
१. ‘धर्माचरण न केल्याने पाप लागते’, हे मनुष्याला ठाऊक नसल्यामुळे तो धर्माचरण करण्याकडे दुर्लक्ष करतो !
‘हिंदूंच्या धर्मशास्त्राप्रमाणे प्रत्येकाला कर्मफलसिद्धांत लागू आहे. या सिद्धांताप्रमाणे मनुष्याने काही चांगले कर्म केले असेल, तर त्याला पुण्य लाभते आणि वाईट कर्म केले, तर पाप लागते. हा सिद्धांत मनुष्याच्या मागील आणि पुढील सर्व जन्मांसाठी लागू आहे. ‘मागील जन्मी मनुष्याने काय चांगले-वाईट कर्म केले ?’, याविषयी तो अनभिज्ञ असतो. त्यामुळे या जन्मी मनुष्याला वाईट कर्म करायचे भय वाटत नाही. वाममार्गाने केलेल्या वाईट कर्मामुळे लागलेले या जन्मीचे पाप प्रत्येकाला याच जन्मात भोगावे लागते, असे नाही. ‘मनुष्याच्या संचितातील किती प्रारब्ध या जन्मात भोगायचे आहे ?’, हेही मनुष्याला कळत नाही. त्यामुळे त्याला पापाचे भय वाटत नाही. ‘मुळात धर्मानुसार आचरण न केल्यामुळे पाप लागते’, हे मनुष्याला ठाऊक नसल्याने तो धर्माचरण करण्याकडे दुर्लक्ष करतो. बहुतांश व्यक्ती असेही म्हणतात, ‘‘पुढचा जन्म कुणी पाहिला ? त्यापेक्षा या जन्मात मौज-मजा करून घेऊया.’’ त्या पापाचे परिणाम त्याला या जन्मातच भोगावे लागत नसल्यामुळे तो ‘अधर्माचरण करण्यात वाईट काहीच नाही’, असे समजतो आणि सर्रास अधर्माचरण करत रहातो अन् स्वतःवर पापांचे डोंगर ओढवून घेत असतो.
२. हिंदूंना ‘ईश्वरप्राप्ती’ या ध्येयाचा विसर पडल्याने ते अजाणतेपणे रसातळाला जात आहेत !
भारतीय लोकांवर पाश्चात्त्य विकृतीचा पगडा असल्याने ते स्वतःच्या रहाणीमानाची तुलना अन्य देशांतील रहाणीमानाशी, म्हणजे त्यांचे खाणे-पिणे, वेशभूषा, स्वैराचार करणे इत्यादींशी करतात आणि स्वतःही तसेच वागून अधर्माचरण करतात. प्रत्यक्षात ‘कर्मफलसिद्धांत त्यांनाही लागू आहे’, हे पाश्चात्त्यांना आणि भारतियांनाही कळत नाही. आज विदेशातील जनतेला हिंदु धर्माचे महत्त्व कळल्यामुळे भारताकडे त्यांचा ओढा वाढत आहे; मात्र भारतातील बहुसंख्य हिंदूंना स्वधर्माचे ज्ञान नाही आणि ते जाणून घेण्याची त्यांची इच्छाशक्तीही नाही. त्यामुळे ते रसातळाला जात आहेत. मुळात हिंदु धर्माप्रमाणे मनुष्यजन्माचे ध्येय ‘प्रारब्ध भोगून संपवणे आणि ईश्वरप्राप्ती करून घेणे’, हे आहे; पण दुर्दैवाने आज हिंदूंना ‘ईश्वरप्राप्ती’, या ध्येयाचा विसर पडल्यामुळे ते अजाणतेपणे रसातळाला जात आहेत.
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी समाजमनावर अध्यात्म आणि धर्माचरण यांचे महत्त्व बिंबवण्याचे शिवधनुष्य हाती घेतले आहे !
‘एकीकडे मनुष्य देव-देव करत स्वतःच्या मनाने साधना करत असतो; पण ‘साधना आणि धर्माचरण’, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत’, हे तो विसरतो. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे स्वतः उच्चशिक्षित असूनही त्यांनी समाजमनावर अध्यात्म आणि धर्माचरण यांचे महत्त्व बिंबवण्याचे शिवधनुष्य हाती घेतले आहे. हा प्रवाहाविरुद्ध वहाण्याचा प्रयत्न आहे; पण ईश्वराचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात यश मिळतांना दिसत आहे.
‘समस्त हिंदूंना धर्माचरणाचे महत्त्व पटून ते धर्माचरणी होऊ दे’, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सुचवलेली ही शब्दसुमने त्यांच्या चरणी अर्पित करतो.’
– (पू.) अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे (समष्टी) संत, वय ७५ वर्षे), अमरावती (६.१२.२०२५)
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !