गुडघेदुखी आणि त्याची कारणे

निरोगी जीवनासाठी व्यायाम : लेखांक ११७

‘आपण दिवसभर चालतो, धावतो, जिने चढतो-उतरतो, तसेच ऊठ-बस करतो. या सर्व कृती आपल्या दिवसभराच्या कामांसाठी अत्यावश्यक आहेत. हे सर्व करतांना शरिराचा सर्वाधिक भार गुडघ्यांवर येतो. गुडघा दिसायला लहान वाटत असला, तरीही शरिराचा अधिकाधिक भार वहाण्याची क्षमता त्यामध्ये असते. आकाराने लहान असूनही शक्तीमान असलेल्या गुडघ्याचे स्वास्थ्य हे त्याच्या भोवती असलेल्या अनेक स्नायूंवर अवलंबून असते. आज आपण ‘गुडघ्यांचे त्रास आणि त्याची कारणे’ समजून घेणार आहोत.

(भाग १)

१. गुडघेदुखी

ही जगभरातील एक सामान्य समस्या आहे. गुडघेदुखीचा त्रास केवळ वृद्धांनाच नाही, तर आजकाल तरुण, मध्यमवयीन आणि अगदी किशोरवयीन मुले यांनाही होत असतो.

जागतिक आरोग्याच्या अभ्यासानुसार (Global Burden of Disease नुसार) केवळ गुडघ्याच्या संधिवाताने (knee osteoarthritis ने) जगभरात ३६५ दशलक्षांहून अधिक लोक प्रभावित आहेत. एकूणच पहाता ‘गुडघेदुखी’ ही अपंगत्वास कारणीभूत ठरणार्‍या प्रमुख समस्यांपैकी एक आहे. अभ्यासानुसार ५० वर्षांवरील अनुमाने ४० ते ४५ टक्के लोकांना दीर्घकाळ किंवा वारंवार गुडघेदुखीचा त्रास होत असतो. आजच्या काळात ‘बैठी जीवनशैली, अधिक वेळ बसणे, बसण्याची चुकीची पद्धत, लठ्ठपणा आणि खेळतांना गुडघ्यांचा अतीवापर होणे’, यांमुळे तरुणांमध्येही ही समस्या वाढत आहे.

२. गुडघेदुखीची कारणे

श्री. निमिष म्हात्रे

शरीररचनेच्या दृष्टीने पाहिल्यास गुडघा हा शरिराचा सर्वच भार वहाणारा एक अतिशय महत्त्वाचा सांधा आहे. ‘चालणे, धावणे, जिने चढणे-उतरणे, उठणे-बसणे’, या सर्व हालचालींमुळे गुडघ्यावर बराच ताण पडतो. साधे चालतांनासुद्धा गुडघ्यावर शरिराच्या वजनाच्या २ – ३ पट भार पडतो, तर जिने चढतांना किंवा उकिडवे (गुडघे पोटाशी येतील, अशा प्रकारे पावले टेकून बसणे) बसतांना हा भार ४ ते ७ पट होऊ शकतो. त्यामुळे स्नायूंमधील थोडासा अशक्तपणा, चुकीच्या हालचाली किंवा शरिराचा तोल बिघडला, तरी गुडघ्यांवर अधिक ताण पडून वेदना चालू होऊ शकतात. सर्वसाधारणपणे ‘झीज होणे, सांध्यावरील ताण, सूज, दुखापत आणि जीवनशैलीशी संबंधित कारणे’, ही गुडघेदुखीची कारणे असू शकतात.

२ अ. गुडघ्याचा संधिवात (Osteoarthritis) : हे गुडघेदुखीचे सर्वाधिक दिसून येणारे कारण आहे. संधिवातामुळे कडकपणा येतो, हळूहळू कूर्चा झिजते, सूज येते आणि वेदना होतात. त्यामुळे हालचालींना मर्यादा येते. ‘वय वाढणे, लठ्ठपणा, जुनी दुखापत आणि दीर्घकाळ अधिक ताण येणे’, हे याचे मुख्य घटक आहेत. संशोधनानुसार ५ किलो वजन वाढल्यास चालतांना गुडघ्यावर अनुमाने १५ ते २० किलो अतिरिक्त ताण पडतो. त्यामुळे गुडघ्याची झीज लवकर होते.

२ आ. गुडघ्याच्या वाटीभोवती किंवा मागे वेदना होणे (patellofemoral pain syndrome) : हे तरुणांमध्ये दिसणारे आणखी एक सामान्य कारण आहे. यात गुडघ्याच्या वाटीभोवती किंवा मागे वेदना जाणवतात. ‘जिने चढणे, उकिडवे बसणे किंवा पुष्कळ वेळ गुडघे वाकवून बसणे’, अशा कृती करतांना वेदना वाढतात. यामागे बहुतेक वेळा ‘मांडी किं‍वा कुल्हे यांचे स्नायू दुर्बल असणे’ आणि ‘अधिक वेळ बसून रहाणे’, ही कारणे असतात.

२ इ. स्नायूबंधांना सूज येणे (Tendonitis) : हा प्रकार धावपटू, उड्या मारणारे खेळाडू किंवा अकस्मात् व्यायाम वाढवणार्‍या व्यक्ती यांच्यामध्ये आढळतो. या व्यतिरिक्त वळणाच्या हालचाली किंवा हळूहळू झीज झाल्यामुळे सूज येऊ शकते, तर कधी कधी ठळक दुखापत नसतांनाही सूज येते.

२ ई. अस्थिबंधांच्या (Ligaments च्या) दुखापती होणे : अस्थिबंधांच्या दुखापती खेळात किंवा अपघातात होतात आणि योग्य पुनर्वसन न झाल्यास दीर्घकालीन गुडघेदुखी राहू शकते. अनेक वेळा ‘पाय सपाट असणे, कुल्ह्याचे स्नायू दुर्बल असणे, मांडीच्या मागील स्नायूंमध्ये घट्टपणा असणे किंवा चालण्याची चुकीची पद्धत’, यांमुळे गुडघ्यावर अधिक ताण पडतो. अशा वेळी गुडघ्यात काही दोष नसूनही वरील कारणांमुळे गुडघा ‘बळी’ ठरतो.

२ उ. गुडघ्याची कूर्चा झिजणे (‘मेनिस्कस’ दुखावले जाणे) : गुडघ्याच्या सांध्यात २ हाडांमधील झीज न्यून व्हावी; म्हणून एक गादी असते, तिला ‘मेनिस्कस’ (Meniscus) म्हणतात. वयोमानानुसार किंवा अपघातामुळे ही कूर्चा झिजते किंवा फाटते. त्यामुळे हालचाल करतांना किंवा वजन देतांना गुडघ्यात तीव्र स्वरूपाच्या वेदना होऊ शकतात.

२ ऊ. आजकालच्या जीवनशैलीशी संबंधित कारणे : आजकालच्या जीवनशैलीशी संबंधित कारणेही गुडघेदुखी निर्माण करत आहेत. ‘अधिक वेळ बसणे, विशेषतः पुष्कळ खाली किंवा खोल सोफ्यावर बसणे, गुडघे सतत वाकलेल्या स्थितीत ठेवणे’, यांमुळे रक्तप्रवाह न्यून होतो, सांधा आखडतो आणि आजूबाजूचे स्नायू दुर्बल होतात. अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की, प्रतिदिन ६ ते ८ घंट्यांपेक्षा अधिक वेळ बसणार्‍या लोकांमध्ये नियमित हालचाल करणार्‍यांच्या तुलनेत गुडघेदुखीचा धोका अधिक असतो.’

(क्रमश : वाचा पुढच्या बुधवारी)

– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा, गोवा. (१८.१.२०२६)

भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1004631.html

🪷 ‘व्यायाम’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा 🪷

वाचकांना सूचना

‘निरोगी जीवनासाठी व्यायाम’ या सदरावर आधारित लवकरच ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे.