Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या चीन सैन्याच्या कथित घुसखोरीच्या दाव्यामुळे लोकसभेत गदारोळ

  • लोकसभा दिवसभरासाठी स्थगित

  • निवृत्त सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचा गांधी यांनी दिला संदर्भ

नवी देहली – लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरून धन्यवाद प्रस्तावावर २ फेब्रुवारीला सकाळी चर्चा करण्यात येणार होती; मात्र या वेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यावर काहीही बोलण्याऐवजी चीनच्या सैन्याने भारतीय सीमेमध्ये घुसखोरी केल्याचे सूत्र उपस्थित केले. ‘डोकलाममध्ये ४ चिनी रणगाडे भारतीय हद्दीत घुसले होते’, असा दावा राहुल गांधी यांनी केला. यासाठी त्यांनी निवृत्त सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचा संदर्भ देण्याचा प्रयत्न केला. याला सत्ताधारी पक्षाकडून संसदेच्या नियमांचा संदर्भ देत प्रचंड विरोध करण्यात आला. यामुळे गदारोळ निर्माण झाल्याने प्रथम दुपारी १२ पर्यंत, नंतर दुपारी ४ पर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज स्थगित करण्यात आले.

सदनाची मर्यादा ओलांडू नका ! – लोकसभा अध्यक्षांची राहुल गांधी यांना तंबी

डावीकडे ओम बिर्ला

गांधी म्हणाले की, नरवणे यांच्या पुस्तकात उल्लेख आहे की, ‘डोकलाम येथे  आणि भारतीय सीमेमध्ये चीनने घुसखोरी केली आहे.’ याला लगचेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘जे पुस्तक प्रकाशितच झालेले नाही, ते पुस्तक तुम्ही सभागृहात कसे काय वाचता ?’, असा प्रश्‍न विचारला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही सांगितले की, ‘पुस्तक प्रकाशित झाले किंवा झालेले नाही, तरी संसदेच्या नियमानुसार त्यावर येथे चर्चा केली जाऊ शकत नाही. सदनाची मर्यादा तुम्ही ओलांडू नका.’ यावर गांधी यांनी ‘हे पुस्तक १०० टक्के नरवणे यांचे आहे आणि अधिकृत आहे’, असे म्हटले. (लोकसभा अध्यक्षांच्या विधानावर काय उत्तर द्यायचे, याचेही भान नसणारे राहुल गांधी ! अशा घटनांमुळे गांधी यांना बालिश संबोधले जात असेल, तर त्यात चुकले कुठे ? – संपादक) त्यामुळे सत्ताधारी पक्षाने विरोध केला. गृहमंत्री अमित शहा, तसेच संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनीही याला आक्षेप घेतला. तरीही गांधी पुन:पुन्हा तेच म्हणत राहिल्याने कामकाज स्थगित करण्यात आले.

राहुल गांधी यांचे वर्तन नियमबाह्य ! – राजनाथ सिंह

राजनाथ सिंह

दुपारी पुन्हा कामकाज चालू झाल्यावर गांधी यांनी तेच सूत्र उपस्थित केले. यावर संरक्षणमंत्री म्हणाले की, मनोज नरवणे यांचे आत्मचरित्र प्रकाशित होत नसेल, तर त्यामागे तसेच काही कारण असेल. जर योग्य कारणाविना आत्मचरित्र प्रकाशित करण्यास कुणी अटकाव करत असेल, तर नरवणे न्यायालयाचा आदेश आणून पुस्तक प्रकाशित करू शकतात. त्यांनी तसे का नाही केले ? जे पुस्तक प्रकाशित झालेलेच नाही, त्या पुस्तकाचा संसदेत उल्लेख कसा काय केला जात आहे ? राहुल गांधी यांचे वर्तन हे नियमबाह्य आहे.