‘वेदना थांबवणे’ या अर्थाने आपल्या मनात सगळ्यात आधी येते ते मानदुखी, पायदुखी, सांधेदुखी, पाठदुखी, अपघाताने वा खेळाने आलेली ‘लिगामेंट टेअर’ (अस्थिबंधन दुखापत) वेदना इत्यादी. त्यामुळे अनेक वेगळे कंगोरे असलेल्या डोकेदुखी, दातदुखी यांच्याविषयी न बघता या लेखात फक्त हाडे, सांधे आणि स्नायू यांच्या दुखण्याविषयी बघूया. आयुर्वेदात ‘वेदनाशमन’ याचा विचार ढोबळपणे २-३ पद्धतींनी केला जातो. वेदना कशामुळे आहे ? किती जुनी आहे ? आणि पचनाचा, तसेच वातदोषाचा विचार प्राधान्याने असतोच.

१. संधीवातावर वैद्यकीय सल्ल्याने चिकित्सा घेणे उपयोगी !
अनेकदा रुग्ण हे विचारायला येतात की, मला संधीवात आहे, तर मसाज आणि शेक करून घ्यायचा आहे. मुळात सांध्याची सगळी दुखणी ही संधीवात नाहीत आणि सांध्यांच्या सगळ्या दुखण्यावर आयुर्वेदात तेल लावून शेकले की, काम झाले, असे नाही. सांध्यांच्या वेदना या अनेकदा शरिरात वाढलेले विषार आणि त्यातून झालेला सांध्यांचा दाह यातून होत असतात. तिथल्या तिथे केवळ तेल शेक घेण्यापेक्षा वैद्यकीय सल्ल्याने पूर्ण चिकित्सा घेणे उपयोगी ठरते. औषधे या सगळ्यात अतिशय महत्त्वपूर्ण भाग ठरतो. होत असलेल्या झीजेला आळा घालणे, सूज न्यून करणे, वेदना थांबवणे यांसह सार्वदेहिक भूक न लागणे वगैरे लक्षणांवर औषधे दिली जातात.
२. वात आणि सांधेदुखी यांच्या विविध आजारांवर उपचार
शरिराच्या अग्नीमांद्यामुळे जडपणा येऊन वाढत गेलेला आमवात, पचन चांगले नसतांना भरपूर सूज असलेले सांधे, चिकनगुनियासारख्या शरिराला झालेल्या संसर्गानंतर दुखत राहिलेल्या संधी आणि स्नायू वेदना, अंगातील उष्णता सतत अधिक असेल अन् त्यात शिळे खाणे, आगीजवळ सतत काम, सतत उभे रहाणे यांतून होणारी छोट्या सांध्यांची दुखणी, पित्त प्रकृती, तसेच सततच्या आम्लपित्तामुळे झालेल्या हाडांची झीज, कामाच्या स्वरूपामुळे/प्रवासामुळे मणक्यांवर ताण येऊन होणारे त्रास अशा विविध प्रकारे सांधे आणि स्नायू दुखतात अन् त्या सगळ्यांवर एकच उपाय नाही, उलट बरेच वेगवेगळे आहेत.

३. संधीवाताविषयी विविध उपचार
सगळ्या प्रकारच्या संधीवातामध्ये केवळ तेल लावून उपयोग होत नाही. पुढील काही विचार या सगळ्या आजारात केले जातात.
अ. स्नेहन : सरसकट सगळ्यांना तेल लावले जात नाही. सूज किंवा जडपणा या ठिकाणी काही विशिष्ट औषधी सिद्ध तेल ठराविक काळासाठी ठराविक पद्धतीत लावायला दिले जाऊ शकते, जे सर्वस्वी त्या रुग्णाच्या रोगाच्या अवस्थेवर अवलंबून असते. काही रुग्णांना मात्र प्रतिदिन तेल लावणे अत्यावश्यक असते.
आ. स्वेदन : सांधे दुखणे यासाठी शेक पुष्कळ उपयोगी ठरतो. औषधी काढ्याची वाफ, वाळूचा शेक, औषधी चूर्ण वापरून शेक, औषधी काढ्यात शिजवलेल्या भाताचा शेक, औषधी पानांचा शेक, गरम लेप घालून शेक असे विविध शेक दिले जातात. सगळ्या सांधेदुखी वेदनांना शेकून बरे वाटत नाही. टोचल्याप्रमाणे वेदना आणि आग पुष्कळ अधिक असेल, तर काही द्रव्यांच्या धारा अन् लेप उपयोगी ठरतात. प्रत्येक वेळी शेक देण्याआधी सांध्यांना तेल जिरवून लावले जातेच, असे नाही.
इ. धारा : यात विशिष्ट तेल/काढा याची धार धरली जाते. याने तात्काळ वेदनाशमन होते, तेल कुठले वापरतात, ते मात्र महत्त्वाचे. या व्यतिरिक्त खेळतांना मुडपलेला पाय वा खड्डा आल्याने मुरगळला गेलेला घोटा, क्रिकेटमध्ये झेल (कॅच) घेतांना दुखावलेले बोट या सगळ्यांवर धारा तात्काळ वेदनाशमन म्हणून काम करते.
ई. लेप : विविध औषधी वनस्पतींचा लेप वेदना थांबवण्याचे काम करतात. खेळाडूंना होणार्या ‘लिगामेंट’ दुखापती, ‘कार्टिलेज डॅमेज’ (कूर्च्यासंबंधी दुखापत), ‘कार्पेल टनेल सिंड्रोम’ (मनगटाविषयीची समस्या) या सगळ्यात धारा आणि लेप यांचा लाभ झालेला दिसतो. यावरून पट्टबंधही (पट्टी/कापड) बांधले जाते, ज्याचा लाभ दिसतो.
उ. औषधी चिकित्सा आणि पंचकर्म : चिकनगुनियासारख्या संसर्गोत्तर संधीवेदनांवर ताप आणि सांधे असा दुहेरी विचार करून काढे अन् औषधे दिली जातात. जुनाट आमवात असतांना गोळ्या आणि काढे दिले जातात. या दोन्ही अवस्थेत भारंभार पंचकर्म आणि इतर उपक्रमांचा भडिमार न करता काम केले जाते. अनेक वर्षे ‘स्टिरॉईड’ घेतले असता रुग्ण सांध्यांच्या वेदना, तसेच अन्य दुखण्याविषयी विचित्र चक्रात अडकतो आणि दुखणे अधिक त्रासदायक होते. यात तसेच ‘अँकिलोझिंग स्पॉन्डिलयटिस’ (मणक्याचा जुनाट दाहक आजार), ‘एस्.एल्.ई.’ (सिस्टेमिक ल्युपस एरिथेमॅटोसस – शरिराची स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्याच निरोगी पेशी आणि अवयव यांवर आक्रमण करते) यांसारख्या ‘ऑटोइम्युन’ आजारात तेल लावणे, शेकणे यांसह ‘विष’ यादृष्टीने विचार अन् त्यावरील औषधी दिले असता लाभ दिसतो. यामध्ये बस्ती, विरेचन, रक्तमोक्षण आणि विषनाशक औषधींचा विचार केला जातो. यात पथ्य सांगणेही आपसूक आलेच.
उ. योग्य तो व्यायाम आणि ‘पोश्चर करेक्शन’ (शरिराची स्थिती सुधारणे) : हा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू सांध्यांचे आजार हाताळतांना केला जातो. प्रतिदिन घडणारी कारणे न्यूनतम ठेवणे आणि जिथे आवश्यक आहे (मणक्याचे आजार, ‘पोस्ट इंज्युरी मॅनेजमेंट’ (आघातानंतरच्या ताणाचा विकार) अशा वेळी आवर्जून ‘फिजिओथेरपी’चा (भौतिकोपचार तज्ञांचा) सल्ला लाभदायी ठरतो. आजार प्राथमिक अवस्थेत असेल, तर चांगल्या मार्गदर्शनाखाली केलेला प्रतिदिन योगासनांचा व्यायामही लाभदायी ठरतो. यातच तुमच्या बुटांचे सोल आणि व्यायामाची पद्धत यांचाही विचार केला जातो.
ऊ. मानसिक ताणतणावाच्या नियोजनाचा विचार : साधारण वात प्रकोपाने होणार्या निद्रानाश आणि त्या अनुषंगाने बाकी अंग, स्नायू वेदना यांमध्ये मनःशांतीसाठी मार्ग अवलंबणे, उपासना, नामस्मरण वगैरे, तसेच चिंता आणि सतत येणारे विचार न्यून ठेवण्यासाठी समुपदेशन अन् औषधोपचार यांचा उपयोग होतो.
४. सांधेदुखीवर स्वतःला दुहेरी लाभ होतील, असे उपचार घेणे महत्त्वाचे !
सध्याच्या भाषेत सांगायचे, तर गुडघे हे ‘सायटीका’मुळे दुखतात कि झिजल्याने दुखतात ? ‘ऑस्टिआर्थरायटिस’ (सांध्यांची झीज) आहे कि ‘गाऊट’ कि ‘आर्.ए.’ (र्हुमॅटॉईड आर्थरायटिस – संधीवात) उभे रहाण्याच्या पद्धतीमुळे दुखतात का ? जुना काही अपघात आहे ? ‘लिगामेंट’, ‘कार्टिलेज’ कि सांधा ? हे विचार करून त्याप्रमाणे औषध देण्याविषयीचे विचार पालटतो.
आयुर्वेदातही मोठे सांधे दुखतात कि छोटे? वेदना एकाच सांध्यात होते कि फिरून वेगवेगळ्या ? सांधे दुखतात, तर ताप वगैरे लक्षणे असतात का ? ताप येऊन गेल्यावर सांधे दुखू लागले का ? मानेच्या दुखण्याविषयी आम्लपित्ताचा इतिहास किती आहे ? चिंता किती आहे ? व्यक्तीचे काम कशा स्वरूपाचे आहे ? शिळे, तिखट, मसालेदार खातो का ? जड, थंड आणि अपचन वाढवणारे खातो का ? पचन कसे आहे ? ‘स्टिरॉईड’ घेतले होते का ? किती काळ ? अपघात झाला होता का ? सांधे कि स्नायू ? झीज कि सूज ? असे अनेक प्रश्न विचारून वेगवेगळे कल्प (वनस्पती चूर्ण) आणि आवश्यकता असेल, तसे पंचकर्मातील उपक्रमामुळे ही दुखणी पुढे आणखी न वाढवू देता आटोक्यात रहातात.
आयुष्यभर सतत घ्यायला लागणार्या गोळ्या, म्हणजे ‘फास्ट रिझल्ट’ (जलद परिणाम) नाही, हे लक्षात ठेवायला हवे. लगेच येणारे परिणाम आणि तोटे न होता औषधे बंद होऊ शकतील, असे दुहेरी लाभ ज्या मार्गावर आहे, त्या मार्गाचा अन् पर्यायाचा अवलंब करावा इतकेच, या सगळ्या आणि एकंदरीत ‘ऑटोइम्युन’ आजारांच्या वाढत्या प्रमाणाकडे बघता आवर्जून सांगावेसे वाटते.
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे. (२.२.२०२६)
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
मनुष्याचे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
क्रिकेटचा उदो उदो नको !