न्यायालय परिसरात गुंडाराज सहन केला जाणार नाही ! – CJI Surya Kant

देहलीतील न्यायालयात अधिवक्त्याला झालेल्या मारहाणीवर सरन्यायाधिशांचे विधान

सरन्यायाधीश सूर्यकांत

नवी देहली – येथील तीस हजारी न्यायालयाच्या परिसरात एका अधिवक्त्यांवर गुंडांकडून आक्रमण झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. ही घटना थेट न्यायाधिशांसमोर घडल्याचे सांगितले जात असून त्यामुळे न्यायालयाच्या परिसरातील सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. हे प्रकरण सर्वाेच्च न्यायालयात मांडण्यात आल्यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. ‘न्यायालयांमध्ये गुंडाराज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाही.

दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. न्यायालय परिसराची प्रतिष्ठा आणि सुरक्षा यांविषयी कोणतीही तडजोड होणार नाही. संबंधित अधिकार्‍यांना आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश देण्यात येतील’, असे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर अधिवक्त्यांनी न्यायालयाच्या परिसरातील सुरक्षा वाढवण्याची आणि दोषींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. प्रकरणाचे सध्या अन्वेषण चालू आहे.

देहली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांना कळवले आहे का ? – सरन्यायाधिशांचा अधिवक्त्याला प्रश्न

९ फेब्रुवारी २०२६ या दिवशी पीडित वकिलाने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर मांडले. त्यानंतर सरन्यायाधिशांनी विचारले की, या घटनेची माहिती देहली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांना देण्यात आली आहे का ?

सरन्यायाधिशांनी पीडित अधिवक्त्याला औपचारिक लेखी तक्रार देहली उच्च न्यायालयाकडे सादर करण्याचे आणि त्या तक्रारीची प्रत स्वतःकडेही जोडण्याचे निर्देश दिले.

आरोप काय आहेत ?

पीडित अधिवक्त्याने सांगितले की, ते अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश हरजीत सिंह पाल यांच्या न्यायालयात एका आरोपीच्या वतीने उपस्थित होते. याच वेळी तक्रारदार पक्षाचे अधिवक्ता कथितपणे अनेक लोकांसह न्यायालय कक्षात घुसले आणि न्यायाधिशांसमोरच त्यांच्यावर आक्रमण करत मारहाण केली. मारहाण करणार्‍यांनी आतून न्यायालय कक्षाचे दार बंद करून न्यायाधिशांच्या उपस्थितीत हिंसक कृत्य केल्याचा आरोप अधिवक्त्याने केला आहे. या प्रकरणात न्यायालयीन हस्तक्षेप आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

थेट न्यायालयात एका अधिवक्त्याला मारहाण केली जाते, हे देहलीतील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचेच दर्शक आहे. आज अधिवक्त्यांना मारहाण करणारे उद्या न्यायाधिशांनाही मारहाण करू शकतात  !