‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।’, हा महामंत्र करायला लागल्यापासून गुरुकृपेने नामजपाची आवड, तळमळ आणि भाव यांमध्ये वाढ होणे

पू. शिवाजी वटकर

१. ‘नामजप अधिक आवडीने, तळमळीने, भावपूर्ण आणि एक छंद म्हणून करावा’, अशी आतून प्रेरणा मिळणे अन् तशी कृती होणे

‘माझी समष्टी प्रकृती असल्याने मला ‘एकट्याने बसून ध्यान लावणे किंवा बराच वेळ नामजप करणे’, हे काही वेळा कठीण होत असे. जून २०२५ पासून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला ‘नामजप अधिक आवडीने, तळमळीने, भावपूर्ण आणि एक छंद म्हणून करावा’, अशी आतून प्रेरणा मिळू लागली. त्याप्रमाणे गुरुदेव माझ्याकडून प्रयत्न करून घेऊ लागले. तेव्हा मला ‘सुखाचें हें नाम आवडीनें गावें । वाचें आळवावें विठोबासी ।।’, हे संत सोयराबाईंचे भजन पुष्कळ आवडू लागले. सर्वसाधारणपणे ‘नामजप करावा, नाम घ्यावे’, असे सांगितले जाते; मात्र या भजनात ‘भगवंताचे नाम हे आवडीने गावे, नाम आळवावे, नामाचा गजर करावा’, असे सांगितले आहे. त्यामुळे मला ‘नामजप करणे’, हे एक आवडीचे साधन वाटू लागले. ‘माझी इंद्रिये आणि सर्व पेशी नामजप करत आहेत, माझ्या शरिरात नामाचा गजर होत आहे, माझा नामजप आपोआप होत आहे’, असे मला जाणवू लागले. गुरुकृपेने मला नामजपातून आनंद मिळू लागला.

२. ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।’, हा महामंत्र दिवसातून २ वेळा म्हणण्याची संधी मिळणे

माझे नामस्मरण आवडीने करण्याचे प्रयत्न चालू असतांना मला अकस्मात् ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।’, हा महामंत्र दिवसातून २ वेळा एकत्रित म्हणण्याची संधी मिळाली. ऑक्टोबर २०२५ मध्ये काही दिवस हा महामंत्र सकाळी ९ वाजल्यापासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत समष्टी नामजप म्हणून सेवा करण्याची संधी गुरुकृपेने मला मिळाली. त्यानंतर २६.१०.२०२५ या दिवशी ‘सप्तर्षींनी नाडीपट्टीत उल्लेख केल्यानुसार सर्व साधकांनी प्रतिदिन १०८ वेळा हा महामंत्र म्हणायचा आहे’, असा आनंददायी निरोप मिळाला. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना नामजपाच्या पुढच्या पुढच्या टप्प्यात घेऊन जात आहेत’, याची मला कृतज्ञतापूर्वक जाणीव होत आहे.

३. आता हा महामंत्र आणि अन्य नामजप करतांना मला पुष्कळ आनंद मिळत आहे. ‘मनातील विचार थांबवून केवळ नामजप आणि गुरुकृपेने मिळालेली सेवा करावी’, याची सतत जाणीव होऊन तशी कृती होत आहे.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी हा महामंत्र आणि अन्य नामजप करण्याची माझ्यात गोडी, तळमळ आणि भाव निर्माण केला’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (पू.) श्री. शिवाजी वटकर (वय ७९ वर्षे, सनातनचे १०२ वे (समष्टी) संत), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.११.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक