चारधाममध्ये अहिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालणे योग्यच ! – Uttarakhand Waqf Board Chairman

उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांचे वक्तव्य

डेहराडून (उत्तराखंड) : कोणत्याही धर्मस्थळाचा मूळ उद्देश श्रद्धा आणि भक्ती असतो. जिथे एखाद्या व्यक्तीची श्रद्धा नाही, तिथे जाण्याने उद्देश पूर्ण होत नाही आणि समाजाला सकारात्मक संदेशही मिळत नाही. अशा प्रकरणांमध्ये अनावश्यक संघर्षाची परिस्थितीही निर्माण होऊ शकते. त्यामुळे ज्यांची श्रद्धा सनातन धर्माच्या तीर्थक्षेत्रांशी जोडलेली नाही, त्यांच्या अशा ठिकाणच्या प्रवेशावर बंदी घालणे पूर्णपणे योग्य आहे, असे विधान उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी केले आहे.

चारधाम यात्रेत अहिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालण्याच्या प्रस्तावावर ते बोलत होते. चारधामांमध्ये अहिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालण्याच्या बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीच्या प्रस्तावाला विरोध होऊ लागला असतांना शम्स यांचे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.

उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स
चारधाम मंदिरों में गैर-हिंदुओं के प्रवेश पर रोक की तैयारी, वक्फ बोर्ड अध्यक्ष ने निर्णय को सराहा

(सौजन्य : DD NEWS UTTARAKHAND)

यात्रेत अप्रिय घटना घडल्यास देशातील वातावरण बिघडू शकते !

शम्स यांनी चेतावणी देत म्हटले की, सध्याच्या काळात देशाविरुद्ध सातत्याने कटकारस्थाने केली जात आहेत. जे लोक षड्यंत्र करतात, त्यांना कधीच आवडणार नाही की, चारधाम यात्रेसारखे मोठे आणि शांततापूर्ण आयोजन यशस्वी व्हावे. जर यात्रेच्या काळात कोणतीही अप्रिय घटना घडली, तर त्याचे खापर अहिंदूंच्या माथी मारले जाऊ शकते, ज्यामुळे सामाजिक सलोख्याला हानी पोचेल. (जर अहिंदूंनी तशी कृत्ये केली असतील, तर त्यांच्यावर दोषारोप का केले जाऊ नयेत ? – संपादक)

देशात शांतता आणि सलोखा राखणे आवश्यक !

शम्स पुढे म्हणाले की, अहिंदूंना प्रवेशबंदीचा निर्णय कोणत्याही समुदायाच्या विरोधात नाही, तर देशात शांतता आणि सलोखा राखण्यासाठी आवश्यक आहे. असे निर्णय भावनांच्या आहारी जाऊन नव्हे, तर सामाजिक संतुलन लक्षात घेऊन घेतले पाहिजेत.

प्रस्तावात काय आहे ?

१. चारधामसह ५० मंदिरांमध्ये अहिंदूंना प्रवेशबंदी

उत्तराखंडमधील चारधाम बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री यांसह मंदिर समित्यांच्या अखत्यारीतील एकूण ५० मंदिरांमध्ये अहिंदूंना प्रवेशबंदी लवकरच लागू होऊ शकते. यासंदर्भात सरकार आणि मंदिर समित्या यांमध्ये सहमती झाली आहे.

२. शीख, जैन आणि बौद्ध धर्मियांना सूट

ही बंदी शीख, जैन आणि बौद्ध धर्मांच्या अनुयायांना लागू होणार नाही. मंदिर समित्यांचे म्हणणे आहे की, हे धर्म हिंदु परंपरेच्याच शाखांशी संबंधित मानले जातात.

३. गंगोत्री धाममध्ये एकमत

गंगोत्री मंदिर समितीने बैठकीत एकमताने मंदिर आणि गंगा घाट यांवर अहिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. समितीचे सचिव सुरेश सेमवाल यांनी सांगितले की, शीख अनुयायांना ही बंदी लागू होणार नाही. लवकरच त्याची अंमलबजावणी प्रक्रिया प्रारंभ केली जाईल.

कायद्यांचा अभ्यास चालू आहे ! – मुख्यमंत्री धामी

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी

या बंदीच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, धाम चालवण्याशी संबंधित धार्मिक संघटना, तीर्थ पुरोहित आणि संत समाज यांच्या मतानुसारच सरकार पुढील निर्णय घेईल. या स्थळांसाठी आधीच सिद्ध केलेल्या कायद्यांचा अभ्यास केला जात आहे आणि त्याच आधारावर निर्णय घेतला जाईल.