The Kerala Story 2 :  विजयन् यांनी विरोधी वक्तव्य करण्यापेक्षा न्यायालयात आव्हान द्यावे !

‘द केरल स्टोरी २’ चित्रपटाला केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधाला भाजपचे आव्हान !

पिनाराई विजयन्

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन् यांनी ‘द केरल स्टोरी – २’ या चित्रपटाला ‘विद्वेषी’ असल्याचे संबोधत विरोध केला आहे. याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले की, जर चित्रपटात खरोखरच काही बेकायदा कृत्य असेल, तर विजयन् यांनी त्यावर वक्तव्ये करण्यापेक्षा न्यायालयात जावे. मुख्यमंत्रीपदाचा वापर करून उगाच जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करू नका, अशी चेतावणीही त्यांनी दिली.

चंद्रशेखर यांनी मांडलेली सूत्रे –

१. जेव्हा एखादा चित्रपट भाजपच्या विरोधात येतो, तेव्हा विजयन् त्याचे स्वागत करतात आणि त्याला ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य’ म्हणतात. आम्ही कधीही अशा चित्रपटांचा निषेध केला नाही किंवा त्यावर बंदीची मागणी केली नाही; मग आता जेव्हा त्यांच्या राजकीय विचारधारेच्या विरोधात एखादा चित्रपट बनवला जात असेल, तर त्यांना अचानक समस्या का निर्माण होते ? हा निव्वळ दुटप्पीपणा आहे. निर्मात्यांना चित्रपट बनवण्याचा आणि प्रेक्षकांना तो पहाण्याचा पूर्ण अधिकार आहे.

२. कुणीही तुम्हाला ‘जनतेचा रक्षक’ म्हणून नियुक्त केलेले नाही. कोणत्याही समुदायाचा रक्षणकर्ते असल्यासारखे वागण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. प्रत्येक भारतियाला आणि मल्ल्याळी नागरिकाला राज्यघटनेने समान मूलभूत अधिकार दिले आहेत. जनतेला मूर्ख बनवणे थांबवा आणि उगाच चित्रपटाविषयी द्वेष पसरवण्याचे काम करू नका. निर्मात्यांना चित्रपट बनवण्याचा आणि प्रेक्षकांना तो पहाण्याचा पूर्ण अधिकार असल्याने हा चित्रपट प्रदर्शित होईलच, असेही चंद्रशेखर यांनी स्पष्ट केले.

चित्रपटाचा वाद उच्च न्यायालयात !


केरळ उच्च न्यायालयाने ‘द केरल स्टोरी – २’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या विरोधात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेची नोंद घेत, केंद्रीय माहिती अन् प्रसारण मंत्रालयासह केंद्री चित्रपट परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) आणि चित्रपटाचे निर्माते यांना नोटीस बजावली आहे. जीवशास्त्रज्ञ असलेल्या श्रीदेव नंबुदिरी यांनी त्या संदर्भातील याचिका प्रविष्ट केली आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये (लहान विज्ञापन) केरळची प्रतिमा अत्यंत चुकीच्या पद्धतीने आणि नकारात्मक स्वरूपात मांडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. याचिकाकर्त्याचा मुख्य आक्षेप हा चित्रपटाच्या नावावर आहे.

टीझरमध्ये इतर राज्यांतील कथा असल्या तरी चित्रपटाचे नाव ‘द केरला स्टोरी २’ ठेवल्यामुळे या सर्व घटना केवळ केरळमध्येच घडत असल्याचा समज निर्माण होत आहे. त्यामुळे या चित्रपटावर तातडीने बंदी घालण्याची मागणी श्रीदेव यांनी याचिकेतून केली आहे.

‘द केरल स्टोरी – २’ चित्रपटात नेमके काय ?

या चित्रपटात मुसलमान तरुण हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी विवाह करून त्यांच्यावर अत्याचार करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये केरळ, मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यांमधील ३ हिंदु तरुणींची कथा दाखवण्यात आली आहे.