Balochistan Operation Herof : बलुचिस्तानात बलुच लिबरेशन आर्मीचे १२ शहरांवर एकाच वेळी आक्रमण : २० पाक सैनिक ठार  

‘बी.एल्.ए.’चे सेनाप्रमुख बशीर जेब बलोच

क्वेटा (बलुचिस्तान) – बलुच लिबरेशन आर्मीने (‘बी.एल्.ए.’ने) ३१ जानेवारीला सकाळपासून पाकिस्तानच्या विरोधातील संघर्षाच्या दुसर्‍या टप्प्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानी सैनिकांनी ४१ बलुच लोकांच्या केलेल्या हत्यांच्या विरोधात ‘ऑपरेशन हेरोफ’ अंतर्गत राजधानी क्वेटासह १२ प्रमुख शहरांमध्ये तीव्र आक्रमणे चालू केली आहेत. ‘बी.एल्.ए.’ने अनेक पोलीस ठाणी आणि शासकीय इमारती नियंत्रणात  घेतल्या आहेत. या आक्रमणांमध्ये पाकचे २० सैनिक ठार झाले आहेत. ‘बी.एल्.ए.’ने क्वेटासह ग्वादर, नुश्की, मस्तुंग आणि पसनी या जिल्ह्यांमध्येही एकाच वेळी आघाडी उघडली. मस्तुंग येथे पोलीस ठाणे कह्यात घेऊन ३० बंदीवानांची सुटका केली. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, अनेक ठिकाणी पाकिस्तानी सैनिकांना चौक्या सोडून माघार घ्यावी लागली. आता ते लढाऊ हेलिकॉप्टरांच्या साहाय्याने आकाशातून बलुच लिबरेशन आर्मीवर आक्रमण करत आहेत.

स्वातंत्र्यासाठी निर्णायक टप्पा ! – ‘बी.एल्.ए.’ प्रमुखांचे आवाहन

‘बी.एल्.ए.’चे सेनाप्रमुख बशीर जेब बलोच यांनी व्हिडिओच्या माध्यमातून संदेश देत या आक्रमणांना मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठीचा ‘निर्णायक टप्पा’ असे संबोधले आहे.

त्यांनी सामान्य नागरिकांना घराबाहेर पडून बलुच सैन्याला साथ देण्याचे आवाहन केले. ‘बलोच सैन्य प्रत्येक गल्ली आणि परिसर येथून शत्रूचा नायनाट करतील’, अशी चेतावणीही त्यांनी दिली. ऑगस्ट २०२४ मध्ये प्रारंभ झालेल्या ‘ऑपरेशन हेरोफ’चा हा पुढचा भाग असून पहिल्या टप्प्यात १३० पाक सैनिक ठार झाल्याचा दावा बलुच सैन्याने केला होता.

बलुच सैन्याने चीनला चेतावणी देतांना ‘ग्वादर आणि बलुचिस्तानातील प्रकल्प यांपासून दूर राहावे, अन्यथा परिणाम गंभीर असतील’, असेही म्हटले आहे.