‘संसारात समाधान आणि परमार्थात अनुसंधान’ साधणार्‍या अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर अतूट श्रद्धा असणार्‍या मुंबई येथील पू. (श्रीमती) दिनप्रभा सामंत (वय ८३ वर्षे) !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर अतूट श्रद्धा असणार्‍या विक्रोळी, मुंबई येथील श्रीमती दिनप्रभा सदाशिव सामंत (वय ८३ वर्षे) ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सनातन संस्थेच्या १३७ व्या संतपदी विराजमान झाल्या’, हे वृत्त कळल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. सनातनचे १०३ वे संत पू. (कै.) सदाशिव सामंत यांच्या त्या पत्नी होत. त्या देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सात्त्विक उत्पादनांशी संबंधित सेवा करत असत. त्यांना २ विवाहित मुली आहेत. आश्रमात मला पू. सामंतआजोबा आणि आजी यांचा ४ वर्षे सहवास लाभला. त्या वेळी मला जाणवलेली पू. आजींची काही गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

पू. (श्रीमती) दिनप्रभा सामंत

१. पू. सामंतआजोबा आणि आजी यांच्या समवेत महाप्रसाद घेतांना पू. आजींनी शांतपणे बोलणे ऐकणे, त्या वेळी ‘त्यांच्यात ‘आज्ञापालन आणि ऐकण्याची वृत्ती’ हे गुण आहेत’, हे लक्षात येणे

मी आश्रमात पू. सामंतआजोबा आणि आजी यांच्या समवेत पुष्कळ वेळा प्रसाद अन् महाप्रसाद घेत असे. तेव्हा पू. आजी एक शब्दही बोलत नसत. ‘त्यांना बोलता येत नाही कि यजमानांविषयीच्या आदरयुक्त भीतीमुळे त्या बोलत नाहीत’, असा मला प्रश्न पडत असे. पू. आजोबा सांगतील, तेवढेच त्या करायच्या, उदा. जेवण वाढून आणणे, ‘काही हवे नको’ ते पहाणे इत्यादी. त्या आमचे बोलणे शांतपणे ऐकत असत. मी त्यांना ‘तुम्ही बोलत का नाही ?’, असे विचारल्यावर त्या म्हणायच्या, ‘‘तुम्हा दोघांच्या बोलण्यातून मला सर्वकाही शिकायला मिळते, तर मी काय बोलणार ?’’ खरेतर त्या एका महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या; पण तरीही काही न बोलता त्या आमचे बोलणे ऐकून सकारात्मक प्रतिसाद देत असत. याचे मला पुष्कळ आश्चर्य वाटत असे.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने पू. सामंतआजींनी जीवनातील सर्व कठीण परिस्थिती स्वीकारून साधनेत सातत्य ठेवणे आणि त्यामुळे त्यांची अध्यात्मात प्रगती होणे

पू. आजींच्या संघर्षमय जीवनात अनेक चढउतार आले. त्या उच्चशिक्षित असून महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. त्यांनी पू. आजोबांच्या मोठ्या कुटुंबात राहून नेहमीच साहाय्य केले. ‘साधना आणि सेवा’ करतांना पू. आजींना पू. आजोबांचा मोठा आधार होता. वर्ष २०१९ मध्ये पू. आजोबा संतपदी विराजमान झाले. त्यानंतर त्यांचे हृदयाचे शस्त्रकर्म झाले आणि वर्ष २०२१ मध्ये त्यांनी देहत्याग केला. अशा स्थितीत सर्वसाधारण वयोवृद्ध महिला निराधार झाल्यामुळे हताश आणि निराश होऊ शकतात, तसेच वयोवृद्ध साधिका जीवनातील असंख्य अडचणींमुळे साधना अन् सेवा थांबवू शकतात; परंतु पू. आजींनी सर्व कठीण परिस्थिती स्वीकारली आणि त्या स्थिर राहिल्या. त्यांनी मुलीकडे राहून साधना आणि सेवा चालूच ठेवली. ‘हे सर्व केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने होत आहे’, असे त्या नेहेमी कृतज्ञताभावाने सांगतात. पू. आजींनी गुरूंवर श्रद्धा ठेवून येईल ती सर्व परिस्थिती स्वीकारली आणि ‘साधना चालू ठेवून आध्यात्मिक प्रगती कशी करावी ?’, याचा आम्हा साधकांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

पू. शिवाजी वटकर

३. पू. सामंतआजींचा संतसन्मान सोहळा झाल्यानंतर

३ अ. पू. आजींशी बोलतांना ‘त्यांच्यामध्ये शिकण्याची वृत्ती असून कर्तेपणाचा अहं नाही’, याची जाणीव होणे : ३.२.२०२६ या दिवशी देवद आश्रमात आजींचा संतसन्मान सोहळा झाल्यानंतर मी त्यांना म्हणालो, ‘‘आता तुम्ही संतपदी विराजमान झाला आहात. आज तुम्ही आम्हाला साधनेविषयी काहीतरी सांगा.’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, संत आणि तुम्ही जे शिकवले, तेच करण्याचा मी प्रयत्न केला.’’ यावरून ‘त्यांच्यामध्ये शिकण्याची वृत्ती पुष्कळ आहे आणि कर्तेपणाचा अहं नाही’, हे मला शिकायला मिळाले.

३ आ. पू. आजींनी सूक्ष्मातून सतत पू. सामंतआजोबांशी बोलणे आणि ‘साधनेत पू. आजोबांचे साहाय्य मिळत आहे’, याची त्यांना अनुभूती येणे : मी पू. आजींना विचारले, ‘‘तुम्हाला पू. सामंतआजोबांची आठवण येते का ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘मी त्यांच्याशी सूक्ष्मातून सतत बोलत असते आणि ते मला साधनेत साहाय्य करत असतात, उदा. मी नामजप करत असतांना मला कंटाळा येतो. तेव्हा ‘काय करावे ?’ हे मला सुचत नाही. त्या वेळी पू. आजोबा ‘मी नेमके काय करायला हवे’, हे मला सूक्ष्मातून सुचवतात. गुरुदेवांचे माझ्यावर सतत लक्ष असल्यामुळे हे सर्व होते. त्यामुळे मी सतत अंतर्मुख होऊन नामजप करू शकते.’’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

४. श्रद्धावान जिवाचा उद्धार करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ! 

‘एखाद्या जिवात आध्यात्मिक प्रगतीसाठी जे गुण आहेत, त्या गुणांना धरून गुरुदेव तशी वातावरण निर्मिती करतात. गुरुदेव त्यातूनच पुढे साधकाची प्रगती करून घेतात आणि त्याला संतपदापर्यंत पोचवतात. हे पू. सामंतआजी यांच्या उदाहरणावरून शिकायला मिळते.’ पू. आजींच्या संदर्भात म्हणावेसे वाटते,

‘जो गुरुदेवांच्या चरणी श्रद्धेने लीन झाला ।
तो जीव सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी उद्धरीला ।।’ 

‘पू. सामंतआजींची अशीच आध्यात्मिक प्रगती होवो’, अशी प्रार्थना करून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’ 

– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत,वय ७९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.२.२०२६)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक