ऋतूची लक्षणे आणि ऋतूनिश्चिती !

प्रतीकात्मक चित्र

कालचक्राप्रमाणे साधारणपणे प्रत्येक २ सहस्र वर्षांनी ऋतू आणि त्यांचे मास यांत पालट होत असतो. महत्त्वाच्या आयुर्वेदाच्या संहिता साधारणपणे न्यून ५ सहस्र वर्षांपूर्वी लिहिल्या गेल्या आहेत. त्यातही गंगेच्या उत्तर तटावर शिशिर आणि दक्षिण तटावर प्रावृट (पावसाळ्याच्या प्रारंभीचा काळ) असे ऋतू सांगितले आहेत.

वैद्य परीक्षित शेवडे

भौगोलिक स्थिती पहाता माझ्या मते ही विभागणी गंगा नसून नर्मदेचा उत्तर आणि दक्षिण तट अशी असायला हवी; कारण प्रत्यक्षातही गुजरात, मध्यप्रदेशपर्यंत शिशिर हा ऋतू (अधिकचा हिवाळा) दिसतो, तर महाराष्ट्र आणि खाली अधिकचा पावसाळा, म्हणजेच प्रावृट दिसतो. याखेरीज वसंत ऋतूही पूर्ण २ मास न दिसता जेमतेम २० – २१ दिवसच दिसतो.  हा सारा ऊहापोह स्वस्थवृत्तासाठी ऋतूनुसार पंचकर्म आणि ऋतूचर्या यांच्या योग्य ज्ञानासाठी आवश्यक आहे. प्रत्येक ऋतूची लक्षणे संहितेत दिली असल्याने त्यांच्याशी पडताळणी करून आपापल्या भागांत ऋतूनिश्चिती वैद्य करू शकतात, ही संहिताकारांची दूरदृष्टी आहे. त्यातही आता ‘ग्लोबल वॉर्मिंग’ आणि प्रदूषण या घटकांनी पडणारा फरक लक्षात घ्यायला हवा. सरधोपटपणे चैत्र, वैशाख म्हणजेच वसंत ऋतूसारखी समीकरणे शिकवून चालणार नाही. मूलभूत सिद्धांतांना धक्का न लावता कालानुरूप अद्यतन करण्याची अनुमती आयुर्वेद देतो; नव्हे, तर तसेच करणे आयुर्वेदाला अपेक्षित आहे.

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.