इंटरनेट’ची सोय करणे, विविध संगणकीय सेवांसाठी मोठ्या प्रमाणात भ्रमणसंगणक (‘लॅपटॉप’) उपलब्ध करून देणे इत्यादी सुविधा आम्हाला द्यायच्या होत्या.

श्री. रेषक गावकर, श्री. नीलेश चितळे आणि श्री. महेश चव्हाण

२. संगणक सेवेसंबंधी आलेल्या अडचणी आणि गुरुकृपेने केलेली उपाययोजना

२ अ. ‘सेवेची व्याप्ती पुष्कळ असल्याने आणि साधकसंख्या अल्प असल्याने काही सेवा ‘आउटसोर्स’ (बाहेरच्या आस्थापनांकडून काम करून घेणे) कराव्या’, असे ठरवणे : सेवेचे स्वरूप जसजसे स्पष्ट होत गेले, तससशी ‘सेवेची व्याप्ती किती मोठ्या प्रमाणात आहे आणि सर्व सेवा एकाच वेळी चालू रहाणे आवश्यक आहे’, हे आमच्या लक्षात आले. आरंभी या सेवेसाठी आम्ही केवळ ५ साधकच उपलब्ध होतो, तरीही आमच्या कुणाच्याच मनात ‘ही सेवा आपल्याला जमणार नाही’, असा विचार नव्हता. आपल्याकडे मनुष्यबळ नाही, तर काही सेवा ‘आउटसोर्स’ (बाहेरच्या आस्थापनांकडून काम करून घेणे) कराव्या’, असे आम्ही ठरवले.

२ आ. ‘गुरुसेवा सुरळीत होऊन गुरुधनाचा काटकसरीने वापर व्हावा’, या तळमळीने साधक सेवारत असणे : ‘चित्रीकरणाचा अमूल्य ‘डेटा’ त्या त्या वेळी संरक्षित करणे, पूर्ण मैदानात ‘इंटरनेट’ मिळण्यासाठी काय करू शकतो ?’, याचा अभ्यास करणे, ‘संगणकीय सेट अप’च्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात भ्रमणसंगणक लागतील, सामाजिक माध्यमांच्या दृष्टीने सिद्ध करून लगेच प्रसारासाठी ‘व्हिडिओ’(चलत्‌चित्र) प्रसारित करण्यासाठी कशा प्रकारे सेटअप लागेल, ते कुठून मिळू शकतात ?’, हे शोधणे आणि त्यांच्याशी समन्वय करून आपल्याला अपेक्षित असे सर्व मिळते का ?’, ते पहाणे’, अशा सेवा होत्या. हे सर्व करतांना ‘गुरुसेवा सुरळीत व्हायला हवी आणि गुरुधनाचा काटकसरीने वापर व्हावा’, या तळमळीने सर्व साधक सेवारत होते.

२ इ. ‘व्हेंडर’ (ठेकेदार) आणि आवश्यक ‘सर्व्हर’ मिळण्यात अनेक अडचणी येणे आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर दुसर्‍याच दिवसापासून अडचणी न्यून होणे : काही सेवांसाठी आपल्याला अपेक्षित असा ‘व्हेंडर’ (व्यक्ती किंवा आस्थापन जी एखादी वस्तू किंवा सेवा इतरांना विकते किंवा पुरवते) मिळत नव्हता, तसेच ‘डेटा’ ठेवण्यासाठी आवश्यक ‘सर्व्हर’ मिळण्यात अनेक अडचणी येत होत्या. या अडचणी दूर होण्यासाठी आम्ही सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारले. आम्ही ते नामजपादी उपाय करू लागल्यावर दुसर्‍याच दिवशी अडचणी न्यून झाल्या. जे ‘व्हेंडर’ अनेक दिवसांपासून प्रतिसाद देत नव्हते, त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळायला लागला. तेव्हा ‘बुद्धीचा वापर करण्यासह देवाचे सतत साहाय्य घेणे, सेवेसाठी आध्यात्मिक स्तरावर प्रयत्न करणे’, कसे आवश्यक आहे ?’, हे देवाने आम्हाला शिकवले आणि देवानेच आमची नामजपादी उपाय करून सेवा करण्याविषयीची सतर्कता वाढवली.

कु. श्रद्धा लोंढे

२ ई. श्री गुरूंच्या कृपेने आवश्यक साहित्याची अल्प दरात ने-आण होऊ शकणे : श्री गुरूंच्या कृपेने आपल्याला आवश्यक सर्व साहित्य भाड्याने अपेक्षित दिवशी उपलब्ध झाले आणि ते सेवेतील आवश्यक साधकांना देता आले. काही साहित्य मुंबई येथून मिळणार होते. ‘आरंभी हे साहित्य केवळ मुंबई येथेच वापरता येईल’, असे आम्हाला समजले. नंतर आम्ही ते साहित्य उपलब्ध करून देणार्‍या व्यक्तींना विनंती केल्यावर त्यांनी साहित्य गोवा येथे घेऊन जाण्यासाठी अनुमती दिली. त्यानंतर ते सर्व साहित्य सुरक्षितरित्या आणण्यासाठी आणि महोत्सव संपला की, वेळेत परत करता येईल, या दृष्टीने वाहन चालवणार्‍या साधकांचे नियोजन करता आले. देवाच्या कृपेने चांगले पर्याय मिळाले आणि अल्प दरात साहित्य ने-आण करणे शक्य झाले.

२ उ. भाड्याने मिळालेल्या ‘सर्व्हर’ला अडचण आल्यावर अन्य एक ‘सर्व्हर’ उपलब्ध होणे : ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तील सेवेचा ‘डेटा’ ठेवण्यासाठी जो ‘सर्व्हर’ भाड्याने मिळाला होता, त्याला प्रत्यक्ष कार्यक्रम कालावधीत अनेक अडचणी आल्याने तो वापरता येत नव्हता. तेव्हा देवाच्या कृपेने अन्य एक ‘सर्व्हर’ उपलब्ध झाला.

२ ऊ. भ्रमणसंगणकांची मागणी अधिक असतांना संतांनी सांगितल्यानुसार केल्यानंतर त्यांची आवश्यकता न्यून होणे : भ्रमणसंगणकांची मागणी अधिक होती. याविषयी एका संतांना सांगितल्यावर त्यांनी दिलेल्या दिशेमुळे आम्हाला आमच्या अभ्यासातील त्रुटी लक्षात आल्या आणि मागण्या अल्प होऊन गुरुधनाचा अपव्यय वाचला. त्यामुळे ‘मागणीचा अभ्यास कशा प्रकारे करायचा आणि गुरुधन कशा प्रकारे वाचवू शकतो’, हे आम्हाला शिकायला मिळाले.

२ ए. महोत्सवाच्या कालावधीत एका साधकाला आश्रमात ‘सेटअप’ जोडणीची सेवा असतांना आश्रमात थांबावे लागत असूनही साधक सकारात्मक असणे : महोत्सवाच्या कालावधीत ‘रामनाथी आश्रमातील काही वयस्कर आणि रुग्णाईत साधकांना मैदानातील कार्यक्रम आश्रमात बसून पहाता यावा’, यासाठी ‘सेटअप’ जोडणीची सेवा होती. या सेवेसाठी संगणकाशी संबंधित सेवा करणार्‍या एका साधकाने आश्रमात थांबणे आवश्यक होते. त्या साधकाला त्या दिवशी मैदानात येऊन कार्यक्रम पहायला मिळणार नव्हता; पण याविषयी कुणाच्याच मनात नकारात्मक विचार नव्हता. साधकांची आश्रमात थांबण्याची सिद्धता होती. या सेवेतील चैतन्यामुळेच सर्वांच्या मनाची सकारात्मकता वाढल्याचे जाणवले.

२ ऐ. ‘मैदानात असलेल्या चैतन्यमय वातावरणामुळे साधकांना सेवा करण्यासाठी बळ मिळत आहे’, असे जाणवणे : महोत्सवाच्या कालावधीत येत असलेल्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी साधकांना वेळ द्यावा लागत होता. त्यामुळे त्यांना कार्यक्रम पहायला मिळत नव्हता, तरीही साधक आनंदी होते आणि अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत होते. मैदानात असलेले वातावरण एवढे चैतन्यमय आणि उत्साही होते की, ‘यामुळेच साधकांना सेवा करण्यासाठी बळ िमळत होते’, असे आम्हाला जाणवले.

२ ओ. साधकांची क्षमता नसतांनाही देवाच्या आशीर्वादाने सेवा लवकर पूर्ण होणे : एरव्ही सेवा करतांना कुणाचा काही भाग राहिला किंवा अन्य काही अडचणी आल्यास एकमेकांकडून अपेक्षा होत असत आणि ‘ते का झाले नाही ?’, याचेच विचार अधिक असत, मात्र या वेळी साधकांच्या मनात असा कोणताच विचार येत नव्हता. साधकांच्या मनात ‘सेवा लवकर पूर्ण कशी होईल ?’, हा एकच विचार होता. त्यामुळे आमच्याकडून संघटितपणे सेवा होत होती. ‘आम्हाला देवाचा आशीर्वाद मिळून आमची क्षमता नसतांनाही सेवा पूर्ण होत होत्या’, असे जाणवले.

३. जाणवलेली अन्य सूत्रे

अ. आमच्या सेवेचा अभ्यास एवढा मोठा होता की, आम्ही ३ मास दिवस-रात्र सेवेच्या विचारात राहिलो. परिणामी आमच्या मनातील अनावश्यक विचार न्यून होऊन आमचे सेवेशीच अनुसंधान राहिले.

आ. आम्ही सेवा करत असतांना काही वेळा आमच्यामधील ‘नियोजनाचा अभाव, चिकाटी नसणे, परिपूर्ण अभ्यास न करणे’, अशा स्वभावदोषांमुळे सेवा परिपूर्ण करण्यात आम्ही न्यून पडलो’, त्याबद्दल आम्ही श्री गुरुचरणी क्षमाप्रार्थी आहोत.

इ. आम्ही श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना कार्यक्रमात आलेल्या अडचणीविषयी सांगितले. तेव्हा त्या आम्हाला म्हणाल्या, ‘‘हा आपत्काळातील कार्यक्रम असल्याने आपल्याला अडचणी सोडवतच कार्यक्रम करावा लागणार.’’ या त्यांच्या वाक्यातून आम्हाला आपत्काळाची तीव्रता लक्षात आली, तरीही ‘गुरु आपल्या सर्व प्राणप्रिय साधकांना मोठ्या प्रमाणात चैतन्य आणि आनंद प्रदान करत आहेत’, त्याबद्दल आम्हाला कृतज्ञता वाटली.

‘अल्प साधकसंख्या असूनही गुरूंच्या कृपेने आमच्याकडून सेवा झाली’, त्याबद्दल आम्ही गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’ 

– श्री. रेषक गावकर, श्री. नीलेश चितळे, श्री. महेश चव्हाण आणि कु. श्रद्धा लोंढे (रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे साधक) (२२.७.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक