Pakistani Spy Arrest : भारतीय नौदलाविषयी संवेदनशील माहिती पाकला देणार्‍या अलिफ इस्लाम याला अटक

अलिफ इस्लाम

उडुपी (कर्नाटक) – पोलिसांनी भारतीय नौदल हेरगिरी प्रकरणात अलिफ इस्लाम याला नुकतीच अटक केली. भारतीय नौदलाशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवल्याच्या संशयावरून ही अटक करण्यात आली आहे. या हेरगिरी प्रकरणात अटक करण्यात आलेला हा चौथा आरोपी आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार ‘कोचीन शिपयार्ड लिमिटेड’च्या मालपे बंदरातील नौदलाशी संबंधित विभागातून संवेदनशील माहिती परकीय संपर्कांपर्यंत पोचल्याची तक्रार  मिळाली होती. शिपयार्डच्या (नौका उभारण्याच्या ठिकाणाच्या) मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी याविषयी तक्रार केली होती.  शिपयार्ड हा संरक्षणक्षेत्रातील एक मुख्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असून येथे भारतीय नौदलासाठी युद्धनौका बनवल्या जातात. येथील युद्धनौकांविषयी संवेदनशील माहिती सामाजिक माध्यमांद्वारे पाकिस्तानातील संपर्कांपर्यंत पाठवण्यात आली, असे पोलीस अन्वेषणात आढळून आले होते. (अशी हेरगिरी होईपर्यंत शिपयार्डमधील सुरक्षा अधिकारी काय करत होते ? हे सुरक्षायंत्रणेला लज्जास्पद ! – संपादक)

या प्रकरणात यापूर्वी हिरेंद्र, रोहित आणि संत्री यांना अटक करण्यात आली होती. रोहित आणि संत्री हे मालपेच्या शिपयार्डमध्ये खाजगी कंत्राटदार म्हणून काम करत होते. उडुपीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी हरिराम शंकर यांनी सांगितले की, हे अन्वेषण आता राष्ट्रीय पातळीवरील गुप्तचर संस्थांशी समन्वय करून सखोल पद्धतीने पुढे नेण्यात येणार आहे.

संपादकीय भूमिका

अशांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा देण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !